खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग १३ | फैजपूर काॅंग्रेस अधिवेशन

By Discover Maharashtra Views: 2349 3 Min Read
चित्रकार प्रकाश तांबटकर, ललितकला भवन, खिरोदा

खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग १३ | फैजपूर काॅंग्रेस अधिवेशन –

अधिवेशनाच्या पुर्वीची पार्श्वभूमी –

जगभरातील राजकारणात अतिशय संवेदनशील घटना घडत होत्या. रशियन संविधान संमत झाले होते आणि ब्रिटीश साम्राजाचे आठवे एडवर्ड यांनी सामान्य अणि दोनदा घटस्फोटीत महिलेशी प्रतिगामी विवाह करण्यासाठी साम्राजाचा त्याग केला होता. खरे तर या जगातील घटनांचा भारतीय जनतेचा काडीचाही संबंध नव्हता. ती आपल्या जगण्याच्या साध्या साध्या गोष्टींशी झगडत होती. पण महात्मा गांधींच्या हा निर्णय महत्वाचा आणि ऐतिहासिक होता की खेड्यातील लोकांपर्यंत राष्ट्रीय राजकारण नेऊन ठेवायचे, त्यांना जगाशी, भारतातील इतर घटनांशी जोडायचे म्हणून काँग्रेसचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन खेड्यात भरवायचे हा निर्णय घेण्यात आला.(खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग १३)

लाहोर काँग्रेसमध्ये १९२९ संपूर्ण स्वातंत्र्याची संदिग्ध घोषणा, राष्ट्रव्यापी कायदेभंग आंदोलन, कराची काँग्रेसचे १९३१ मुलभूत हक्कांची सनद, लखनौ काँग्रेसचे १९३६ समाजवादी समाजरचनेचे सुतोवाच यानंतरचे फैजपूर येथील सुवर्ण महोत्सवी अधिवेशन हा राष्ट्रीय आंदोलनाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरला.तसेच काँग्रेसच्या बदलत्या स्वरूपाचा द्योतक तर होताच, शिवाय तेव्हापासून काँग्रेसचे धोरण आणि जनतेशी जोडणी व्हायला मदतच झाली.

याकाळात अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे समाजवादाकडे आकर्षित होणाऱ्या युवकांची संख्या आणि सहभाग काँग्रेसमध्ये वाढत गेला. वसाहतीच्या स्वराज्याची संकल्पना धुडकावून लावत संपूर्ण स्वातंत्र्य हेच काँग्रेसचे ध्येय होते.

कायदेभंग आंदोलनाची फलश्रुती म्हणून १९३५ च्या कायद्यान्वये ब्रिटीश सरकारने भारतीयांना संघराज्य आणि प्रांतिक स्वायतत्तेला होकार दिला होता पण संघराज्यांचा देकार काँग्रेसने राष्ट्रीय स्वाभीमानातून नकारला आणि प्रांतिक स्वायतत्तेच्या प्रक्रियेत सहभागी होण्यास सशर्त मान्यता दिली होती.    या प्रक्रियेचा भाग म्हणून प्रांतिक निवडणुका व्हावयाच्या होत्या. आंतरराष्ट्रीय राजकारणात जोरदार तणाव आणि आगामी महायुध्दाचे ढग दिसत असल्याने स्फोटक परिस्थितीचा काँग्रेस ला परामर्श घेणे आवश्यक होते. ब्रम्हदेश, सरहद्द प्रांत तसेच स्पेनमधील परिस्थिती बाबत तसेच आंतरराष्ट्रीय धोरण ठरविण्यासाठी काँग्रेस ला ठाम भूमिका घेणे आवश्यक होते.

काँग्रेसच्या परिसीमेतील अखिल भारतीय किसान परिषदेच्या किसान व शेतीसुधारणेच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देऊन पक्षाची ध्येयधारणा निश्र्चित करायची होती. त्यासाठी घटना समितीचा आग्रह ब्रिटीशांकडे धरावयाचा होता.

अशा परिस्थितीत काँग्रेसचे अधिवेशन म्हणजे क्रियाशील विचार मंच व स्वराज्यासाठी झटणाऱ्या जनता जनार्दनांचा राष्ट्रीय मेळावा भरवण्याचा संकल्प होता आणि तो तसाच ठरणे जरूरी होते.

विशेष म्हणजे संकल्पापेक्षा सिध्दी अधिकच झाली,असे सरकारला मान्य करावे लागले.

खेड्यात भरणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाचा हा पहिलाच प्रयोग होता. राष्ट्रीय मेळाव्यासाठी लागणारी एकही सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे महाराष्ट्र प्रांतिक समितीपुढे हिमालयाएवढ्या समस्या उभ्या ठाकल्या. समस्या स्वाभाविक तितक्याच कठीणही होत्या. सोलापूर,नाशिक, आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही गावात दुष्काळ पडला होता. म्हणून स्थान निवडीपासून अधिवेशनाची सांगता होईपर्यंत समस्यांचे निराकरण कसे झाले हे बघणे उचित ठरेल.

संदर्भ:

बाँबे क्राँनिकल, १६ सप्टेंबर १९३६. कित्ता २५ मे १९३६
महाराष्ट्र राज्य गॅझेटियर जळगाव जिल्हा १९९४.

माहिती साभार  –

खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग १४

Leave a comment