नंदगड उर्फ आनंदगड

नंदगड उर्फ आनंदगड | nandgad | aanandgad

नंदगड उर्फ आनंदगड

नंदगड उर्फ आनंदगड | Nandgad or Aanandgad – बेळगाव सीमाप्रश्न हा महाराष्ट्राच्या ह्रदयावरची कधीही न भरणारी जखम आहे. स्वराज्यात असणारा हा मराठी बहुभाषिक प्रांत भाषावार प्रांतरचना करताना मात्र कर्नाटक राज्याला जोडला गेला. आजही खऱ्या अर्थाने मराठी संस्कृती जपुन असणारा हा भाग कर्नाटक राज्याला जोडला असला तरी मनाने मात्र महाराष्ट्रात आहे याचा प्रत्यय आपल्याला बेळगाव मधील किल्ले फिरताना जागोजागी येतो. आज बेळगाव जिल्ह्यात असणारे हे किल्ले स्वराज्यात असल्याने या किल्ल्यांना मी आजही महाराष्ट्रातील किल्ले समजतो व त्यांचा उल्लेख महाराष्ट्रातील किल्ले म्हणुन करत आहे.

बेळगाव जिल्ह्याची भटकंती करताना मला येथील ३० पेक्षा जास्त गढीकोटांना भेट देता आली. त्या सर्व गढीकोटांची माहीती मी दुर्गभरारी या संकेतस्थळावर देण्याचा प्रयत्न केला आहे. यातील आम्ही केलेला पहिला किल्ला म्हणजे प्रतापगड उर्फ नंदगड उर्फ आनंदगड. बेळगाव जिल्ह्यातील खानापुर तालुक्यात असलेला हा गिरीदुर्ग पुर्णपणे जंगलाने वेढलेला असुन तो पहाण्यासाठी चार तास तंगडतोड करावी लागते. नंदगड हे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव खानापुर या तालुक्याच्या ठिकाणाहुन ११ कि.मी. अंतरावर असुन किल्ल्याच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेला तलाव गावापासुन ३ कि.मी.आत आहे. सोबत खाजगी वाहन असल्यास कच्च्या रस्त्याने या तलावापर्यंत जाता येते अन्यथा गाव ते तलाव ३ कि.मी.व तलाव ते किल्ला ५ कि.मी. असे ८ कि.मी.अंतर पायी पार करावे लागते.

पावसाळा वगळता जीपसारखे वाहन असल्यास थेट किल्ल्यापर्यंत जाता येईल. तलावाच्या अलीकडे डाव्या बाजुने गडावर जाणारा कच्चा रस्ता हा उध्वस्त तटबंदी पार करत किल्ल्याच्या माथ्यावर असलेल्या दुर्गामंदिरापर्यंत जातो. किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर साधारण ४० एकरवर पसरलेला असुन किल्ल्याचा माथा समुद्रसपाटीपासुन २९२५ फुट उंचावर आहे. किल्ल्याचा ताबा वनखात्याकडे असल्याने गडावर मोठया प्रमाणात झाडी वाढलेली दिसुन येते. किल्ल्यावर प्रवेश करण्यापुर्वी तटबंदीच्या अलीकडे तटाखाली एक साचपाण्याचा मोठा तलाव पहायला मिळतो. पुढे आपण तुटलेल्या तटबंदीतुन किल्ल्यावर प्रवेश करतो त्याच्या डाव्या बाजुला काही अंतरावर किल्ल्याचा पुर्वाभिमुख मुख्य दरवाजा आहे पण बाहेरील बाजुस मोठया प्रमाणात झाडी असल्याने किल्ल्याच्या आतील बाजुने तेथे जाता येते. तटबंदीतुन आत आल्यावर उजवीकडील पायऱ्याची वाट आपल्याला दुर्गामंदिराकडे नेते तर सरळ जाणारा कच्चा रस्ता फिरून दुर्गामंदिराकडे जातो. या रस्त्याच्या सुरवातीस डाव्या बाजुस एक पायवाट जाताना दिसते. आपण आपली किल्ला फिरण्याची सुरवात या वाटेनेच करायची.

