काली | आमची ओळख आम्हाला द्या

काली

काली | आमची ओळख आम्हाला द्या –

धर्मापूरी येथील केदारेश्वराच्या मंदिराच्या मंडोवरावर ज्या पद्धतीने विष्णूच्या संहार रूपातील मूर्ती आहेत त्याच पद्धतीने एका स्त्रीदेवतेचे संहार रूपातील मूर्तीशिल्प या ठिकाणी आहे. काही मूर्तीतज्ञांनी हे शिल्प विष्णूच्या मोहिनी रूपातील संहार शिल्प आहे असे अनुमान काढून हि मोहिनी आहे असे घोषित केलेले होते.जी स्त्रीदेवता आहे ती मोहिनी रूपातील विष्णू व जो राक्षस आहे तो भस्मासुर आहे, असे मत मांडले .परंतु एकंदरीत काली मूर्तीचे निरीक्षण केल्यास ही मूर्ती रूरू राक्षसाच्या वधाच्या प्रसंगाची आहे असे स्पष्टपणे दिसून येते.

केदारेश्वर मंदिराच्या मंडोवरावर कालीचे हे मूर्तिशिल्प आहे. यामध्ये काली राक्षसाचा वध करत असल्याचे अंकन केले गेले आहे.काली चतुर्भुज असून प्रदक्षणा क्रमाने डाव्या खालच्या हाताने रूरू राक्षसाच्या चेहऱ्याची कातडी सोलून काढण्यासाठी  धरलेला आहे. वरचा हात भंगला असून, उजव्या वरच्या हातांनी रूरुराक्षसाच्या शस्त्रधारी हाताला तिने रोखून धरले आहे. उजव्या खालच्या हाताने रूरु राक्षसाची कवटि धरलेली आहे. किरिटमुकुट, चक्राकार कुंडले, स्तन हार ,बाजूबंद, कटीसूत्र अतिशय रेखीव पद्धतीने कोरले गेले आहे.

कालीच्या गळ्यामध्ये नरमुंड माला असते, पण या ठिकाणी वनमाला सदृश्य माला आहे. पायात  पादवलय व पादजालक आहेत. चेहरा उग्र दाखवला असून तिच्या चेहऱ्यावरील उग्रता अधिक तीव्र आहे हे दाखविण्यासाठि  तिचे सुळे दात बाहेर आल्याचे अंकन केलेले दिसून येते.रूरू राक्षस द्विभूज असून त्याने उजव्या हाताने देवीवर खडक उगारले आहे. तो हात देवीने वरच्यावर रोखून धरला आहे, डावा हात समोर असून त्यामध्ये शस्त्रा सारखी काहीतरी वस्तू दिसते. राक्षसाच्या गळ्यात हार ,ग्रीवा कटिसूत्र, पादवलय    इत्यादी आभूषण आहेत. कालीने अतिशय क्रोधानं रूरू राक्षसाची कवटी वरच्या हाताने धरली असून खालच्या हाताने चेहऱ्यावरील मांस अक्षरशा खेचून काढले .मांस खेचून काढल्याने रूरू राक्षसाच्या कवटीतून त्याचे डोळे बाहेर पडल्याचे अतिशय उग्र स्वरूपाचे चित्रण याठिकाणी केलेले आढळते.

चेहऱ्यावरील मांस खाली गोळा झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. चेहऱ्यावरील मांस सोलून काढतानाच्या  वेदना त्याच्या चेहर्यावर दाखवण्यासाठी त्याचे तोंड वासलेले दाखवणार्‍या या कलाकृतीला सलाम केल्यावाचून राहवत नाही. चेहऱ्यावरील मांस सोलून काढल्यानंतर कवटि  कशी दिसते तशी कवटी  रूरू राक्षसाची दिसून येते.  कालीने त्याची कातडी सोलताना त्याची होणारी तडफड दाखवण्यासाठी त्याचा डावा पाय पूर्णता दुमडलेला दाखवला गेला आहे. रूरू राक्षसाच्या वधाचे असे शिल्प इतर मंदिरावर मिळणे ही दुर्मिळ बाब आहे. परंतु तरीदेखील शिल्पांच्या अभ्यासा निमित्त प्रस्तुत मूर्ती शिल्पाची ओळख पटली याचा मनस्वी आनंद होत आहे.

मंदिरांचा अभ्यास करत असताना केदारेश्वराच्या मंदीराला भेट दिल्यानंतर आम्ही या मूर्तीचे बारकाईने निरीक्षण केले. सर्वप्रथम ही मूर्ती कोण्यातरी स्त्री देवतांची असावी असा आमचा प्राथमिक अंदाज होता. विष्णूच्या संहार रूपातील ही स्त्री देवता आहे असे जे म्हटले गेले. त्याला कोणताच आधार मिळाला गेल्या नसल्याने आम्ही या मूर्तीची अतिशय बारकाईने कसून तपासणी केल्यासारखी तपासणी केली .

शेवटी ही मूर्ती कोण्या एका देवतेची असावी असा अंदाज काढला. मग ती कोणती देवता असावी? आमच्यामधील चर्चेचा सूर निघाला हि देवता कालीच आहे. परंतु राक्षस कोण आहे? हे ठामपणे सांगता येत नव्हते. परंतु आमचे सहकारी मित्र लक्ष्मीकांत सोनवटकर  यांनी अनेक ग्रंथांमधून शोध घेऊन काली वध करत असलेला हा राक्षस रूरूच आहे यावर शिक्कामोर्तब केला आणि मग शेवटी आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो की हा मोहिनी रूपातील विष्णु नसून रूरू राक्षसाचा वध करणारी कालीच आहे.अशा अनेक मूर्ती आहेत की ज्या अभ्यासकांना साद घालत आहेत.आदरणीय गुरूवर्य मूर्तीतज्ञ प्रदीप म्हैसेकर दादा यांच्यासमवेत व प्रा.संजय पाईकराव,डाँ.झाकीर पठाण सर वारंवार चर्चा करून हि कालीच आहे हे पक्के झाले.शेवटि आमचे मित्र मयुरेश खडके यांनी ऐनवेळी छायाचित्र उपलब्ध करून दिले त्यावद्दल सर्वांचे आभार

डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here