महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,02,340

एक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा?

By Discover Maharashtra Views: 3594 8 Min Read

एक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा

मित्रांनो गडकोट, सह्याद्री व निसर्ग भटकंती हे आता तर नियमितचेच सोबती झाले आहेत. त्यात गडकोट म्हणजे प्रत्येक वेळी नवनवीन अविष्कार दाखवणारा जादूगारच आहे असे वाटते. कारण खुप काही शिकायला व अनुभवायला येथे गेल्यावर मिळाले. परंतु यासाठी आपणाकडे वेळ असायला हवा. जुन्नर तालुक्यातील असलेल्या सात किल्यांवर जवळपास चार वर्षे अनेक वेळा निरीक्षणे करण्याची संधी मिळाली व त्याबाबतीत लिहिण्याचा व मांडण्याचा प्रयत्न मी माझ्या दृष्टिकोणातून केला. यावर अनेक वाचक मित्रांनी चांगल्या प्रतीक्रिया कमेंट्सच्या माध्यमातून नोंदविल्याने एक प्रकारे मला आपण प्रोत्साहीत करून पुन्हा पुन्हा लिहिण्यासाठी निश्चितच बळ दिले. वाचक मित्रांनो आपल्याच माध्यमातून अनेक विविध पैलूंवर मला अभ्यास करण्याचा व जोपासण्याचा छंद जडला. आता कालचेच उदाहरण द्यायचे झाले तर संध्याकाळी 4:30 वाजता एक व्यक्ति घरी आली. भटकंती बाबत अनेक विषयावर चर्चा झाली. याच चर्चेत एक विषय निघाला किल्ले चावंडच्या बाबतीत. चावंडवर तसा मी अनेक वेळा गेलो व त्यावर वेळोवेळी लिहिले पण परंतु विषय होता तो किल्ले चावंडवर असलेल्या भुयाराबाबत. दोन वेळा येथे जाण्याचा योग पण आला परंतु या भुयारात पाणी असल्याने हे नक्की काय असेल हे सांगणे कठीण होते. आमच्या गप्पा चालू होत्या. संध्याकाळचे रमेश बरोबर गप्पा मारत मारत 5:30 कधी झाले समजलेच नाही. रमेशला सहज प्रश्न केला जाऊयात का आता चावंडला भुयारात शिरण्यासाठी? तो पण हो म्हटला. मग काय? वेळ, काळ याकडे आम्ही थोडेच लक्ष देणार होतो. दूचाकी घेऊन आम्ही निघालो चावंडच्या दिशेने. आकाशात पावसाच्या ढगांनी खुप गर्दी केली होती. कुठल्याही क्षणी मेघराज्याचे आगमन होणार होते. मेघराज्या कितपत साथ देईल सांगणे कठीण होते. 30 मिनिटांत किल्ले चावंडच्या उत्तर पायथ्याशी पोहचलो. हलकी बुंदाबांदी सुरू झाली होती. आम्ही छायाचित्रे व चित्रांकण करत झपझप किल्ला सर करू लागलो. अर्धा किल्ला सर करून कच्या पाऊलवाटेने पश्चिमेकडे धाव घेतली. कारण आता मेघराजाणे कोपण्यास सुरूवात केली होती. भीती होती ती फक्त वरून पावसामुळे स्लाईड होणाऱ्या दगडधोंड्यांची. (मित्रांनो येथे निश्चितच सांगू इच्छितो की प्रथम चांगला पाऊस सुरू झाला की सह्याद्रीची भटकंती किमान 15 ते 20 दिवस तरी थांबवावी, कारण या कालावधीत कडे कोसळण्याचा जास्तीत जास्त खतरा असतो.) झपझप पावले उचलत या भुयाराच्या निवा-याला आम्ही सुरक्षित पोहचलो. आता कितीही पाऊस झाला तरी आम्हाला कसलीच भीती नव्हती, की वरून कडा कोसळला तरी ते भुयार गाडण्याची भीती नव्हती.

बाहेर पाऊस पडत होता व आमचा भुयारात घुसण्याचा खेळ सुरू होता. साधारण 4×3 फुट उंची,रूंदी असलेल्या या भुयारात प्रवेश बसुन सरकत सुरू झाला. विजेरी सोबतच होती. आतमध्ये किती लांबवर जावे लागणार हे साधारण 25 फुट आतमध्ये गेल्यावर समजणार होते, कारण या ठिकाणाहून उजवीकडे भुयार कोरले गेले होते. जुन्नर तालुक्यातील आकरा भुयारांचे निरीक्षण पाहता हे भुयार व त्याची रचना वेगळीच दिसत होती. कारण अडीच अडीच फुटावर प्रथमतः तीन स्टेप व नंतर पुढे सपाट भाग दिसत होता. आम्ही काळजीपुर्वक पुढे सरकत होतो. भिंतीवर वेगळ्या प्रजातीची पाल निदर्शनास पडली होती. आम्ही पुढे जसजसे सरकत होतो ती पण पुढे पुढे सरकत आम्हाला रस्ता दाखवत होती. तुडुंब पाण्याने भरलेले हे भुयार कोरडे झाले होते.

