महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

स्री – मुक्तिदाता धोंडो केशव कर्वे

By Discover Maharashtra Views: 2690 9 Min Read

स्री – मुक्तिदाता धोंडो केशव कर्वे –

दिनांक १० एप्रिल १८५८ या दिवशी अण्णांचा जन्म झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील मुरूड हे अण्णांचे म्हणजे धोंडो केशव कर्वे यांचे गाव. जवळच असणारे शेरवली हे त्यांचे आजोळ आणि जन्मस्थान .अण्णांचे बालपण मुरुड या गावात गेले .मुरुड हे अत्यंत खेडेगाव होते. मुरुडला फारशी शिक्षणाची सोय नव्हती म्हणून आण्णांनी मुंबईची वाट धरली.

पावसाचे पाणी समुद्राकडे आणि कोकणातली माणसे मुंबईकडे सहज वळतात .अण्णांना शिकायचे होते .मुंबईत गेल्या शिवाय हे शक्य नव्हते. अण्णा मुंबईला गेले. वाट्याला येईल ती गैरसोय हीच खरी सोय म्हणून ते मुंबईत राहू लागले .दिवसा शिकवण्या कराव्यात ,कोणाच्या तरी गॅलरीत स्वयंपाक करावा .राहत्या  घरची कामे करावीत, गरीब मित्रांची विचारपूस करावी, जमेल तेवढे द्यावे, आहे त्यात समाधानी रहावे, विद्यार्जनात कसूर करू नये, अशी अण्णांची जीवनचर्या आणि वर्तन चक्र होते .पायपीट तर कायमची वाट्याला  आली होती. दिवसाकाठी दहा – वीस किलोमीटर चालणे सहज घडत असे. अण्णा जन्मभर चालले, हाताने कागदावर आणि पायाने धर्तीवर जीवन ग्रंथ लिहिणारा हा कर्मयोगी मनाने लोकसेवेचा विचार करीत होता.

पहिली पत्नी वारल्यानंतर  त्यांनी पंडिता रमाबाईंच्या ‘शारदा सदन’ या संस्थेतील एका विधवेशी पुनर्विवाह केला. आनंदीबाई तथा बाया कर्वे यांनी कर्व्यांना आयुष्यभर साथ दिली. या पुनर्विवाहामुळे कर्व्यांना तत्कालीन ब्राह्मण समाजाने वाळीत टाकले. पण तरीही न डगमगता त्यांनी विधवांच्या उद्धाराचे कार्य चालूच ठेवले. १८९३ साली त्यांनी ‘विधवाविवाह प्रतिबंध निवारक मंडळ’ काढले आणि पुनर्विवाहितांचे कुटुंब-मेळेही भरविले. याच दिशेने विधवांच्या शिक्षणासाठी त्यांनी  ‘अनाथबालिकाश्रम’ या संस्थेची स्थापना केली. पुण्याजवळील हिंगणे येथे १९०० सालापासून हा आश्रम सुरू झाला. पुढे सुगृहिणीपदाच्या दृष्टीने योग्य असेच शिक्षण स्त्रियांना दिले पाहिजे, या जाणिवेने ते स्वतंत्र महिला विश्वविद्यालयाच्या स्थापनेसाठी प्रयत्न करू लागले. त्यातूनच ठाकरसी कुटुंबाच्या आर्थिक मदतीने १९१६ मध्ये श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ उभे राहिले. या विद्यापीठातील अभ्यासक्रमामध्ये स्त्रीजीवनाशी संम्बद्धीत अशा विविध विषयांचा समावेश असून शिक्षणाचे माध्यम मातृभाषा आहे. अनाथ बालिकाश्रम आणि महिला विद्यापीठ या संस्थांतून महाराष्ट्रातील हजारो स्त्रियांनी आपले शिक्षण या विद्यापीठातून पुरे केले आहे.

महर्षी कर्वे यांचे आयुष्य संस्थामय होते. वरील संस्थांखेरीज ‘मुरुड फंड’ (१८८६), स्त्रियांच्या उद्धारासाठी आमरण कार्य करणारे कार्यकर्ते निर्माण व्हावेत म्हणून काढलेला ‘निष्काम मठ’ ग्रामीण शिक्षणासाठी ‘महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ’ जातिभेद आणि अस्पृश्यता निर्मुलनासाठी कार्य केले.

महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी त्यांनी आपले १०४ वर्षांचे जीवन वाहिले.  त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील  हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जीवन म्हणजे सामाजिक सुधारणा विशेषतः स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी वाहिलेले आधुनिक ऋषितुल्य जीवन. त्यांच्या कार्याचा प्रारंभ हा विधवाविवाह पासून झाला ,आणि त्याची परिणीती स्त्रियांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र विद्यापीठ काढण्यामध्ये झाली.

कर्व्यांनी सामाजिक सुधारणेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.काळाची पावले ओळखणारे असे हे शिक्षण महर्षी होते.

लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करीत होते. पण राजकारणाच्या रणधुमाळीत उतरल्यानंतर त्यांच्या रिकाम्या जागी गणित विभागाचे प्रमुख असणारे गोपाळ कृष्ण गोखले यांनी अण्णांना बोलावून घेतले. इ.स. १८९१ ते इ.स. १९१४ या प्रदीर्घ कालखंडात अण्णांनी गणित हा विषय शिकवला.

अण्णा पत्‍नीसह मुरूडला गेल्यानंतर अण्णांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत झाला. याच गोदूबाई पुढे आनंदी कर्वे किंवा बाया कर्वे म्हणून ख्यातनाम झाल्या. अण्णासाहेबांच्या कार्यात बाया कर्वे यांचा सक्रिय वाटा होता.

अण्णांचा पुनर्विवाह ही व्यक्तिगत बाब नव्हती; घातक सामाजिक प्रथांविरुद्ध केलेले ते बंड होते. पुनर्विवाहासाठी लोकमताचे जागरण करावे, या हेतूने २१ मे, इ.स. १८९४ या दिवशी अण्णांनी पुनर्विवाहितांचा एक कुटुंबमेळा घेतला. याच सुमारास अण्णांनी ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक‘ मंडळाची स्थापना केली. विधवा-विवाहाला विरोध करणाऱ्या प्रतिगामी प्रवृत्तींना आवर घालणे हे या मंडळाचे काम होते. बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, केशवपन यासारख्या अन्याय्य रूढींत अडकलेल्या अनिकेत स्त्रियांना मोकळा श्वास मिळावा म्हणून इ.स. १८९६ मध्ये अण्णांनी सहा विधवा महिलांसह ‘अनाथ बालिकाश्रम‘ काढले.‘विधवा विवाहोत्तेजक‘ मंडळाची स्थापना केली. विधवाविवाह न्याय संमत मानला जात नव्हता अशा काळामध्ये अण्णांनी विधवा विवाहाचा आग्रह धरून समाजाच्या मानसिकतेमध्ये बदल करण्यासाठी चळवळ उभी केली .या चळवळीचा एकूणच परिणाम म्हणजे या काळामध्ये पुनर्विवाहा साठी समाजाची मानसिकता तयार होऊ लागली.

रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी अण्णांचे हे उदात्त कार्य पाहून हिंगणे येथील आपली सहा एकरांची जागा आणि रु. ७५० संस्थेच्या उभारणीसाठी अण्णांकडे सुपूर्द केले. या उजाड माळरानावर अण्णांनी एक झोपडी बांधली. ही पहिलीवहिली झोपडी ही हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेची गंगोत्री. आज अनेक वास्तूंनी गजबजून गेलेल्या या वैभवसमृद्ध परिसरात अण्णांची झोपडी त्यांच्या कष्टांचे श्रेय म्हणून  जगाला सांगत उभी आहे.

इ.स. १९०० मध्ये अनाथ बालिकाश्रमाचे स्थलांतर हिंगण्यास करण्यात आले. याच परिसरात अण्णांनी विधवांसाठी एक हक्काची सावली निर्माण केली. विधवांचे हे वसतिगृह ही एक सामाजिक प्रयोगशाळा होती.

स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्यांना दिली जाणारी दुय्यम दर्जाची वागणूक यांचा त्यांना कायम राग येत असे. पंडिता रमाबाई आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या जीवनकार्यांमुळे अण्णा खूपच प्रभावित झाले होते. थोर तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांचाही त्यांच्यावर पगडा होता.

इ.स. १८९६मध्ये अण्णानी पुण्याजवळील हिंगणे (आता कर्वेनगर) या गावी विधवा महिलांसाठी आश्रम स्थापन केला. या आश्रमात याच ठिकाणी इ.स. १९०७ साली महिला विद्यालयाची स्थापना त्यांनी केली. अण्णासाहेबांची २० वर्षांची विधवा मेहुणी – पार्वतीबाई आठवले – या विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी होत. आश्रम आणि शाळा या दोन्हींसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्यांनी ‘`निष्काम कर्म मठा’ची स्थापना इ.स. १९१० साली केली. स्त्रियांना आपल्या आवडीनुसार शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी आरोग्यशास्त्र, शिशुसंगोपन, गृहजीवन शास्त्र, आहार शास्त्र असे विषय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केले.यामुळे स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली. ग्रामीण भागातही स्त्री शिक्षणाची गरज ओळखून कर्वे यांनी स्त्री शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्यावर भर दिला ग्रामीण भागात त्यांनी ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ स्थापन केले व त्याद्वारे अनेक शाळा सुरू केल्या.

