खंडेश्वरी माता मंदिर, बीड

खंडेश्वरी माता मंदिर, बीड

खंडेश्वरी माता मंदिर, बीड –

ऐतिहासिक व सांस्कृतिक वारश्याने समृद्ध असलेल्या मराठवाड्यातील बीड शहरात पूर्वेला टेकडीवर खंडोबा मंदिरापासून सुमारे एक किमी अंतरावर खंडेश्वरीचे प्राचीन देवालय उभे आहे. असे म्हणतात की कालोजी नामक धनगराने हे मंदिर बांधले. नवसाला पावणारी देवी म्हणून परिसरात खंडेश्वरी मातेची ख्याती असून नवरात्रात येथे मोठी यात्रा भरते.(खंडेश्वरी माता मंदिर, बीड)

बीड शहरातील खंडोबा मंदिराच्या टेकडीच्या बाजूला दक्षिणाभिमुख खंडेश्वरी मातेचे प्राचीन देवालय आहे. मंदिर प्रकारात असून सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. गर्भगृहात एका चौथऱ्यावर खंडेश्वरीचा शेंदूर लावलेला तांदळा आहे. हे मंदिर काळोजी नामक धनगराने बांधले असे सांगितले जाते. खंडोबा मंदिराचे टेकडी पायथ्याचे स्थान व खंडेश्वरी नावावरून हे बाणाईचे स्थान असावे असे वाटते. या मंदिरा समोर काळोबा वीर धनगराची समाधी आहे.

खंडेश्वरी मातेच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी केला आहे. जागृत देवस्थान असलेल्या खंडेश्वरी देवी संदर्भात आख्यायिका सांगितली जाते. एका मेंढपाळाने रेणुका मातेची मनोभावे पूजा केली, त्यामुळे प्रसन्न झालेल्या रेणुका मातेने वर माग म्हणून सांगितले, तेव्हा देवी तू माझ्या सोबत चल असं मेंढपाळ म्हणाला. मात्र मी तुझ्या पाठीमागे येते पण तू परत फिरून पाहायचं नाही. ज्या ठिकाणी तू परत फिरून पाहशील त्याच ठिकाणी मी राहील, असं मेंढपाळाला वचन दिलं. मेंढपाळ चालत असताना देवी खरच आपल्या पाठीमागे आली का ? हे पाहण्यासाठी त्याने मागे वळून पाहिले, तेव्हा वचनाचा भंग केला म्हणून देवी बीड शहराच्या उत्तरेस, त्याच ठिकाणी थांबली. वचनभंग झालं आणि सेवेत खंड पडला म्हणून खंडेश्वरी असं नाव रुढ झालं.

नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येने जिल्हाभरातून भाविक खंडेश्वरी मातेच्या दर्शनासाठी येत असतात. नऊ दिवस मंदिरात विविध कार्यक्रम साजरे होतात. जवळच काही अंतरावर प्राचीन खंडोबा मंदिर असून हे मंदिर राज्य पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. बीड शहरातील कंकालेश्वर मंदिर, खंडोबा टेकडीवरील खंडेश्वरी माता मंदिर व खंडोबा मंदिर ही तीन प्राचीन मंदिरे आपण एका दिवसात आरामात पाहून, ऐतिहासिक वारसा स्थळांना भेट दिल्याचा आनंद घेऊ शकता.

©️ रोहन गाडेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here