नागपूरचे टेकडी गणपती मंदिर…
विदर्भाच्या अष्टविनायकातील पहिला समजला जातो, तो नागपूरचा टेकडी गणेश. नागपूरकरांचे हे आराध्य दैवत आहे. नागपूर रेल्वे स्थानकाला लागून सीतबर्डी टेकडीवर हे गणेशाचे मंदिर आहे. हे मंदिर टेकडीवर बांधण्यात आले असल्याने त्याला टेकडी गणपती मंदिर असे म्हटले जाते. नागपूरचे राजे भोसले यांनी हे मंदिर सुमारे अठराव्या शतकात बांधले असून, ते सुमारे २५० वर्षे जुने असल्याचे समजते.
भोसले राजे आणि ब्रिटिशांची लढाई ज्या ठिकाणी झाली, त्याच ठिकाणी हे गणपतीचे मंदिर आहे. सुरुवातीला मंदिर छोटेसे होते, आता त्याचा विकास झाला आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला असले, तरी मूर्ती उत्तराभिमुख आहे. गणपतीच्या मूर्तीच्या पाठीमागील भिंतीला लागून एक शिवलिंग आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगाच्या ठिकाणी नंदी बसवलेला दिसतो.
याच टेकडीवर दुसऱ्या भागात आणखी एक गणपती मंदिर आहे. तो फौजी गणपती म्हणून ओळखला जातो. शुक्रवार तलावाचे पाणी पूर्वी सीताबर्डी किल्ल्यापर्यंत होते. भोसले राजे नावेतून तेथे गणेश दर्शनासाठी येत, असे सांगितले जाते. येथील गणेशामूर्ती भोकरीच्या झाडाखाली उघड्यावर होती. या ठिकाणी पूर्वी मोठे मंदिर होते; परंतु नंतर ते उद्ध्वस्त झाले. त्याचे अवशेष आजही दिसतात. मंदिराच्या आसपास वड-पिंपळाची झाडे आहेत. ही मूर्ती उजव्या सोंडेची असून दोन पाय, चार हात, डोके, सोंड पूर्वी स्पष्ट दिसत असे. आता शेंदराच्या पुटांमुळे मूर्ती स्पष्ट दिसत नाही. या बैठ्या मूर्तीची उंची साडेचार फूट व रुंदी तीन फूट आहे. मूर्तीच्या मागे पिंपळाचे झाड आहे. त्याच्या मुळांमुळे मूर्ती मूळ जागेहून थोडी पुढे सरकली असावी, असा तर्क आहे.
कला, क्रीडा क्षेत्रातील नामवंत या मंदिरात दर्शनासाठी येतात. तिळी चतुर्थीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते. मंदिराच्या विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे.
माहिती साभार -Yogesh Bhorkar
तुम्हाला हे ही वाचायला
- पुरातन शिव मंदिर, कोथळी | Ancient Shiva Temple, Kothali
- दशानन रावण मूर्ति, सांगोळा, अकोला
- उत्तरेश्वर देवालय कोल्हापूर | Uttareshwar Temple, Kolhapur
- तळजाई माता मंदिर, पुणे | Taljai Mata Temple, Pune
- महाकाय दुर्गादेवी मुर्ती, बाबुपेठ, चंद्रपूर | Durga Devi Murti, Babupeth
- कोप्पम अर्थात खिद्रापूर ची ऐतिहासिक पार्श्वभूमी भाग ३
- कोप्पम अर्थात खिद्रापूर ची ऐतिहासिक पार्श्वभूमी भाग २