सरदार वाघमोडे घराण्याचा इतिहास
अतिप्राचीन काळापासून हट्टी लोकांमध्ये चंद्रवंशी (चंद्र-उपासक) यांची परंपरा आहे. वाघमोडे घराणे हे चंद्रवंशी असून यदु/यादवा या अतिप्राचीन टोळीसंघ/कुळातील आहे. वाघमोडे या शब्दाची व्युत्पत्ती वाघाला मोडणारे अशी असावी. वाघ म्हणजे प्राणी कि प्रवृत्ती हे नक्की सांगता येणार नाही.
प्रस्तुत माहिती हि श्री. संतोषराव पिंगळे यांच्याकडून प्राप्त झालेली आहे.
* वाघाप्रमाणे धूर्त,शूर,व बलिष्ठ अशा शञूचा वा प्रतिस्पर्ध्यांचा मोड करणारा तो वाघमोडे अशा प्रकारे वाघमोडे आडनावाची व्युतपत्ती लावता येते. दंतकथा आख्यायिका व सामाजिक परंपरा भाविक लोकांच्या श्रद्धांनुसार भगवान शंकराने श्री महांकाळेश्वर म्हणजे ग्रामीण रूढ भाषेत धुळेश्वर उर्फ धुळोबा अवतारात माळशिरस येथील वाघमोडे नावाच्या राजाच्या मुलीशी विवाह केला होता. अशा आख्यायिका सांगितल्या जातात. काही धनगरी ओव्यांमध्ये ही या विवाहाची कवने गायलेली दिसतात.
* इतिहास- या कथांमधील अस्सल ऐतिहासिक साधनांशी जुळणारी गोष्ट एवढीच ती म्हणजे मौजे माळशिरस (सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याचे ठिकाण) मराठेशाही अखेरपर्यंत वाघमोडे घराण्याकडे पाटील वतनात राहिले. ब्रिटिश काळातही ही पाटीलकी वाघमोडे यांच्याकडेच असावी. यावरून या घराण्याचे प्राचीनत्व लक्षात येते. बहामणी सुलतानशाहीच्या काळातही या घराण्याची पाळेमुळे महाराष्टृातील अनेक गावांशी जोडली गेलेली दिसतात. माळशिरस तालुक्यातील मौजे माळशिरस, मौजे फोंडशिरस ,भांबूर्डी, उदरे इंदापूर तालुक्यातील बोरी, लासुर्णे अशी अनेक गावे वाघमोडे यांच्याकडे सुलतानशाही अथवा त्याही पूर्वीपासून पाटील वतनात चालत आलेली आहेत.
* कर्यात दहिगाव (आजचा माळशिरस तालुका) प्रांत माण येथील सरपाटीलकीचे वतन ही वाघमोडे यांच्याकडे वंशपरंपरेने चालू होते. शिवाय मौजे वढु खु ता सांडस प्रांत पुणे या गावची अर्धी पाटीलकी ही वाघमोडे यांनी त्या गावच्या भोंडवे पाटलांकडून तिच्या वडिलपणाच्या हक्कासह विकत घेतली होती. (म्हणजे पहिला मान वाघमोडे यांचा तर दुसरा भोंडवे यांचा) पुढे ती वाघमोडे यांनी हिंगणगावच्या सरदार थोरातांना विकत दिली. इ.स.वी सन १६२५ च्या एका अस्सल ऐतिहासिक पञानुसार इंदापूर तालुक्यातील बोरी गावाचा पाटील भगताजी वाघमोडे लढाईत कामी आल्याची नोंद सापडते. ते पञ कोणी पाठवले? कोणती लढाई? याचा उल्लेख मिळत नाही. पण ते पञ भगताजी पाटील वाघमोडे यांच्या पत्नी गोदुबाई वाघमोडे यांना पाठविण्यात आल्याचे पञावरून कळते.
* इ.स.वी.सन १६९१ मध्ये राजाराम महाराज जिंजी येथे असताना जानराव वाघमोडे नावाच्या एका सरदाराने मसूरच्या महादजी जगदाळे देशमुख यांना त्यांचे देशमुखीचे वतन दुमाले करून देण्यास जी मदत केली. त्याबद्दल जगदाळे यांनी वाघमोडे यांना भाऊ मानून आपल्या देशमुखीतील चार गावे १ मौजे आरवी २ मौजे नागझरी ३ मौजे किरोली ४ मौजे कोपरडे या चार गावचे देशमुखी वतन हक ताजिमा ,इनाम व धार सेव व पहिले पान जे पूरातन चालत आले त्याप्रमाणे लेकराचे लेकरी वंशपरंपरेने चंद्र सूर्य असेपर्यंत करार करून दिले. त्याबदल्यात वाघमोडे यांनी जगदाळे यांची पाठ राखावी असे ठरले. हा जानराव वाघमोडे मौजे फोंडशिरस या गावचा पाटील असल्याची नोंद या वतनपञात दिसते.
महाराणी ताराराणी यांच्या काळात सरदार निंबाजी वाघमोडे यांचा प्रामुख्याने उल्लेख होतो. सरदार निंबाजी यास “सेनाबारासहस्ञी” असा किताब असल्याची नोंद सापडते. हा किताब वाघमोडे यांना राजाराम छञपती अथवा बहामनी सुलतानांकडून देण्यात आला असावा. कारण मुस्लिम दरबारातील अनेक मातब्बर सरदार जेव्हा पक्ष बदलून छञपतींना सामील होत. त्यावेळी त्या सरदाराचा पूर्वीचा मानमरातब ,किताब वगैरे कायम राखल्याचे दिसून येते.
छत्रपती शाहू मोघलांच्या कैदेतून सुटून महाराष्ट्रात आल्यावर छञपतींच्या गादीसाठी त्यांच्यात व महाराणी ताराराणी यांच्यात वारसा कलह निर्माण झाला. त्यावेळी वाघमोडे सरदारांच्यातही भाऊबंदकी सुरू होऊन वाघमोडे सरदारांचे काही वारसदार महाराणी ताराराणी यांच्याकडे तर काही छञपती शाहूंना जाऊन मिळाल्याचे दिसून येते. महाराणी ताराराणी यांच्या पक्षाला चार बंधू राहिले त्यांना ताराराणी यांनी इ.स.वी सन १७०७ च्या सुमाराला संरंजाम दिल्याची नोंद सापडते.
तर याच काळातील एका राजपञात ताराराणी यांनी वाघमोडे सरदारांना आपआपला सरंजाम वाटून घेण्याचे आदेश दिलेले दिसतात. या राजपञावर ताराराणी, रामचंद्रपंत अमात्य व आणखी एक शिक्का दिसून येतो. ज्या सरदारांचे नावे हे राजपञ दिसून येते त्यांची नावे अशी ‘हिंदूराव’, ‘यशवंतराव’, ‘राणोजी’ व ‘तुकोजी’ असल्याचे दिसून येते. अर्थातच हिंदूराव व यशवंतराव नावे नसून किताब आहेत.
माहिती सौजन्य- श्री. संतोषराव पिंगळे