गडावर नवरात्र निमित्त मोठया प्रमाणात राबता असल्याने देवीचे सेवेकरी असलेले श्री.खेमानी पाटील आम्हाला किल्ला दाखवण्यासाठी मार्गदर्शक म्हणुन लाभले व त्यांनी आम्हाला संपुर्ण किल्ला दाखवत माहिती दिली. पायवाटेच्या सुरवातीस उजवीकडे किल्ल्याचा पश्चिम बुरुज आहे. हा बुरुज म्हणजे खूप मोठा खालवर नैसर्गीकपणे तासत गेलेला कातळ आहे. येथुन किल्ल्याच्या पश्चिमेस असलेला दुरपर्यंतचा प्रदेश नजरेस पडतो. बुरुज पाहुन पायवाटेने पुढे निघाल्यावर डावीकडे झाडीत लपलेला किल्ल्याचा मुख्य दरवाजा दिसतो. दरवाजाची कमान आजही शिल्लक असुन दरवाजात भलेमोठे वारूळ वाढलेले आहे. दरवाजा पाहुन पायवाटेने पुढे निघाल्यावर तटाच्या फांजीवरून आपण किल्ल्याच्या दक्षिण टोकावर असलेल्या बुरुजावर येतो. किल्ल्याचे दक्षिण टोक म्हणजे किल्ल्याची निमुळती सोंड असुन गडाची या भागात असलेली असलेली तटबंदी आजही शिल्लक आहे. किल्ल्याच्या दक्षिण टोकावर असलेला हा बुरुज मोठमोठया नैसर्गिक शिळांच्या आधारे बांधलेला असुन या बुरुजाच्या पश्चिम बाजुला असलेल्या तटबंदीत किल्ल्याचा दुसरा दरवाजा असावा. पश्चिमेकडून या बुरुजाला भिडणारी तटबंदी बुरुजाला न चिटकवता काही अंतर ठेवुन बांधलेली आहे.

किल्ल्याचा हा भाग पाहुन झाल्यावर पायवाटेच्या सुरवातीस असलेल्या कच्च्या रस्त्याकडे यावे. या रस्त्याने काही अंतर पुढे आल्यावर पुन्हा एक पायवाट डावीकडे खाली उतरताना दिसते. या वाटेने खाली उतरल्यावर खडकात बांधलेले मध्यम आकाराचे टाके दिसुन येते. या तटाक्यातील पाणी पिवळसर असल्याने हे टाके सांबार तळे म्हणुन ओळखले जाते. या टाक्याच्या खालील बाजुस असलेल्या तटबंदीत एक लहानसा ढासळलेला दरवाजा असुन या तटबंदीबाहेर तटाखाली एक बांधीव टाके आहे. गडाच्या आत असलेल्या टाक्यातील पाणी संपल्यावर या बाहेरील टाक्यातील पाण्याचा वापर होत असावा व तेथे जाण्यासाठी या लहान दरवाजाची रचना असावी. हा भाग पाहुन पुन्हा रस्त्यावर यावे व पुढे निघावे. येथुन रस्ता उजवीकडे वळुन मंदिराकडे जातो, आपण मात्र पायवाटेने सरळ पुढे यावे. पायवाटेच्या उजवीकडे एका उंचवट्यावर चौथऱ्याचे अवशेष दिसतात. गावकऱ्यांच्या माहितीनुसार या ठिकाणी भांडण-तंटे सोडवले जात. याचा अर्थ हि सदरेची इमारत असावी. या भागात मोठया प्रमाणात जोती व चौथरे पहायला मिळतात. हा भाग पाहुन झाल्यावर दुर्गामातेच्या मंदीरात जावे. मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार केलेला असुन तांदळा स्वरुपात पुजली जाणारी दुर्गामातेची मुर्ती म्हणजे एक खूप मोठी शिळा आहे. या शिळेवर ओझरते कोरीवकाम केलेले असुन ते स्वयंभू असल्याचे मानले जाते.

गडावर रहायचे असल्यास मंदिराच्या सभामंडपात रहाण्याची तसेच पिण्याच्या पाण्याची सोय होते. मंदिराच्या पुर्वेकडील भागात असलेल्या तटबंदीला लागुन एक खूप मोठया आकाराचा बुरुज आहे. या बुरुजाकडे जाताना २ x ४ फुट आकाराच्या दगडी स्तंभावर त्रिशूळ व दोन वाघ कोरलेले एक शिल्प पहायला मिळते. बुरुज पाहुन मंदीरात यावे व थोडा वेळ आराम करून परतीच्या प्रवासास सुरवात करावी. परत जाताना आल्या वाटेने न जाता मंदिरासमोरून गडाच्या उत्तरेकडे जाणाऱ्या वाटेने निघावे. या वाटेने गडाच्या उत्तरेकडील तटबंदीत असलेला ढासळलेला दरवाजा पार करत आपली गड उतरण्यास सुरवात होते. या वाटेने ५ मिनिटे खाली उतरल्यावर डोंगर उतारावर खडकात बांधलेले एक मोठया आकाराचे तळे पहायला मिळते. या तलावाच्या एक बाजुच्या भिंतीत कोनाडा बांधलेला असुन दुसऱ्या बाजुस आत उतरण्यासाठी मोठया पायऱ्या बांधलेल्या आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही आत घोडे उतरण्याची सोय असुन हा तलाव घोडतळे म्हणुनच ओळखला जातो. या ठिकाणी आल्यावर आपली संपुर्ण गडफेरी पुर्ण होते.

