महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,77,728

एकांतद रामय्या शिल्पपट | आमची  ओळख आम्हाला द्या

By Discover Maharashtra Views: 1239 3 Min Read

एकांतद रामय्या शिल्पपट | आमची  ओळख आम्हाला द्या –

ज्याप्रमाणे आपण एखादे मूर्तिशिल्प पाहतो व त्याचा अन्वयार्थ लावतो, तसेच शिल्पपटाचे देखील आहे. शिल्पपटाच्या माध्यमातूनही गतकाळातील इतिहासा पर्यंत पोहोचता येते. असाच एकांतद रामय्या शिल्पपट मंगळवेढे गावात मुरडे गल्लीत उघड्यावर ऊन, वारा ,पाऊस यांचा मारा सहन करत शनीचा दगड म्हणून पूजला जातो. शिल्पपटाला भेट दिल्यानंतर हा शनीचा दगड म्हणून शेंदूर लावून लोक त्याची पूजा करतात असे सांगितले गेले. मुळात हा शिल्पपट काय आहे? हे पाहणे गरजेचे आहे. हा शिल्पपट एकांतद रामय्या याचा आहे.

इसवीसन बाराव्या शतकात रामय्या नावाचा एक शिवभक्त गुलबर्गा जिल्ह्यात आळंद तालुक्यात होऊन गेला. तो पुरुषोत्तम देव या ब्राम्हणाचा मुलगा होता. लहानपणापासूनच तो शिवाचा भक्त होता. पुलुगेरे येथील दक्षिण सोमनाथ शिवलिंगाचा तो परमभक्त होता. काही वर्षांनंतर तो आबलूर गावी आला. आबलूर याठिकाणी जैनांचे प्राबल्य होते. त्याला शिवाने दृष्टांत दिला की, रामय्याने या ठिकाणी जाऊन जैनांना वाद-विवादा मध्ये हारवावे. त्यानुसार तो या गावी आला व जैनांची वाद-विवाद घालण्यास सज्ज झाला. वाद-विवाद मध्ये अशी अट होती की रामय्या याने आपले मस्तक कापुन पुन्हा ते जोडून दाखवावे. एकांतद रामय्या यांनी हा चमत्कार करून दाखवला व त्या बदल्यात जयपत्र मागितले. परंतु जैनांनी जयपत्र देण्यास नकार दिला. हे प्रकरण मंगळवेढ्यापर्यंत पोहोचले. कलचुरी नृपती बिज्जलदेव यांच्यासमोर हा वाद मंगळवेढ्यास आला.  रामय्याने बिजल राजा याच्या समोर पुन्हा तो चमत्कार करून दाखवला. त्यानंतर बिज्जलाने स्वतः त्यास जयपत्र दिले. त्याचीच साक्ष देणारा हा शिल्पपट होय.

या शिल्पपटात एकूण पाच रकाने होते. सर्वात खालचा रकाना तुटून गेला आहे. दुसऱ्या रकान्यात हत्तीवर विराजमान राजा दास-दासी वाजंत्री यांचे अंकन केलेले दिसते. तिसऱ्या रकान्यात रिकामी पालखी घेतलेले भोई ,त्याशेजारी मस्तकविहीन पद्मासनात बसलेला एकांतद रामय्या दाखवला आहे .रामय्याचे कापलेले शीर तबकात घेऊन जात असलेला सेवक दाखवला आहे. त्याचा हा चमत्कार पाहण्यासाठी जमलेली जनताही दाखवलेली आहे. चौथ्या रकान्यात एकांतद रामय्या पुन्हा जिवंत दाखवलेला असून चौथ्या कारखान्यात तो शिवलिंगाची पूजा करण्यात तल्लीन झालेला दाखवले आहे. शिल्पाच्या डावीकडील वरची बाजू तुटलेली आहे उजव्या वरच्या बाजूस मकर दिसून येते. शिल्पाची उंची६० इंच व रुंदी २८ इंच आहे. अशा पद्धतीने शनी म्हणून पूजला जाणारा हा एकांतद रामय्या याचा शिल्पपट मंगळवेढे या ठिकाणी पहावयास मिळतो.

डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर

Leave a comment