महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ पासून Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ३५ हुन अधिक विषयांवर ३०००+ लेख आहेत. वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Website Views: 95,18,484

कृष्ण – केवळ नाव नाही तर संपूर्ण जीवन दर्शन आहे !

Views: 5
2 Min Read

कृष्ण : काळानुरूप जगणारे, जमिनीवरचे व्यक्तिमत्त्व!

कृष्ण हे केवळ एक नाव नाही; ते अनेक अर्थांनी समृद्ध असलेले व्यक्तिमत्त्व आहे. कृष्णाकडे पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, ज्या वयात जसे असायला हवे, तसेच कृष्ण आहे. म्हणूनच त्याचे व्यक्तिमत्त्व एका चौकटीत बांधता येत नाही.

बालवयात तो लोणी चोरणारा नटखट गोपाळ आहे. तरुण वयात गोपिकांच्या खोड्या काढणारा, त्यांच्या वस्त्रहरणाच्या कथेतून तत्कालीन सामाजिक संकेतांना वेगळ्या पद्धतीने आव्हान देणारा आणि प्रौढ वयात तो भगवद्गीतेचा तत्त्वज्ञ होतो.

रणभूमीवर कर्णाचा रथ चिखलात रुततो, तेव्हा कृष्ण अर्जुनाला सांगतो, हीच योग्य वेळ आहे. कारण कृष्णासाठी युद्धाच्या वास्तवापासून दूर राहून आदर्शवाद मांडणे महत्त्वाचे नाही; परिस्थितीचे भान ठेवून योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.

म्हणूनच कृष्ण म्हणजे ‘डाउन टू अर्थ’—जमिनीवर पाय घट्ट रोवून उभे असलेले व्यक्तिमत्त्व आहे.

प्रस्तुत शिल्पात दिसणारा गोवर्धनधारी कृष्ण याच बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा पैलू आपल्यासमोर आणतो.

इंद्राची पूजा करण्याची परंपरा असताना कृष्णाने प्रश्न उपस्थित केला की, आपल्या जीवनाचा खरा आधार कोण? ज्या गोवर्धन पर्वतामुळे, भूमीमुळे, पशुधनामुळे आणि निसर्गामुळे आपले जीवन चालते, त्याची पूजा का करू नये? हा विचार केवळ धार्मिक कथानक म्हणून पाहता येत नाही. त्यामध्ये परंपरेला प्रश्न विचारण्याची आणि आपल्या जीवनाशी प्रत्यक्ष संबंध असलेल्या निसर्गशक्तीचा सन्मान करण्याची विद्रोही भूमिका दिसते. कृष्णाच्या या भूमिकेमुळे इंद्राचा कोप झाला. मुसळधार पाऊस कोसळला. आणि आपल्या गोकुळवासीयांच्या संरक्षणासाठी कृष्णाने गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलून धरला. या शिल्पात कृष्णाच्या भोवती आश्रय घेतलेले गोप-गोपिका, पशुधन, विविध प्राणी आणि निसर्ग ही केवळ शिल्पशास्त्रीय मांडणी नाही; ती कृष्ण आणि लोकजीवनातील अतूट नाते आहे. म्हणून हे शिल्प केवळ ‘गोवर्धन उचलणारा कृष्ण’ दाखवत नाही; तो लोकजीवनाच्या मध्यभागी उभा असलेला, निसर्गाचे रक्षण करणारा आणि प्रस्थापित रूढींना प्रश्न विचारणारा कृष्ण आपल्यासमोर उभा राहतो. बालकृष्णापासून तत्त्वज्ञ कृष्णापर्यंत आणि गोवर्धनधारी कृष्णापासून रणभूमीवरील रणनीतीकार कृष्णापर्यंत….

कृष्ण – प्रस्थापित रूढीना केवळ प्रश्न विचारणारा नाहीं तर विरोधी भूमिका घेऊन ठाम मार्ग काढणारा! प्रश्नाबरोबर प्रश्नांचे उत्तर देणारा!!

कृष्ण समजून घेणे म्हणजे भारतीय संस्कृतीतील एका विलक्षण बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणे होय.

Leave a Comment