महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

जावळी मोहीम ६

By Discover Maharashtra Views: 1251 4 Min Read

जावळी मोहीम ६ –

महाबळेश्वर – रडतुंडीघाट -मेटतळे – कोयनेचा दगडी पूल – पार – पारसोंड – (पारघाट + पांडवदरा + बाराखंडीची वाट ) – कोंडोशी – कुडपण – म्हारखिंड – वडगाव (जावळी मोहीम ६)

गेल्या वर्षी होळीच्याच दिवशी “महाबळेश्वर – निसणीवाट – पार – पारघाट -किनेश्वर” असा मोठा टप्पा सर केला होता, त्यावेळीच या मोहिमेचा नकाशा डोक्यात घोंगावू लागला होता. तसे पाहता कुडपण ते प्रतापगड हा एकदिवसीय ट्रेक खूप आधी केला होता पण त्यावेळी पूर्ण कोकणात उतरणे झाले नव्हते.

या वर्षी रडतुंडीघाट आणि कुडपण ते वडगाव ( निगडे घाटाने किंवा म्हारखिंडीने ) या दोन मोहीमा करायचे योजले होते. शेवटी दोन्ही घाटवाटा एकाच मोहिमेत सर झाल्या.

मोहिमेची सुरवात महाबळेश्वर पासून झाली, रडतुंडीघाट मुखापाशी पोहचण्यासाठी सध्याचा डांबरी रस्ताने जवळपास २ किमी चालावे लागते, इथे वाटेत जुने दगडी बांधकाम लागले, पुढे घनदाट रानात रडतुंडीघाट सुरु झाला, हा तर राजमार्ग, व्यवस्थित दगडी पायऱ्या, जिथे वळण असेल त्या ठिकाणी दगडी बांधकाम आणि बांधून काढलेला रस्ता जागोजागी दिसतो. घाट उतरताना समोर प्रतापगड आणि डाव्या हाताला मधू मकरंदगड ठेवत आपण महाबळेश्वर चा घाटमाथ्यावरून जावळीच्या अरण्यात खाली उतरतो. थोडे खाली उतरलो कि मेटतळे गाव लागते इथे पुन्हा आपण डांबरी रस्त्यावर येतो आणि पुढच्या पाच मिनिटात रस्ता सोडून पुन्हा पायवाटेला लागतो. जवळपास १ ते दीड तासाच्या चाली नंतर आपण पार जवळच्या कोयनेवरच्या जुन्या दगडी पुलापाशी पोहचतो.

इथून पुढे पार गावी जाताना पुन्हा उजव्या बाजूस जुने कमानीचे बांधकाम दिसले, गावकऱ्यांच्या मते हे स्मशानाचे जुने बांधकाम असावे. आई रामवरदायिनी चे दर्शन घेऊन पारसोंडेवरच्या मंदिरापाशी पोहचलो. वाटेत डाव्या बाजूस पाण्याचे टाके लागते. या टाक्याचे पाणी अप्रतिम आहे, थोडे आडवाटेवर असल्याने लक्ष्यात येत नाही. पारसोंडेवरुन मंदिराच्या मागे सरळ वाटेने, डोंगरच्या अगदी कडेने, एकावेळी एकच माणूस जाऊ शकेल अश्या वाटेने प्रतापगडाच्या अगदी समोरच्या डोंगराच्या माथ्यावर आलो, डाव्या बाजूस खाली कुमठे दिसत होते, खरेतर कुमठे मधून शेलारखिंड मार्गे सरळ कुडपण ला जाता येते पण आम्हास पारसोंड करायची होती आणि त्यामुळे संपूर्ण वळसा घालून कुडपण ला पोहचायचे होते, डोंगरच्या माथ्याला ओलांडून पलीकडे कोंडोशी च्या वरच्या अंगास आलो,या डोंगररांगेच्या कड्यावरून जाताना कोकणात उतरणारी – पारघाट , पांडवदराघाट आणि बारखंडीची वाट स्पस्ट पाहता येते.

कोंडोशी ते कुडपण हा अगदी offbeat सह्याद्री चा भाग, इथून खाली दूरवर कोकणात उतरलेल्या सह्याद्रीच्या रांगा आणि कडे दिसू लागतात, शेवटच्या चढ चढलो आणि पुढे तीन ते चार डोंगरांना वळसा घालून एकदम खाली कुडपण ला उतरणाऱ्या वाटेला लागलो. कुडपण ला पोहचायला अंधार झाला.

दुसऱ्या दिवशी पुन्हा कुडपण ते म्हारखिंड हा चढ चढून खिंडीच्या माथ्याशी आलो, इथून पाठीमागे शेलारखिंड आणि पुढे कोकणातला सुमारगड दिसत होता, खिंडीच्या डाव्या बाजूच्या डोंगराच्या माथ्यापाशी सुद्धा पाण्याचे टाके आहे. खिंडीची वाट थेट कोकणात वडगाव ला उतरते, वाट मळलेली असली तरी राबता कमी आहे, जवळपास २ ते ३ तास उतरायला लागतात.

थोडक्यात – महाबळेश्वर ते पार , पार ते प्रतापगडच्या समोरचा डोंगर , पुन्हा तिथून खाली कुडपण, कुडपण ते म्हारखिंड, पुन्हा इथून खाली कोकण असे ५ वेळा वर खाली / वर खाली करत ३० किलोमीटर ची हि ट्रेक संपन्न झाली.

वाटाड्या शिवाय हा ट्रेक करू नये. जवळ rope असावी, तसेच पहिल्या दिवशी वेळेचे भान ठेवावे, कुड्पणतात उतरणारी वाट अंधारात करू नये , पार पासून पुढे ४ तासाचे गणित जुळत असेल तरच वळसा घालून यावे अन्यथा सरळ कुमठ्याच्या खिंडीने कुडपण गाठावे.

Kiran Khamkar

Leave a comment