जाधव भोसले कलह

Vishrambagwad

शिवकालीन महाराष्ट्र (सन १५९९ ते १६८०) भाग ७

जाधव भोसले कलह

निजामशाहीमधे घडलेली एक घटना आपल्यासमोर त्यावेळच्या मानसिकतेचे चित्र उभे करते. ही घटना शाहजी राजांच्या विवाहानंतर काही वर्षांनी झाली असावी. निजामशाहचा दरबार संपल्यानंतर सर्व सरदार त्यांच्या जमावाबरोबर बाहेर पडत होते. त्यावेळी असलेल्या गडबडीमुळे किंवा इतर काही कारणाने सरदार खंडागळ्यांचा एक हत्ती बिथरला व धावत सुटला. वाटेत येणाऱ्या लोकांना ठेचत व सोंडेने फेकत ते धूड गर्दीतून धावू लागले. त्या बेधुंद झालेल्या हत्तीसमोर जायची कोणाची छाती होत नव्हती.

ह्या साऱ्या कोलाहलात सरदार लखुजी जाधवांचा मुलगा दत्ताजी त्या ठिकाणी पोहोचला. त्याने त्याच्या मावळ्यांना हत्तीला जेरबंद करायला सांगितले. पण हत्ती काही त्यांना ऐकेना. रागाने लाल झालेल्या दत्ताजीने एकदम त्या हत्तीसमोर उडी घेतली. तेवढ्यात विठोजी भोसलेंचा मुलगा संभाजी तिथे आला व दत्तीजीला थांबवू लागला.
पण दत्ताजी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्याने तलवारीच्या एका झटक्यात हत्तीची सोंड कापली. आर्त आवाजात किंचाळत हत्ती तेथून निघुन गेला. दत्ताजी एवढ्याने थांबला नाही. त्याला थांबवणाऱ्या संभाजीवर त्याने तलवार उगारली.
हे पाहून भोसले – जाधव समर्थकांमधे खडाजंगी सुरू झाली. दत्ताजीला हेही भान राहिले नाही की संभाजी हा त्याच्या मेहुण्याचा भाऊ होता. संभाजीला स्वतःच्या बचावासाठी तलवार उगारावी लागली. पण त्यात संभाजीच्या हातून दत्ताजी मारला गेला.
शिवकालीन महाराष्ट्र (सन १५९९ ते १६८०) भाग ७

त्याचे वडील लखुजी जाधव हे सगळे सुरू होण्याआधी तिथून गेले होते. दत्ताजीच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासरशी त्यांच्यापर्यंत पोहोचली. लखुजी तिथे गेले तोवर दोन गटांमधे रणकंदन चालूच होते. त्या गर्दीत त्यांना शाहजी राजे दिसले. मुलाच्या मृत्यूने बेभान झालेल्या लखुजीने प्रत्यक्ष जावयावर वार केला. दैवयोगाने तो त्याच्या खांद्यावर बसला व तो मूर्छीत होऊन पडला.
मग लखुजीने जवळच लढणाऱ्या संभाजीकडे मोर्चा वळविला. सोयरीक झालेल्यांच्या तलवारी भिडल्या व एका जाधवासाठी एक भोसले पडला – संभाजी गतप्राण झाला. लखुजी भानावर आले व अचानक सुरू झालेले रणकंदन शांत झाले. निजामापर्यंत ही सगळी बातमी गेली. त्याने दोन्ही गटांचे सांत्वन केले व त्यांना शांत राहण्यास सांगितले. हे सगळे एका वेड लागलेल्या हत्तीपायी झाले !

काय म्हणावे ह्याला – बिथरलेल्या हत्तीवर चालून जाणाऱ्या दत्ताजीच्या हिमतीचे कौतुक करावे का स्वतःच्या नातलगावर चालून गेला म्हणून त्याला दूषण द्यावे. ह्या घटनेमुळे जिजाबाईनी भाऊ गमावला व एक दीरही. त्यांना माहेर कायमचे परके झाले.

#संदर्भग्रंथ
राजा शिवछत्रपती, पृष्ठ ५४-५७.
मराठ्यांचा इतिहास – खंड १, पृष्ठ ९४-९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here