हिरकणी टोक | Hirkani Tok

हिरकणी टोक

हिरकणी टोक –

रायगडाच्या प्रत्येक फेरीत माझे हिरकणी टोकावर जाण्याचे राहून जायचे. हजारो एकर क्षेत्रफळ असलेल्या रायगडाच्या माथ्यावर हिरकणी टोक वगळता बाकीच्या सगळ्या भागात फिरून आलेलो होतो. यावेळी रायगडावर गेल्यावर पहिले हिरकणी टोक बघून घ्यायचेच असे ठरवून टाकले होते. गडावर पोहोचल्यावर बालेकिल्ल्यातून मेणा दरवाजातून बाहेर पडलो आणि वापरात नसलेली विश्रामगृहे मागे टाकून हिरकणी टोकाकडे जाऊ लागलो. कोणाच्या नजरेस पडायला नको अशीच इच्छा होती कारण एकटा असल्यामुळे जाऊ दिले नसते. तसला अनुभव काही वेळापूर्वीच रायगड चढताना अंधारी गुहांकडे जाताना विचारले तेव्हा येऊन गेला होता. मात्र आता पूर्ण तयारी करून निश्चयाने आणि जबाबदारीने हिरकणी टोकाकडे जाऊ लागलो.

हिरकणीची गोष्ट सांगायची गरज नाही. मात्र हिरकणीची गोष्ट इतकी प्रसिद्ध असून रायगडावर येणाऱ्या बहुतांश लोकांना हिरकणीचा बुरुज कुठे आहे हे माहीत नसते. कारण हिरकणी बुरुज अगदी एका टोकाला, लांब आणि अतिशय निर्जन जागी आहे. तिकडे फार फार कमी जण जातात. एकतर माहितीच नसते आणि असली तरी तिकडे जाणे होत नाही. रायगडावर माझ्यापेक्षाही अधिक, कितीतरी वेळेस येऊन गेलेल्या अनेकांचे हिरकणी टोक बघायचे राहिले आहे. राज्याभिषेकाच्या कार्यक्रमावेळी गडावर लाखो लोक असतात मात्र इथे फार वर्दळ नसते. हिरकणी टोक हे रायगडाचे पश्चिम टोक. त्याच्यावर जाणे वेळखाऊ आणि थोडेसे दमवणारे आहे.

बालेकिल्ल्यापासून सुमारे बाराशेहून अधिक फूट दूर, अंदाजे दोनशेहून अधिक फूट खाली हिरकणी बुरुज आहे. तीन टेकड्या उतरून (आणि चढूनही) तिथे जाता येते. पुस्तकांमध्ये लिहिलेलं असतं तसं पालखी दरवाजाकडून गचपणातून जाण्यापेक्षा मेणा दरवाजातून बाहेर पडून तिकडे जाणे अधिक सोपे वाटते. जाताना पहिली टेकडी लागल्यावर तिथेच हिरकणी बुरुजाचा बोर्ड लावलेला आहे पण तिथून प्रत्यक्ष बुरुज बराच लांब आहे. काही लोकं तर या बोर्डपासूनच परतलेली आहेत. चालत असताना डावीकडे मोकळा उतार आहे आणि त्याच्या खाली लगेच रायगडाचा सरळसोट कडा आहे. जाताना उजव्या हाताला बुजलेले टाके आणि कोरडा असलेला बांध घातलेला हिरकणी तलाव दिसतो. पुढे उतरण्यासाठी कातळात कोरलेल्या तीसचाळीस पायऱ्या आहेत. आपण शेवटी टोकापर्यंत आलो असे वाटताच खाली अजून एक टप्पा दिसतो आणि शेवटी हिरकणी बुरुजाचा तट दिसायला लागतो. पाठीवर जड बॅग आणि उन्हामुळे मी थोडा थकलो होतो. वाळलेल्या गवतामुळे वाटा बुजलेल्या होत्या. एकदोनदा थोडासा घसरलोही. शेवटच्या बुरुजापाशी उतरताना कमालीची काळजी घ्यावी लागते. फोटोत दिसते त्यापेक्षा थोडी अवघड जागा आहे. इथे विजेचे खांब आणि तारा लावलेल्या असल्यामुळे फोटोत या जागेचे दुर्गमपण कळून येत नाही. प्रत्यक्षात आल्यावरच कळते.  ते खांब आणि तारा नजरेला खटकतात.

