द्राक्ष सुंदरी

द्राक्ष सुंदरी

द्राक्ष सुंदरी –

होट्टल (ता. देगलुर जि. नांदेड) मंदिरावरची सुरसुंदरींची शिल्पे मोठी आकर्षक सौष्ठवपूर्ण सौंदर्यपूर्ण अशी आहेत. चित्रातील सुरसुंदरीला नेमकं काय नाव आहे मला माहित नाही. तिच्या डाव्या हातात द्राक्षाचा घोस दिसतो आहे म्हणून मी तीला “द्राक्ष सुंदरी” असं नाव ठेवलं. तज्ज्ञांनी यावर प्रकाश टाकावा.  Anand Bhave  यांनी अतिशय नेमका तर्क मांडला आहे.ही मोहाची फळं असावीत. पटण्यासारखा तर्क आहे. कुणाला यावर माहिती असेल तर इथे द्यावी.(द्राक्ष सुंदरी )

हीच्या गळ्यातील दागिना जरा वेगळा दिसतो आहे. शिवाय जानव्या सारखी एक साखळी डाव्या खांद्यावरून दोन वक्षां मधून खाली कमरेकडे आली आहे. हा प्रकारही वेगळा वाटतोय. उजवा हात जो खाली सोडलेला आहे त्यावरचे एक कंकण खाली झुकलेलं आहे. केसांची रचना पण मोठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. पाठीमागे मानेखाली उतरलेला हा केसांचा शेपटा वेगळा आकार ल्यालेला आढळतो. किंवा तो पातळ कापडात गुंडाळलेला आहे की काय असे वाटते. डावा पाय हा जमिनीला टेकला नसून भिंतीला टेकवलेला दिसतो आहे. दोन पायांच्या मधून सोडलेला कटीवस्त्राचा शेव लयबद्ध असा डावीकडे वळलेला आहे. या सुंदरीचे स्तन अतिशय प्रमाणबद्ध दाखवलेले आहेत. उन्नत दाखवण्याच्या नादात काही शिल्पात एकुण शरिर रचनेचा तोलच बिघडतो.

ठाम सरळ रेषेतील उजवा पाय वगळता डावा पाय व दोन्ही हात यांची रचना लयबद्ध अशी मोहक केलेली आहे. चेहरा नेमका उजवे पाउल जिकडे आहे त्याच्या विरूद्ध वळलेला आहे. “जा तोसे नाही बोलू कन्हैय्या” असा भाव जाणवतो. पाउल तर तिकडे वळले आहे पण “आम्ही नाही जा” अशी स्त्री सुलभ भावना आहे.

छायाचित्र सौजन्य Travel Baba Voyage

-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here