विजेरीचा लांबवर केलेल्या प्रकाशात अचानकच एक ठिकाणी काहीतरी चमकत होते. काय असावे सांगणे कठीण. पुढे भयानक शांतता व गडद अंधार होता. पाठीमागून भुयाराच्या तोंडातून पडणा-या उजेडानेपण आता आमची साथ सोडली होती. गरमीच्या उकाड्याने शरीरातून घामाच्या धारा फुटू लागल्या होत्या. भुयाराच्या उजव्या वळणावर आम्ही थोडी विश्रांती म्हणुन थांबलो होतो. भुयाराचा आकार थोडा कमी झाला होता. आत मध्ये फक्त शिरताना एवढा त्रास होत होता तर हे कोरताना कोरणाराचे काय झाले असेल? त्याने कोणत्या उजेडात हे कोरले असेल? आता तर माझ्याकडे विजेरी आहे त्यावेळी भुयारात प्रदुषण होऊ नये म्हणून काय असेल? हे कोरताना उजेडासाठी व कोरण्यासाठी काय वापरले असेल? हे नक्की माणसानेच कोरले असेल का? जर माणसाने कोरले असेल तर ऑक्सिजनची आतमध्ये तरतुद असेल का? असे विविध प्रश्न या दोन मिनिटांच्या विश्रांतीत काहूर माजून गेले. पुढे काय आहे हे पाहण्याची उत्सुकता लागली होती. रमेश आणि मी काळजी घेत पुढे सरकत होतो.

आता तर पुढे आणि पाठीमागे अंधाराचे साम्राज्य पसरले होते. या काळोखात फक्त आणि फक्त आमच्या घेत व सोडत असलेल्या श्वास व उश्चवासाचाच आवाज येत होता. सरकताना होणारा आवाज छातीतून निघणा-या ठोक्यांच्या आवाजाशी जणू स्पर्धा करत आहे की काय असे वाटत होते. विजेरीत चमकणारे ती वस्तु जवळच होती. ती खुप सुरेख व सुंदर होती. ती मी आज प्रथमतःच या आकारात पाहत होतो. कदाचीत ही नवीन संशोधनाचा भाग असू शकेल असे वाटत होते. ही वस्तू म्हणजे एक बेडूक नावाचा जीव होता. त्याचा एक डोळा चमकताना दिसत होता. जवळ जाताच त्याने उडी मारली असे अनेक बेडूक आमच्या आगमनाची वाट पाहत होते. भुयारात ओलावा सुरु झाला होता. पुढे भुयाराचा तोंड बंद होते परंतु उजव्या व डाव्या बाजूला पुन्हा मार्ग कोरलेले होते. साधारण आम्ही 40 ते 45 फुट आतमध्ये होतो. उजव्या व डाव्या बाजूला हे भुयार जेथे वळण घेते त्या ठिकाणी मी सरकत सरकत पोहचलो होतो. दोन्ही बाजूंनी हा मार्ग पाण्याने तुडुंब भरलेला दिसत होता. आमचा प्रवास येथेच संपणार होता. येथून माघार घ्यावी लागणार होती ती पुढल्या वर्षी पुन्हा येथे एकदा येण्यासाठी व पुढील संशोधनासाठी.

आम्ही माघारी फिरलो होतो. एक रमेश दुसर्‍या रमेशला विचारत होता सर हे नक्की काय असेल ओ?
सोबत असलेल्या रमेशला सरकताना होणा-या त्रासापेक्षा उत्सुकतेची जास्त ओढ दिसून येत होती. तो पण कमालीचा भटक्या बहाद्दर गेली 15 वर्ष याच सह्याद्रीच्या कुशीत फिरतोय. मला तर येथे भटकंती करताना फक्त पाच वर्षे झाली परंतु या बहाद्दराने तर चालून चालून सह्याद्रीची चाळणच केलीय असे तो सांगतो.

मी म्हटलं बाहेर पडल्यावर तुला सांगतो. परतीचा भुयारातील प्रवास दहा मिनिटांतच उरकला. वरूणराजा येथील निसर्गाची भेट घेऊन निघून गेला होता. आम्ही सुरक्षित बाहेर पडलो होतो. चालता चालता मी रमेशला सांगू लागलो. हा भुयारी मार्ग सध्यातरी पाण्यासाठी कोरण्यात आला असावा असे वाटते. कारण त्यावेळी तीन गोष्टींना प्राधान्य दिले जायचे. अन्न, पाणी व निवारा. यामध्ये सर्वात महत्वाचे असे ते पाणी व स्वसुरक्षितता. जंगली श्वापदांपासून बचाव करायचा असेल तर मनुष्य डोंगर भागात अशी ठिकाणे शोधायचा की त्या ठिकाणी या वरील तीन गोष्टी सहज मिळविणे शक्य असे. भरपूर वाढलेल्या जंगलात कंदमुळे तर मोठ्या प्रमाणावर भेटून भुक भागविली जायची परंतु उन्हाळ्यात पाणी मिळावे म्हणून भटकंती सुरू व्हायची व श्वापदांपासून मनुष्याची शिकार व्हायची, त्यामुळे अशी सुरक्षितता जेथे असेल त्याठिकाणी नंतर पाण्याच्या टाक्या खोदण्यात आल्या असाव्यात. नंतरच्या काळात शत्रुं पासून किल्यांवर असलेल्या पाणी साठ्यावर विषप्रयोग केला जात असे व पाणी सप्लाय बंद केली जात असे त्यावेळी या गुप्त पाणी साठ्यांचा वापर करून किल्ले अबाधित ठेवण्यास मदत मिळत असे, की पिण्याच्या पाण्याची गरज अगदी भर उन्हाळ्यात सुद्धा पुर्ण होत असे. पुन्हा पाणी आटल्यावर या भुयाराच्या इतिहासाला कलाटणी मिळेल का? हा प्रश्न भेडसावू लागला.

अंधार पडू लागला होता. अनेक शंका कुशंका मनात घेऊन आमचा परतीचा प्रवास दुचाकीवरून जुन्नरच्या दिशेने गड उतार होऊन सुरु झाला होता.

लेख व छायाचित्र – श्री रमेश खरमाळे
शिवनेरी भुषण
माजी सैनिक

Leave a comment