हिरकणी बुरुज म्हणजे बुरुजासारखा बुरुज नसून तट आहे. इथे तीन तोफा आहेत. बऱ्याच वर्षांपूर्वी काही हरामखोरांनी हिरकणी टोकावरून तोफा खाली लोटल्या होत्या असे काही जुन्या पुस्तकांत वाचलेले आहे. हिरकणी टोकाच्या बाजूच्या खळग्यात अजून दोन तोफा आहेत. तटावर हनुमान आहे. अशा निर्जन जागी रात्रीबेरात्री पहारा देणाऱ्या पहारेकऱ्यांना एक मानसिक आधार म्हणून असे हनुमानाचे शिल्प कोरले जायचे. राजगडाच्या सुवेळा माचीच्या शेवटच्या बुरुजावरही असे हनुमानाचे शिल्प आहे. जवळ अजून एक बुजलेले टाके आहे. तटावरून खाली बघितले की राकट दृश्य दिसते. इथून रायगडाच्या चढाईचा मार्ग, चितदरवाजाची खिंड, खुबलढा बुरुज, वाळसुरे खिंड, रायगडवाडी, गोदावरीची समाधी, छत्र निजामपूर वगैरे असा सगळा भाग दिसतो आणि रेंजमध्ये येतो. मोक्याची जागा आहे. रायगड चढताना हिरकणी टोक दिसत राहते. हिरकणी बुरुजाच्या तटाखालचा कातळ एकदम तासून सरळसोट केलेला आहे. हा कडा गेल्या चाळीस पन्नास वर्षात अनेकांनी उतरला आणि चढला आहे. गोनीदांनी वयाच्या पन्नाशीत धोतर घातलेलं असताना बिना साहित्याचं हा कडा चढून गेले होते. हिरकणीची कथा जर खरी असेल, तर मला खूप ती इथून सरळ खाली रायगडाच्या चढाईच्या मार्गावर न उतरता इथून थोडंसं डावीकडे असणारा भयानक कडा उतरली असेल. कारण इथून खाली पहारा असलेला चढाईचा मार्ग आहे तसा डावीकडच्या बाजूला नाही आणि हिरकणीची वस्तीही त्या बाजूला आहे. अर्थात सर्व कल्पना.

हिरकणीची कथा ही आख्यायिका आहे. आख्यायिकांना लिखित पुरावा नसतो. हिरकणीची गोष्ट खरी की खोटी सांगता येणार नाही. रायगडावर आणि परिसरात अनेक आख्यायिका आहेत. इतर आख्यायिकांसारखी हिरकणीची आख्यायिका अगदीच अविश्वसनीय नाही. ज्याला मानायचे तो मानू शकतो. महत्त्वाचे म्हणजे रायगडावरच्या या हिरकणी टोकाचे उल्लेख पेशवेकालीन कागदपत्रांत आहेत. या भागात सदर असल्याचाही उल्लेख आहे. पण हेही खरे की या उल्लेखांमुळे हिरकणीच्या कथेला आधार मिळत नाही. ते काहीही असो, लहानपणापासून हिरकणीची गोष्ट ऐकत आलो आहे. महाराष्ट्रातील सांस्कृतिक जीवनाचा ती एक अविभाज्य भाग झालेली आहे.

अशा ठिकाणी पहिल्यांदाच एकट्याने जाणे तसे योग्य नाही. पण माझा नाईलाज होता आणि मी पूर्ण तयारी करून सावधगिरी बाळगून जाऊन आलो. आपल्या क्षमतेवर योग्य विश्वास हवा. तिकडे जाताना येताना एकदोनदा वाटून गेले की काय काय करावं लागतं… पण हिरकणी टोकावर जाऊन आल्यानंतर रायगडावर अजून एक ठिकाण एकटा बघायला गेलो त्यावेळचा अनुभव तर याहून विलक्षण होता…

– प्रणव कुलकर्णी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here