महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 8,381,004

कवायती फौजेचा पगार

By Discover Maharashtra Views: 1538 6 Min Read

कवायती फौजेचा पगार –

गेल्या दोन लेखामध्ये आपण उत्तर मराठेशाहीतील मराठ्यांच्या फौजेच्या पगाराची माहिती घेतली. त्याच धर्तीवर या लेखात मराठेशाहीतील कवायती फौजेतील सैनिकांच्या पगाराबद्दल (कवायती फौजेचा पगार) थोडी माहिती घेऊ या.

इंग्रज लोंकांचे हिंदुस्थानात आगमन झाले ते खरे तर व्यापाराच्या निमित्ताने. पण थोड्याच काळात त्यांची राजकीय महत्वाकांक्षा जागृत झाली आणि त्यांनी हळूहळू हिंदुस्थानात आपले सैन्य उभे करायला सुरुवात केली. मराठेशाहीतील कवायती कवायती फौजेचा उद्गाता हे महादजी शिंदे होत. त्यांच्यापूर्वी सुद्धा काही मराठी सरदाराकडे थोड्या फार प्रमाणात बंदूकधारी सैनिक होते, परंतु त्यांचे प्रमाण प्रमुख फौजेशी तुलना करता अगदी नगण्य होते.उत्तर मराठेशाहीत कवायती फौज शून्यातून उभारून त्याचा पुरेपूर उपयोग करणारे सेनापती म्हणजे महादजी शिंदे. या कामासाठी त्यांनी फ्रेंच योद्धा डी बॉयन याची नेमणूक केली होती व त्यानेही मिळालेल्या संधीचे सोने केले होते.

महादजी शिंदे यांची अजिंक्य सेना:डी बॉयन हा फ्रांसमध्ये जन्मला पण त्याचे मन भारतात रमले. तो एक लष्करीरित्या परिपूर्ण असा अवलिया होता. फ्रान्समधून तो मध्य पूर्वेत आला, तेथे त्याने बऱ्याच लहान मोठ्या लढयात भाग घेतला व शेवटी तो त्याची स्वप्नभूमी(dreamland)भारतात आला. त्याची महादजीबरोबर योगायोगानेच गाठ पडली.महादजी हे खऱ्या अर्थाने रत्नपारखी असल्याने त्यांनी डी बॉयनचे गुण हेरून आपल्याकडे नोकरीला ठेवले. त्याच्याकडून महादजीनी कवायती फौज तयार करून घेतली व काही वर्षातच ती आशिया खंडातील एक अजिंक्य सेना म्हणून नावारूपाला आली.(कवायती फौजेचा पगार)

त्या काळात कवायती फौजेचे मुख्यतः तीन भाग असत. १.पायदळ(Infantry)२.तोफखाना(Artillery) व ३. घोडदळ(Cavalry). कवायती सैन्यामध्ये जे सर्वात लहान युनिट असे त्याला कंपनी म्हणत, त्यालाच मराठे  अपभ्रंश स्वरूपात ‘कंपू’ संबोधित. प्रत्येक दलातील सैनिकांची लढाई करण्याची पद्धती वेगवेगळी होती. त्यानुसार सैनिकांची, त्यावरील अधिकाऱ्यांची व इतर सेवा पुरविणाऱ्या लोकांची संख्या, त्यांचे हुद्दे व पगार भिन्न भिन्न होते.

कवायती फौजेतील सैनिकांचे वेतन: प्रत्येक दलातील सैनिकांची संख्या व त्यांचे स्वरूप याची तपशीलवार माहिती आपण आगामी लेखात घेणार आहोत. या लेखात सैनिकांचे व अधिकाऱ्यांचे हुद्दे व त्यांना मिळणारे मासिक वेतन यावर लक्ष केंद्रित करू या.

पायदळ(Infantry) : लोकांचे हुद्दे व त्यांचे मासिक वेतन खालीलप्रमाणे (रुपये)

