महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

वेळापुरची अप्रतिम हर गौरी मुर्ती

By Discover Maharashtra Views: 1224 2 Min Read

वेळापुरची अप्रतिम हर गौरी मुर्ती (शिवपार्वती) –

शिवाची पूजा मुर्ती रूपात कुठेच केली जात नाही. पण वेळापुर (ता. माळशिरस, जि. सोलापुर) हे एकमेव मंदिर आहे जिथे शिव मुर्तीरूपात पार्वती सोबत पुजला जातो. स्थानिक चुकीने या मुर्तीला अर्धनारी नटेश्वर या नावाने संबोधतात. प्रत्यक्षात ही एक मुर्ती नसून उमा महेश्वराची संयुक्त मुर्ती आहे. यादवांच्या काळातील १३ व्या शतकातील हे प्राचीन मंदिर. महादेवाच्या शाळुंकेवर पिंड असावी तशी ही हर गौरी मुर्ती शिल्पांकित केली आहे.

शिवाच्या उजव्या वरच्या हातात त्रिशुळ आहे. खालचा हात वरद मुद्रेत असून हातात अक्षयमाला आहे. डाव्या वरच्या हातात नागफणा असून हा हात पार्वतीच्या केसांच्या पाठीमागे आहे. खालचा डावा हात पार्वतीच्या कंबरेवर आहे. शिवाच्या जटामुकूटावर चंद्र सुर्य कोरलेले आहेत. पार्वतीचा उजवा हात शिवाच्या खांद्यावर आहे. दूसर्‍या हातात फासा आहे.

शिवाचा जटामुकूट तर पार्वतीचा मराठमोळा शोभणारा अंबाडा प्रभावळी सारखा डोक्या मागे कोरलेला आहे. अंबाजोगाई, निलंगा येथील उमा महेश्वर मुर्तीत पार्वतीचा केशसंभार असाच दर्शविला आहे. पार्वतीच्या उजव्या पायाची बोटं दूमडलेली दिसत असून बोटात जोडवं घातलेलं दिसून यावं इतकी बारीक कलाकुसर आहे. याच पायाच्या तळव्यावर चक्र कोरलेलं आहे. पार्वतीच्या खाली गणेश असून शिवाच्या बाजूने खाली नंदी आहे.

मागची प्रभावळ अतिशय कोरीव असून त्यावर अष्ट दिकपाल कोरलेले आहेत. (आठ दिशांच्या आठ देवता असतात. पूर्व-इंद्र, पश्चिम-वरूण, दक्षिण-यम, उत्तर-कुबेर, आग्नेय-अग्नी, नैऋत्य-निऋती, वायव्य-वायु, ईशान्य-ईशान)  विष्णु आणि ब्रह्मदेवाच्या मुर्तीही प्रभावळीवर आहेत. मध्यभागी किर्तीमुख आहे.

एकप्रकारे पंचमहाभुतांसह सर्व प्रमुख देवता कोरून सगळे विश्वच मुर्ती रूपात मांडले आहे. याचीही वेगळी दखल घ्यावी लागेल.

उमा महेश्वर मुर्तीत पार्वतीही शिवाच्या खांद्यावर हात ठेवलेली दाखली जाते हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. खांद्यावरचा हात बरोबरीचे मैत्रिचे नाते सुचवतो. Shrikant Borwankar ने फार छान शिर्षक सुचवले “ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा”. आरतीमधील या ओळी याच मुर्तीकडे पाहून लिहिल्या गेल्या असाव्यात. Ashutosh Bapat सर तूमच्यामुळे आज या मुर्तीवर लिहिलं.  पार्वतीच्या पायाशी घोरपड तसल्याने तिला गौरी असे संबोधतात. असा खुलासा सायली पलांडे दातार यांनी केला आहे. Saili Palande-Datar

(फोटो सौजन्य अर्धनारी नटेश्वर संस्थान, वेळापुर).

या अप्रतिम दूर्मिळ अशा मुर्तीला मंदिराला जरूर भेट द्या.

© श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद

Leave a comment