संपुर्ण किल्ला फिरण्यास दीड तास पुरेसा होतो. तलावाकडून खाली उतरत जाणारी मळलेली पायवाट आपल्याला कच्च्या गाडी रस्त्यावर आणुन सोडते. इतिहासात प्रतापगड,नंदगड,आनंदगड अशा नावानी ओळखला जाणारा हा किल्ला कित्तुर संस्थानातील एक महत्वाचा किल्ला होता. इ.स.१७५६ मध्ये सावनूरच्या नबाबाचा हा प्रांत मराठ्यांनी ताब्यात घेतला पण त्यांनी कित्तूर व गोकाक ही गावे मात्र येथील मुळ देसायांच्याच ताब्यात ठेवली. सांगलीचे परशुराम भाऊ पटवर्धन यांनी १७७९ मध्ये गोकाक घेतले व येथील देसाईस अटक केली. १७८५ मध्ये टिपूने कित्तूर जिंकले पण इ.स. १७९२ मध्ये मराठयांकडून पराभव झाल्याने श्रीरंगपट्टणच्या तहानुसार हा भाग पुन्हा मराठ्यांकडे आला. इ.स.१८०० च्या सुमारास काही दिवस हा भाग कोल्हापुरच्या धोंड्या वाघाच्या ताब्यात होता. आदिलशाही काळात गिजगनहळ्ळी, संपगाव, बिडी, परसगड ही गावे हिरमल्लप्पा व चिक्कमल्लप्पा या लिंगायत बंधुच्या देशमुखी वतनात सामील होती. या घराण्याला सर्जा अशी पदवी होती. आदिलशाही ते मराठा राज्याच्या अस्तापर्यंत साधारण २३९ वर्षे या घराण्यात बारा देसाई झाले. पायथ्याशी असलेल्या नंदगड गावामुळे नंदगड नावाने ओळखला जाणारा हा प्रतापगड किल्ला इ.स.१८०९ मध्यें कित्तुरच्या देसायांनीं बांधला.

किल्ल्याखालील पेठ नंदगड गाव वसविण्यासाठी त्यांनी या गांवात येऊन राहणाऱ्या लोकांना नऊ वर्षासाठी करमाफी दिली. बारावा देसाई शिवलिंगरुद्र सर्जा हा १८२४ मध्ये निपुत्रिक मेल्याने त्याची आई राणी चेन्नम्माने शिवलिंगप्पा याला दत्तक घेऊन गादीवर बसवले पण ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा धारवाडचा कलेक्टर थॅकरेने हे दत्तकविधान मान्य केले नाही व कित्तुरची देशमुखी जप्त केली. यावर राणी चेन्नम्माने ब्रिटीशांविरुद्ध उठाव केला. हा उठाव कित्तुरचे युद्ध म्हणुन प्रसिध्द आहे. या युद्धात राणी चेन्नम्मा स्वतः घोड्यावर बसून ब्रिटीशांशी लढली. या लढाईत थॅकरे मारला गेला पण २ डिसेंबर १८२४ रोजी कित्तूर इंग्रजांनी जिंकले. राणी चेन्नम्माला बैलहोंगलच्या किल्ल्यावर पकडण्यात आले. २१ फेब्रुवारी १८२९ रोजी ही शुर राणी मरण पावली व इंग्रजांनी कित्तुर संस्थान खालसा केले. यावेळी राणी चेन्नम्माचा प्रमुख सेनापती होता संगोळी रायन्ना. संगोळी रायन्नानेही दत्तक मुलाला हाताशी धरून १८२९ मध्ये पुन्हा एकदा उठाव केला. संगोळी रायन्नाने सामान्य प्रजेतून सैन्य उभे करत त्यांच्या मदतीने ब्रिटिशांना चांगलेच झुंजवले. अखेर दगा करूनच ब्रिटीशांनी संगोळी रायन्ना यांना पकडले. २६ जानेवारी १८३१ रोजी नंदगड येथे संगोळी रायन्ना यांना फाशी देण्यात आले. नंदगड येथे रायण्णाची समाधी आहे.

@सुरेश निंबाळकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here