हुद्दा             पगार                      पायदळातील अधिकारी, मदतनीस

_____________________________________________________________

सुभेदार             ४०                             कॅप्टन           २५०

जमादार            २०                              कमांडंट           २५०

कोर्ट हवालदार       १२ किंवा ८            अडज्युटन्ट जमादार ३०

हवालदार            १० किंवा ८              मेजर हवालदार    ३०

नायक              ८                                मेजर सार्जंट (युरोपिअन) ६०

ड्रम वाजविणारा      १२                             झेंडेधारी                १२

बासरी वाजविणारा    १२                             सर्जन            १०

भिस्ती                 ४                              लेखनिक          २५

शिपाई /सैनिक       ६                              हारकारे            ३

मेजर भिस्ती       ५

मस्क्वेट           ५

डी बॉयन याने शिंद्यांची कवायती फौज तयार करण्याआधी महादजींना व्यक्तिशः दोन अटी घातल्या होत्या असे म्हणतात.त्यातील पहिली अट म्हणजे त्याच्या सैन्याचा पगार दर महिन्याचा एक तारखेला न चुकता वेळेवर झाला पाहिजे आणि दुसरी अट म्हणजे इंग्रजाविरुद्ध तो कवायती फौज घेऊन लढणार नाही. महादजींनी या दोन्ही अटी मान्य केल्या. कवायती सेनेला दरमहा पगार मिळे तसा तो मराठयांच्या नियमित सैनिकांना मिळत नसे. त्यांचा पगार बऱ्याच वेळेस थकलेला असे. त्यामुळे साहजिकच मराठ्यांच्या सैन्यात कवायती फौजेबद्दल हेवा वाटे. याला दुसरीही बाजू होती, ती म्हणजे मराठी शिपाईचा लढाईचा कालावधी वर्षात ७-८ महिनेच असे.कवायती फौजेतील शिपाई हे कायम स्वरूपातील नोकर असत.

तोफखाना(Artillery): तोफखान्यातील लोकांचे हुद्दे त्यांच्या कामगिरीवर ठरविलेले होते व बऱ्याच वेळेस ते पायदळात सैनिकांपेक्षा निराळे होते. लोकांचे हुद्दे व त्यांचे मासिक वेतन खालीलप्रमाणे (रुपये)

हुद्दा                    पगार

सुभेदार गोलंदाज      ३५

हवालदार मेजर       १५

हवालदार कोर्ट        १२

हवालदार            १०

नायक              ९

युरोपिअन गोलंदाज    ४०

हिंदी गोलंदाज        ६,७ किंवा ८

तोफखान्यात खलाशी लोंकाची गरज पडे. त्यांचा पगार खालीलप्रमाणे:

सारंग          ९

तांडेल           ६ किंवा ८

भिस्ती          ४

खलाशी          ४ किंवा ५

तोफखान्यात बेलदारांची (गवंडी)भरती केली जायची. त्यांचा दरमहा पगार ४ रुपये व त्यांच्यावरील ठेकेदारला ५रुपये मिळत असत. त्याचप्रमाणे काही कुशल कामदार नेमलेले होते, त्यांचा पगार असा: लोहार व सुतार दरमहा ६रुपये, तबेलदार व बैलगाडीवान याना महिना ४ रुपये वेतन दिले जायचे.

घोडदळ(Cavalry): घोडदळातील सैनिकांचे पगार दरमहा रुपयांमध्ये असे होते.

जमादार               १८               रिसालदार           ६०

दफ्तारदार             १२                 नाईक              ३०

सैनिक घोडेस्वार          ८                    गुरेढोरे चारणारे       ७

रिसालदार, जमादार, घोडेस्वार इत्यादी हे पायदळाचा सुद्धा भाग होते आणि त्यांचा पगार जवळपास तेव्हढाच असे. घोडदळातील घोडयाना लागणारे गवत कापण्यासाठी वेगळे पगारी कामगार नेमलेले असत.

युरोपिअन लोकांची सैन्यातील मक्तेदारी:सैन्यातील काही जागा केवळ युरोपिअन लोकांसाठी राखीव ठेवलेल्या असत. कवायती फौजेत युरोपिअन लोंकाची मक्तेदारी स्पष्टपणे दिसून येते. हिंदुस्थानातील जनमानसावरील युरोपिअन लोकांच्या श्रेष्ठत्वाचा पगडा हा तीनशे वर्षांपासून अस्तित्वात आहे का? माहित नाही. कवायती सैन्यातील वरिष्ठ हुद्द्यावरील लोकांचे पगार फारच जास्त होते. लेफ्टनंटचा पगार २०० रुपये, कप्तानला महिन्याला ४०० रुपये, मेजर याला ५०० तर ब्रिगेडच्या मुख्याला महिना २००० रुपये मिळत असत. अर्थातच हे सारे युरोपिअन होते. वरच्या हुद्द्यावरील लोकांचे पगार चांगले असल्याने दरवर्षी ते बराच पैसा गाठी बांधत असत. युरोपला त्यांच्या गावी परत जाताना ते बरीचशी माया जमा करून निवृत्तीनंतरचे उर्वरित आयुष्य ते आरामात व्यतीत करीत असत. डी बॉयन हा फ्रांसला परत गेला तेव्हा त्याने ४० लाख रुपये आपल्या सोबत नेले असे इतिहासात नमूद केलेले आहे.

संदर्भ:ब्रिटिश रेकॉर्डस् ऑफ मराठा हिस्टरी,पुना रेसिडेन्सी करस्पॉन्डन्स, भाग१ संपादक:सर यदुनाथ सरकार

संकलन व लेखन: प्रमोद करजगी

Leave a comment