महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,76,108

नंद गवळी राजाचा किल्ला, नंदुरबार

By Discover Maharashtra Views: 4145 4 Min Read

नंद गवळी राजाचा किल्ला, नंदुरबार…

आदीवासी बहुल असलेल्या या नंदुरबार जिल्ह्यात एकेकाळी एक दोन नव्हे तर तब्बल १५ किल्ले गिरीदुर्ग, भुईकोट व गढी या स्वरुपात अस्तित्वात होते. यातील हटमोईदा व अष्टे या दोन गढी पुर्णपणे नष्ट झालेल्या असुन उरलेले १३ गढीकिल्ले त्यांचे उर्वरित अवशेष संभाळत काळाशी झुंज देत आजही उभे आहेत. या १३ किल्ल्यात १ गिरिदुर्ग असुन ३ भुईकोट २ नगरकोट तर उरलेल्या ७ गढी आहेत. यातील बहुतांशी गढीकोटात गावे वसलेली असल्याने गावातील वाढत्या वस्तीने या कोटांच्या अवशेषांचा घास घेतला आहे नंदुरबार शहरातील नंद गवळी राजाचा किल्ला म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या अंतीम घटका मोजत असलेल्या गढीला भेट देणार आहोत. डोंगराच्या कुशीत वसलेली नंदनगरी अर्थात नंदुरबार शहर हे नंद नावाच्या गवळी राजाने वसविल्याची कथा सांगितली जाते.

एकेकाळी खानदेशात मोडणारे नंदुरबार खानदेशच्या विभाजनानंतर आधी धुळे जिल्ह्याचा भाग बनले व नंतर १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्यातून बाहेर पडून सहा तालुके असलेल्या नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली. नंदुरबार जिल्ह्याच्या सीमा थेट मध्यप्रदेश व गुजरात राज्याला भिडल्या आहेत. नंदुरबार शहर हे नंदुरबार जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण मुंबई पासुन ३६० कि.मी.अंतरावर असुन देशातील प्रमुख शहराशी रस्त्याने व लोहमार्गाने जोडले गेले आहे. नंद गवळी राजाच्या किल्ल्याला भेट देण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम नंदुरबार शहर गाठावे लागते. स्थानिक लोकांना हि गढी नंद गवळी राजाचा किल्ला म्हणूनच परिचित असल्याने गढी शोधण्यास फारशी अडचण येत नाही. हि गढी नंदुरबार शहराच्या पश्चिमेस असलेल्या नंदुरबार किल्ल्याच्या पायथ्याशी असुन येथे जाण्यासाठी धानोरा रोडने मासळी बाजारातुन काली मशीदकडे यावे. या मशिदीचे बांधकाम बहमणी काळात इ.स.१५८३ (९९१ हिजरी) सालीं बांधल्याबद्दल पार्शियन शिलालेख आहे. येथुन डाव्या बाजुच्या गल्लीतुन पुढे आल्यावर या गल्लीच्या टोकाला असलेल्या एका लहानशा टेकाडावर या गढीचे अवशेष शेवटचा श्वास घेत आहेत.

गढीची तटबंदी पुर्णपणे कोसळली असुन केवळ एका बाजुस तटबंदीचे अवशेष दिसुन येतात. गढीवरील ओळखता येणारी वास्तु म्हणजे हमामखाना. केवळ हा हमामखाना त्याची कमान,भिंती व वरील घुमट बऱ्यापैकी शिल्लक असुन याच्या भिंतीत असलेला खापरी नळ वापरून बनविलेला पाणीमार्ग पहाता येतो. गढीचे बुरुज आज केवळ मातीच्या ढिगाऱ्याच्या रुपात शिल्लक आहेत. मातीचा हा ढिगारा उपसल्यावर खालील अवशेष नजरेस पडण्याची शक्यता आहे. या गढीचे अजुनही अवशेष शिल्लक असावेत पण या हमामखान्यात दोन-तीन कुत्रीने पिल्ले घातली असल्याने आम्हाला गढीत शिरण्यास व फिरण्यास पुर्णपणे विरोध केला. वाढत जाणारी वस्ती गढीच्या कोसळलेल्या भागापर्यंत येऊन पोहोचली आहे. काही वर्षातच हि गढीचा भाग व्यापून जाईल व त्यासाठी गढीचा भाग पोखरण्यास सुरवात झाली आहे. तटबंदी मोठया प्रमाणात नष्ट झाल्याने गढीच्या आकाराचा अंदाज करता येत नाही.

संपुर्ण गढी फिरण्यास दहा मिनिटे पुरेशी होतात. नंदुरबार शहर खानदेशांतील जुन्या शहरापैकीं एक असून कान्हेरी येथील लेण्यांत असलेल्या एका शिलालेखांत याचा नंदिगड म्हणुन उल्लेख येतो. हें गांव नंद गवळी राजाने म्हणजेच यादव वंशातील राजाने वसविलें असून यवनी आक्रमणापर्यंत तें त्यांच्या सत्तेखाली होतें. इन्न बतूता यानें आपल्या प्रवासवर्णनात नंदुरबार शहराचा उल्लेख केला आहे. खानदेशचा पहिला सुलतान फारुकी मलिकराज यांने सुलतानपूर व नंदुरबार हीं शहरे इ.स. १५३० सालीं ताब्यात घेतलीं परंतु गुजरात सुलतान मुजफर ह्याच्या आक्रमणाने फारुकी मलिकराज याला थाळनेराकडे परतावें लागलें. इ.स. १५३६ मध्यें महंमुदशहा बेगडा (तिसरा) या गुजरातच्या सुलतानाने राजा झाल्यावर त्यानें अशीरगडावर कैदेंत असतांना कबूल केल्याप्रमाणें सुलतानपूर व नंदुरबार हीं ठाणीं मुबारकखान फारुकी यांस दिलीं.

मध्यंतरी गुजरातच्या चेंगीझखानानें हीं पुन्हां घेतलीं होतीं परंतु त्यास लवकरच तीं सोडावीं लागली. अकबराच्या कारकीर्दीत ऐन-ए-अकबरी (इ.स. १५९०) मध्ये नंदुरबारचा उल्लेख किल्ला असलेले जिल्ह्याचें ठाणें असून त्याचा वसूल पांच कोटी दाम असल्याचे आढळते. प्रसिद्ध प्रवासी टॅव्हर्निअर यानें १६६० ला श्रीमंत आणि समृद्धनगरी असे नंदुरबारचे वर्णन केले आहे. सन १६६६ मध्यें येथें इंग्रजांनीं एक वखार घातली पण एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीच्या काळात या वखारीचा नाश झाला. इ.स. १८१८ मध्यें नंदुरबार इंग्रजांच्या ताब्यांत आलें तेव्हां अर्धे ओसाड पडले होतें.

Leave a comment