स्त्री आणि माकड | कोरवलीच्या सुरसुंदरी

By Discover Maharashtra Views: 1213 3 Min Read

स्त्री आणि माकड –

कोरवलीच्या सुरसुंदरी लेख क्र ६ –

संकीर्ण प्रकाराच्या सुरसुंदरी मध्ये स्त्री आणि माकड या शिल्पांचे अंकन आवर्जून केली जाते. महाराष्ट्रात असणाऱ्या अनेक मंदिरांच्या मंडोवरावर स्त्री आणि माकड यांचे शिल्प आपणास पहावयास मिळते. अशाच पद्धतीचे शिल्प कोरवलीच्या मंदिरावर आपणास पहावयास मिळते. तारुण्यसुलभ असणाऱ्या या स्वर्गीय अप्सरेची चंचलता याठिकाणी पाहण्यासारखी आहे. हे एक अप्रतिम व देखणे असे एका तारुण्याने मुसमुसलेल्या तिलोत्तमेचे लोभस पण तेवढेच देखणे शिल्प आहे. तिचे सुस्नात लावण्य तिच्या अंग-प्रत्यंगातून  नखशिखांत दर्शविले आहे.

नुकतीच स्नान करून आलेली ही अप्सरा घाईगडबडीने आपली नेसूची वस्त्रे उचलून घेऊन परिधान करण्याच्या कामात मग्न आहे. तेवढ्यातच एक नाठाळ माकड तेथे आले आहे आणि त्या माकडाने या सुंदरीची खोडी काढून तिचे वस्त्र ओढण्यास सुरुवात केली आहे. म्हणून या अप्सरेनी गडबडीने आपली वस्त्रे डाव्या हाताने घट्ट धरली असून, उजव्या हातातील वस्त्राच्या सोग्याने ती माकडास हुसकावून लावण्याचा प्रयत्न करीत आहे.या सौंदर्य लतिकेची उडालेली तारांबळ फारच मोहकतेने दाखविलेली आहे.

ओल्यात्या शरिराने उभी असलेली हि अप्सरा आपले वस्त्र सांभाळते आहे आणि आपणास कोणी पाहिले तर?या कल्पनेने लज्जित होत आहे. या सर्वच भावभावनांत अडकून पडलेली आणि आधी वस्त्र सांभाळावे की त्या  खोडकर माकडास हकलावे या संभ्रमात सापडलेली  हि लावण्या फार लोभस आणि मनमोहक दिसते. तिच्या चेहऱ्यावरील संभ्रम तिच्या उडालेल्या तारांबळीस  स्पष्ट करीत आहे.

कलाकाराच्या कल्पनेतील हे स्वर्गीय लावण्य त्यांने पृथ्वीवर आणलेले आहे. या सुरसुंदरीचे देखणे व्यक्तिमत्व नजरेचे पारणे फेडणारे आहे. नुकतिच न्हाऊन  आल्यामुळे तिच्या मस्तकावर तिने आपल्या डाव्या खांद्यावरून खाली सोडलेले आहे. तरीही त्यास सैलसर नाजुक गाठ बांधलेली आहे. ओलीती असली तरी नखशिखांत आभूषणे मात्र तिच्या अंगाखांद्यावर दिसतात. रुंद खांद्यास शोभेशी स्कंदमाला ,कटिहार, ग्रीवा, स्तनसूत्र ,स्तनहार ,केयूर आणि हातातील व पायातील ठसठशीत अलंकार तिच्या सौंदर्यास खुलवणारे आहे.

घसरलेली तिची वस्त्र सावरणे आणि  त्यांना ओढणाऱ्या माकडाला हुसकावून लावणे या क्रिया तिने घाईगडबडीने केल्यामुळे तिला एकाच पायावर उभे रहावे लागले . हे कलाकाराने अंकित केले आहे. तिच्या उजव्या पायाशी बसलेले ते नाटाळ माकड तिला हैराण करीत आहे. परंतु तिच्या या तारांबळीकडे चेष्टेने पाहत आहे. हीच का ती माकडचेष्टा? जी कलाकारांनी या ठिकाणी अत्यंत कौशल्याने दाखविले आहे. अप्रतिम देखणे असणारे हे शिल्प कोरवलीच्या मंदिरावर कित्येक वर्षापासून उभे असून कलाप्रेमींना आकर्षित करीत आहे.(सुरसुंदरीची नावे हि ग्रांथिक नसली तरीहि ती पूर्वीपासून रूढ असल्याने त्या नावांचा वापर केला जात आहे.कृपया याची नोंद घ्यावी.हा लेखन प्रपंच केवळ अभ्यासकांसाठि माहिस्तव आहे.)

डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर

Leave a comment