महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,83,322

मराठेशाहीतील शेवटचा फिरंगी मनसबदार भाग ४

By Discover Maharashtra Views: 1290 5 Min Read

मराठेशाहीतील शेवटचा फिरंगी मनसबदार भाग ४ – जनरल पेरॉन

मालपूरची मोहीम:ही लढाई जयपूरचा राणा प्रतापसिंग आणि त्याला मिळाले १०हजार राठोड सैनिक यांच्या विरुद्ध लखबादादा लाड यांच्यात झाली. लढाईस कारण नेहमीचे होते ते म्हणजे खंडणीसंबंधी मराठे व राजपूत यांच्यातील वाद! या लढाईत लखबादादाच्या बाजूने पोलमन आणि दुद्रेनेक यांची कवायती फौज तसेच मराठ्यांचे घोडदळ होते. पहाटे ४ वाजता या लढाईला तोंड फुटले आणि पोलमन याने आपले लष्करी सेनापतीचे कसब पणाला लावून मराठ्यांना विजय मिळवून दिला. त्यासाठी त्याला जवळपास १ हजार सैनिकांची आहुती द्यावी लागली होती.(मराठेशाहीतील शेवटचा फिरंगी मनसबदार भाग ४)

दुसऱ्या फळीवर राठोडांनी कमालीचे शर्य दाखवून शवेलीर दुद्रेनेक याच्या फौजेची वाताहत केली. त्याच्या ८ हजार सैनिकांपैकी फक्त दोनशे जण जिवंत उरले होते. राठोडांनी यावेळेस १०वर्षांपूर्वीच्या मेडत्याच्या पराभवाचा पुरेपूर बदला घेतला. लढाईतील प्रतापसिंगच्या पराजयानंतर पेरॉन याने प्रतापसिंगबरोबर तह केला आणि त्याला २५ लाख रुपये खंडणी मिळाली. जोधपूरच्या राण्याने सुद्धा अशीच खंडणी देऊन मराठ्यांशी तह केला.त्यानंतर पोलमन वर पुढील कारवाई सोडून पेरॉन दुआबत आपल्या मुक्कामावर पोचला.

त्यानंतर दौलतराव शिंदे, महादजीच्या स्त्रिया, बाळोबातात्या, लखबादादा लाड यांच्यातील कुरबुरी आणि  सुडाचे राजकारण परत सुरु झाले. त्यामध्ये बाळोबातात्या यांचा विषप्रयोगाने मृत्यू ओढवला. महादजीच्या स्त्रियांना हा एक मोठा धक्का होता. लखबादादा याने मेवाडातील बाजू सोडून तो मारवाडकरांना सामील झाला. शेवटी कवायती फौज आणि त्यांचे गोरे सेनापती दौलतरावाच्या बाजूने उभे राहिले.

पुढे जुलै १८००च्या सुमारास पेरॉन यांची दिल्लीच्या सीमेवर शंभुनाथ या लखबादादाच्या एका सरदारांशी लढाई झाली. यात विजयी होऊन पेरॉन दिल्लीत पोचला. पेरॉनच्या कीर्ती यावेळी शिगेला पोचली होती. नोव्हेंबर १८००मध्ये प्रतापसिंगांचा लग्न सोहोळा आटोपून तो जानेवारी १८०१मध्ये दक्षिणेत निघाला. या सुमारास लखबादादाच्या पाठलागावर त्याने आपले सैन्य पाठवले पण लखबादादा सहजासहजी सापडणारा नव्हता. शेवटी लखबादादाचा नाद सोडून तो दुआबत आपल्या मुक्कामावर पोचला.