पुढे या तिन्ही संस्थांचे कार्य उत्तरोत्तर वाढत गेल्याने त्याचे एकत्रीकरण करून `’हिंगणे स्त्री शिक्षण संस्था’ निर्माण झाली. तिचेच नाव पुढे ‘`महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था’ सुरू  झाली. १९९६ साली त्यांच्या कार्यारंभाला १०० वर्षे पूर्ण झाली म्हणून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ही दरवर्षी शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करणाऱ्या स्त्रीला” बाया कर्वे ” पुरस्कार देते.

अर्थात, हे सगळे काही सहजसाध्य नव्हते. या कार्यामुळे कर्मठ, सनातन पुणेकरांचा त्यांना रोष पत्करावा लागला. संस्था चालविण्यासाठी पैसे अपुरे पडत असल्याने कित्येक वर्ष अण्णासाहेबांना हिंगणे ते फर्ग्युसन कॉलेज पायी प्रवास करावा लागत असे.आपल्या संस्थांसाठी कुणाकडे देणगी मागायला गेल्यावर कित्येक वेळा त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळत असे. पण अत्यंत जिद्दीने त्यांनी आपले कार्य चालू ठेवले.

जपानच्या महिला विद्यापीठाला भेट दिल्यानंतर अण्णा अत्यंत प्रभावित झाले. त्यांनी पुण्यात भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना १९१६ साली केली. पुढे विठ्ठलदास ठाकरसी यांनी १५ लाखांचे अनुदान दिल्याने या विद्यापीठाचे `श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ’ (एसएनडीटी) असे झाले.

अण्णानी अनेक परदेश दौरे केले. विशेषत: महिलांच्या सबलीकरणाचे आपले अनुभव त्यांनी आफ्रिकेतही जाऊन सांगितले. विधवा महिलांचे प्रश्न आणि त्यांचे शिक्षण यांव्यतिरीक्त जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांच्या विरोधातही त्यांनी कार्य केले.

स्त्रियांना दुर्बल घटक लेखून त्यांना विद्येपासून वंचित करणाऱ्या समाजात अण्णांनी आपल्या तपोबलावर हा चमत्कार घडविला. ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी‘ या विद्यापीठास सरकारने स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा दिला. अनेक प्रज्ञावंत महिलांनी विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविले. अण्णांना अभिप्रेत असणारे बोधवाक्य विद्यापीठाने शिरोधार्य मानले ते असे- ‘संस्कृता स्त्री पराशक्तिः‘ अण्णांच्या प्रयत्नाने अस्तित्वात आलेल्या प्रत्येक संस्थेचे भरणपोषण केले.

भारतीय विद्यापीठांनी त्यांना डी.लिट. देऊन सन्मानित केले. `पद्मविभूषण’ हा किताब त्यांना इ.स. १९५५ साली प्रदान करण्यात आला, तर लगेच इ.स. १९५८ साली त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान `भारतरत्‍न’ने सन्मानित करण्यात आले. एकशेचार वर्षांचे दीर्घायुष्य देऊन निसर्गानेही त्यांना सन्मानित केले. पुण्यातच ९ नोव्हेंबर, इ.स. १९६२ ला त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

पुण्याच्या सीमेवर असणाऱ्या कर्वे नगर भागात आश्रमकन्यांचे एक आनंद वन आहे. अण्णांची झोपडी आणि बायाची समाधी तिथेच आहे. ‘स्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे’असे  शिवछत्रपती म्हणत ; पण मानवकुळात  या देवतेला स्थान नव्हते.  महर्षी धोंडो केशव कर्वे या  या थोर स्त्रीशक्तीउपासकाने हिंगण्याच्या माळावर घोर तपश्चरण केले .त्यांच्या तपातून एक स्त्रीशक्ती पीठ अस्तित्वात आले.स्री या शक्तीची जीवनात प्राणप्रतिष्ठा करण्याचे पुण्यकर्म या  पुरुषोत्तमाने केले.

लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

Leave a comment