महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,76,514

लोणी भापकरचे शिल्पवैभव

By Discover Maharashtra Views: 2481 3 Min Read

लोणी भापकरचे शिल्पवैभव…

पुणे-बारामती रस्त्यावर मोरगावपासून ८ कि.मी. वर असलेले हे वारसासंपन्न लोणी भापकर गाव.गावाच्या नावातच असलेल्या भापकरांच्या उल्लेखावरून मन सुरुवातीलाच मध्ययुगात डोकावते. हे पेशव्यांचे सरदार सोनी गुरखोजी भापकर यांचे इनाम गाव. गावातील त्यांचा अर्धा एकरावर वाडा आणि गावातील भैरवनाथाचे मंदिर त्यांच्या पराक्रमाची साक्ष देतात.यातील भैरवनाथ मंदिराच्या नगारखान्यातील मराठेशाहीतील चित्रकला, पोर्तुगीजांचा पराभव करत लुटून आणलेली ती भली मोठी घंटा आणि सरदार भापकरांनी अर्पण केलेली काळ भैरवनाथ आणि जोगेश्वरीची मूर्ती हे सारे पाहण्यासारखे आहे. हे सर्व पाहत असताना कोणीतरी दत्त मंदिराची आठवण करून देते आणि तिथे पोहचल्यावर बसणारा धक्का हा वर उल्लेख केलेल्या श्रेणीतला असतो.(लोणी भापकरचे शिल्पवैभव.)

महाराष्ट्रात राष्ट्रकूट, चालुक्य, यादवांनी कोरीव शैलमंदिरांची मोठी निर्मिती केली आहे. अंबरनाथ, सिन्नर, खिद्रापूर, भुलेश्वर, रतनवाडीचे अमृतेश्वर ही या कोरीव माळेतीलच रत्ने! या रत्नांमधीलच एक लोणी भापकर मध्ये विसावले आहे. एका मोठ्या वृक्षाच्या छायेत साकारलेले हे भव्य मंदिर आणि त्याच्यापुढची तेवढीच सुंदर पुष्करणी.इतिहास सांगतो, की हे मंदिर आणि पुष्करणी यादवांच्या काळात निर्माण झाली. पण त्या काळी मंदिर थाटले विष्णूचे. पण पुढे काळाच्या ओघात ते मल्लिकार्जुनाचे मंदिर झाले.या मंदिराच्या अंतराळवजा मंडपात आलो, की एखाद्या लेणीत आल्यासारखे वाटते. रेखीव खांब, आडव्या तुळयांवरील कोरीव पट आणि छताला लगडलेली दगडी झुंबरे मनावरील दडपण वाढवतात. थोड्याफार किलकिल्या प्रकाशातही मग ही शिल्पसृष्टी लक्ष वेधू लागते.

विविध कृष्ण लीला; शंख, चक्र, गदा आणि पद्मधारी वैष्णवांचा मेळा, शिवपार्वतीची आराधना.

पुष्करणी हा वास्तुप्रकार नावाप्रमाणेच वास्तुकलेतील सर्वाधिक अलंकारिक प्रकार वाटतो.चारही बाजूंनी बांधीव असे मोठे आडवे कुंड, उतरण्यासाठी एका बाजूने जिना, आत फिरण्यासाठी एक धक्का ठेवलेला, सभोवतालच्या भिंतीत जागोजागी विविध देवतांसाठी २८ कोरीव कोनाडे किंवा देवकोष्टके आणि मध्यभागी नितळ पाणी! अशी ही सारी सौंदर्यदृष्टी जपणारी, वाढवणारी रचना. म्हणून तर ती पुष्करणी; देवांची देवासाठी!

पुष्करणीतील या कोनाड्यांना पुन्हा मंदिराप्रमाणे कोरीव शिखरांची रचना केली आहे. जणू काही ही छोटी-छोटी मंदिरे. पण यातील एकाही कोष्टकात सध्या मूर्ती दिसत नाही.

वराह हा दशावतारातील तिसरा अवतार. या वराह अवताराची मूर्ती नृवराह आणि यज्ञवराह रूपात दाखवली जाते. यातील नृवराहाचे धड मानवाचे तर शिर वराहाचे असते. तर यज्ञवराह मूळ वराहाच्या रूपातच दाखवला जातो. लोणी भापकर येथील या मंदिराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत येताच यज्ञवराहाचे हे सुंदर शिल्प आपल्या पुढ्यात प्रगटते.

साधारण तीनएक फूट लांब आणि दोनएक फूट उंचीचे हे शिल्प पाहताक्षणीच मन चक्रावून टाकते. अत्यंतनाजूक हातांनी कोरलेले यज्ञवराहाचे हे सालंकृत रूप. या वराहाच्या पायाशी शेष कोरलेला आहे. तर चार पायांजवळ शंख, चक्र, गदा आणि पद्म ही विष्णूची प्रतीके साकारलेली आहेत. पायांना नागदेवतेचे तोडे घातलेले आहेत आणि मुख्य म्हणजे पाठीवर छोट्या-छोट्या तब्बल १४२ विष्णू मूर्ती झूल चढवलेली आहे.नक्कीच वेगळा अनुभव देऊन जाते ही भेट.

टीम-पुढची मोहीम

Leave a comment