महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

कंकालेश्वर मंदिर, बीड

By Discover Maharashtra Views: 1226 3 Min Read

कंकालेश्वर मंदिर, बीड –

मराठवाडा, महाराष्ट्रातला काहीसा दुर्लक्षित असलेला भाग अशी हाक आपल्याला नेहमी ऐकायला मिळते. पण हा भाग तितकाच समृद्ध देखील आहे. मग तो भाषेच्या बाबतीत असो किंवा इतिहासाच्या आणि पौराणिक गोष्टीच्या बाबतीत. तिथल्या लेणी, प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू बघून मराठवाड्याला आपली ऐतिहासिक ओळख सांगायची गरज पडत नाही. याच ऐतिहासिक वारश्यात आणखी एक भर म्हणजे बीड शहरातील कंकालेश्वर मंदिर बीड.

असं म्हणतात की १० ते ११ व्या शतकात चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा याने हे मंदिर बांधले. चालुक्य काळातील स्त्रिया लढाईत प्रत्यक्ष भाग घेत असायच्या, त्यामुळे या मंदिरावर लढणाऱ्या स्त्रियांचे देखील शिल्पांकन करण्यात आलंय. या मंदिरात आणि त्यांच्या स्तंभावर ग्रीक शिल्पंकलेची छाप पहायला मिळते. हे मंदिर दशावतारी असून याला बीडच ग्रामदैवत सुध्दा म्हटलं जातं.

पुरातन भारतीय वास्तू कलेचा उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर चारही बाजूने पाण्याने वेढलेले आहे. ८४ मीटर चौकोनी आकाराच्या तलावाच्या मधोमध हे शिवमंदिर असून बिंदुसरा नदीच्या काठावर उभे आहे. मंदिरात जातांना पाण्यातून असलेले दगडी पुलावरून जावे लागते. उन्हाळ्यातही येतील पाणी पूर्णतः आटत नाही. चारही बाजूने भरभक्कम व नक्षीदार खांब या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.

कंकालेश्वर मंदिर हे पश्चिमाभिमुख असून मुखपंडप, त्याच्या मागे अर्धमंडप आणि या मंडपाला जोडून तीन बाजूंना अंतराळयुक्त गर्भगृहे असा या मंदिराचा तलविन्यास आहे. ही तीनही गर्भगृहे सारख्याच आकाराची असून त्यांचा तलविन्यास तारकाकृती आहे. या मंदिराचा मंडप अष्टकोनी आकाराचा आहे.

मंदिराच्या बाहेरील भागात विविध थर असून सगळ्यात खालचा थर चौकटच्या नक्षीने तर सगळ्यात वरचा थर कीर्तिमुखांनी अलंकृत केलेला आहे. मंदिराच्या बाहेरील अंगाच्या भद्रावरील देवकोष्ठांमध्ये शक्ती, ब्रह्मदेव आणि शिव संप्रदायातील देवदेवता आहेत. वर मंडोवरावरील जंघाभागात विष्णूचे दहा दशावतार आणि अष्टदिक्पाल दाखविले आहेत.

मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात सुंदर अशी भगवान महादेवाची पिंड आहे. आत जातानाच मोठा नंदी आहे. उजव्या बाजूच्या गाभाऱ्यात प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाच्या तीन मनमोहक आशा मुर्त्या दिसून येतात. डाव्या बाजूला संकटमोचक हनुमानाची मूर्ती लक्ष वेधून घेते.

मंदिराचा आकार स्टार फिशप्रमाणे असून मंदिराच्या मंडपाखाली आणखी एक गर्भगृह आहे. ते अनेक वर्षांपासून बंद आहे. कंकालेश्वर मंदिर अनेक वर्षे बंद होते. पुढे महाशिवरात्रीच्या जत्रेलाही बंदी घालण्याचा निर्णय निझामाने घेतला. १९१५ मध्ये क्रांतिकारी तरुण पुरुषोत्तम गोडसे याने निझामाला भीक न घालता पोलिसांचे कडे तोडून कंकालेश्वर मंदिरातील पिंडीला अभिषेक केला. १७ सप्टेंबर १९४८ अर्थात हैदराबाद स्वातंत्र्यदिनी हे मंदिर खऱ्या अर्थाने मुक्त झाले.

©️ रोहन गाडेकर

Leave a comment