पेरॉन सत्तेच्या शिखरावर:सन १८०१मध्ये पेरॉन त्याच्या कारकिर्दीच्या अत्युच्च शिखरावर होता. राजस्थानातील कोट्यापासून उत्तरेत सहरांनपुर,पश्चिमेकडील जोधपूरपासून पूर्वेला अलिगढपर्यंत जेव्हढा शिंद्यांचा पसारा होता, तो त्याच्या ताब्यात आला होता. दौलतराव शिंद्यांच्यावतीने त्याने या भागात आपली निर्विवाद सत्ता प्रस्थापित केली होती. जयपूर, जोधपूर, सहरांनपुर, पानिपत, दिल्ली, नारणोल, अलिगढ,अजमेर, आग्रा या ठिकाणचे संस्थानिक त्याला खंडणी देत होते. राजस्थानातील बहुतेक सर्व राजे त्याच्या मांडलिकत्वाखाली होते. उत्तरेतील सर्वच्या सर्व मीठाचा व्यापार आणि इतर पदार्थावरील एकूण अबकारी कर तो जमा करत असे. उत्तरेतील त्याचे व्यापारावरील कराचे वार्षिक उत्पन्न जवळपास १६लाख ३२हजार पौंड्स दरवर्षी इतके होते. इतकी सत्ता आणि अफाट पैसा पेरॉनच्या डोक्यात शिरली नसेल तरच नवल! फ्रांसमध्ये एका गावात रुमाल विकणाऱ्या माणसाला इतकी अमर्याद सत्ता हिंदुस्थानात मिळाली हे एक अद्भुत होते.

साधारण १८०१नंतर मात्र पेरॉनच्या चालण्याबोलण्यात फरक पडू लागला असे वाटते. त्याच्याभोवती खुशमस्कऱ्यांचे जाळे विणले जाऊ लागले. शेवटी स्तुती सर्वानाच प्यारी असते. त्याच्या वाढत्या महत्वकांक्षेमुळे त्याला स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचे मनसुबे दिसू लागले किंवा भारतात फ्रान्सचे संघराज्य स्थापन करावे असे वाटू लागले. त्यासाठी त्याने आपल्या फौजेतील फ्रेंच लोकांना बढत्या देण्याचे सत्र चालू केले ज्यामुळे सैन्यातील डी बॉयनच्या काळातील शिस्त व शासन बिघडत गेले. याचा परिणाम म्हणून सैन्यातील फ्रेंच आचारी व हलक्या कामकरी लोकांनी सुद्धा आपल्याला लष्करात अधिकाऱ्याची नेमणून द्यावी अशी मागणी त्यांच्या अधिकाऱ्याकडे केली. त्यामुळे साहजिकच फ्रेंच व इंग्रजासह इतर गोऱ्या लोकांच्यात असंतोष माजला. डी बॉयन काळात लष्करात जी शिस्त होती ती ढासळू लागली. डी बॉयन याने सैनिकी कर्तृत्वावर आधारित बढत्यांचे धोरण ठेवले होते,त्यामुळे सर्वाना सामान वागणूक मिळत असे. कोणत्याही प्रकारचा भेदभाव नव्हता. त्याच सुमारास शिंदेशाहीतील पेरॉनच्या सैन्याचे वाढीव प्रस्थ बघून मराठ्यांच्या सरदारांचे व सैनिकांचे मनोधैर्य खचू लागले. मराठेशाहीतील शिंद्याकडील महत्वाच्या कामगिऱ्या आपसूकच पेरॉनकडे जाऊ लागल्या, त्यामुळे पूर्वापार चालू असलेले जुन्या सरदारांचे मराठ्यांचे तनखे बंद पडू लागले.

या सर्वात भर म्हणून पेरॉनची पैसे कमवायची हाव वाढत गेली. कवायती फौजेचा सरसेनापती म्हणून त्याचा पगार महिन्याला १५ हजार रुपये होता व त्याला इतर बरेच भत्ते मिळत होते. त्याच्या अंगरक्षकांचा पगार म्हणून त्याला महिन्याला ३२हजार रुपये मिळत होते. त्याच्या कर संकलनासाठी म्हणून जमा होणाऱ्या कराच्या रकमेच्या ५ टक्के रक्कम त्याला कमिशन मिळत असे. अशा प्रकारे त्याचे एकंदर महिन्याचे उत्पन्न जवळपास १लाख रुपयेपर्यंत पोचले होते. त्याकाळात ब्रिटिश पौंडच्या भाषेत ते वर्षाचे उत्पन्न दीड लाख पौंड होते, तसेच इतर बरेच हिशेबात न धरलेले पैसे त्याला मिळत असत.

मराठेशाहीतील शेवटचा फिरंगी मनसबदार

संदर्भ:
Military Adventures of Europeans in Hindusthan, Herbert Compton,
शिंदेशाही इतिहासाची साधने भाग ८ (शिंदेशाहीतील शेणवी मंडळींचा अस्सल पत्रव्यवहार) ,
मराठी रियासत भाग ७, सरदेसाई गो. स.

संकलन व लेखन: प्रमोद करजगी

Leave a comment