महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,76,477

खिद्रापूर | कोपेश्वर महादेव मंदिर

By Discover Maharashtra Views: 1397 2 Min Read

खिद्रापूर, कोपेश्वर महादेव मंदिर –

आपल्या सर्वात सुंदर, अद्भुत शिल्पांपैकी एक. प्राचीन मंदिरे तशी अद्भुतच असतात म्हणा. सतीच्या आत्माहुतीने कोपलेला शंकर आपला क्रोध प्रकट करून येथे येऊन बसला म्हणून कोपेश्वर अशी पौराणिक आख्यायिका. कर्तबगार चालुक्य राजा दुसरा पुलकेशीने सातव्या शतकात खिद्रापूर हे मंदिर बांधायला घेतले. ६४२ साली नरसिंहवर्मन पल्लवशी झालेल्या युद्धात पुलकेशीचा मृत्यू झाल्याने मंदिराचे काम बंद पडले. पुढे सुमारे सहा शतकांनंतर यादव राजा सिंघणदेवाने मंदिराचे बांधकाम १२१४ साली पूर्ण केले. ११०९ ते ११७८ या काळात शिलाहारांनीही या मंदिराचे बांधकाम केले असे म्हणतात.

याचा स्वर्गमंडप निव्वळ अप्रतिम आणि अद्वितीय. वर्तुळाकार खुला मंडप. त्या वर्तुळात पोर्णिमेचा पूर्णचंद्र बरोबर मधोमध येतो. असे अद्भुत बांधकाम. मंदिरावरच्या शिल्पांविषयी काय नि किती बोलायचे. अनिर्वचणीय. सगळ्या प्रकारची शिल्पे येथे आहेत. सर्व हावभाव, कृत्ये. मंदिरावरची एकही जागा अशी नाही जिथे शिल्प नाही. पूर्ण मंदिर सुंदर शिल्पांनी गच्च भरलेले आहे. सौंदर्य भरभरून ओतलेले आहे. परवा इथे गेलो होतो तेव्हा सोमवार असल्याने थोडी वर्दळ होती. त्यामुळे फोटो मनासारखे घेता आले नाही. पण काही फोटो खाली दिले आहे नक्की पहा, कल्पना येईल.

मंदिरासमोरच्या कृष्णा नदीच्या पलीकडे शहापूर गाव. बादशहाचा तळ तिथे असायचा म्हणून शहापूर. सप्टेंबर व ऑक्टोबर १७०२ मध्ये औरंगजेब या भागात होता. तेव्हा त्याने या मंदिराची तोडफोड करण्याची आज्ञा केली. येथले अजून एक वैशिष्ट्य असे की या शिवमंदिरात नंदी नाही. आमच्या नाशिकचे प्राचीन कपालेश्वर महादेव मंदिर एकमेव असे की जेथे नंदी नाही असे म्हणतात. त्याला खिद्रापूरचा अपवाद निघाला होता. पण खिद्रापूरच्या कोपेश्वराला नंदी आहे. हा नंदी येथून बारा किलोमीटर दूर यडुर गावी आहे. त्याचे मुख खिद्रापूरच्याच दिशेला आहे. तेथे नंदीचे स्वतंत्र मंदिर आहे.

इथली शिल्पे इतकी मनमोहक आहेत की औरंगजेबाच्या आदेशाने इथे तोडफोड करणाऱ्या विध्वंसकांचेही हात ती शिल्पे नष्ट करताना धजावले नाही. त्यांनी फक्त शिल्पांचे मुख तोडले, बाकीचे तसेच राहू दिले, असे दिसते.

 प्रणव कुलकर्णी.

Leave a comment