प्रतिभासंपन्न पठ्ठे बापूराव –
पठ्ठे बापूराव यांचा जन्म रेठरे हरणाक्ष( वाळवा तालुका, सांगली जिल्हा ) येथे झाला.त्यांचे मुळचे नांव श्रीधर कृष्ण कुलकर्णी असे होते.त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८६८ रोजी झाला. लहानपणापासूनच श्रीधरला तमाशाचा नाद होता. त्यांची घरची परिस्थिती गरिबीची होती. आई-वडिलांनी श्रीधरला शाळेत घातले. त्याचवेळी त्यांना कविता करण्याचा छंद लागला. व त्यांचा गळाही अतिशय सुंदर होता. ग्रामीण भागात गायल्या जाणाऱ्या जात्यावरच्या ओव्या ऐकून ऐकून त्यांना गाण्याची अधिकच आवड निर्माण झाली.जात्यावरच्या ओव्या ऐकून ऐकून त्यामध्ये त्यांनी अनेक बदल केले व त्या ओव्यांना श्रीधर ची गाणी अशी लोकप्रियता मिळाली.
श्रीधरच्या शिक्षकांनी शिफारस करून त्याचे नाव औंध सरकारांना कळविले. त्याची दखल घेऊन औंधच्या राजांनी श्रीधरला आपल्याकडे बोलावून घेतले. श्रीधरचे पुढील शिक्षण औंध येथे झाले. पुढे त्यांच्या १६ व्या वर्षी बडोद्याच्या राणीसाहेबांनी श्रीधरला बडोद्यास नेले. तेथे ते संस्कृत भाषा शिकले. त्याबरोबरच त्यानी कलाभुवन या संस्थेत यंत्र दुरुस्तीचे शिक्षणही घेतले व नोकरीही केली. दुर्दैवाने श्रीधर अवघ्या सतरा वर्षे वयाचे असतानाच त्यांचे आई-वडील निवर्तले. शेवटी बडोद्याची नोकरी सोडून श्रीधर परत आपल्या गावी परतले.
गावी परत आल्या नंतर
घरासमोरच असलेल्या वाड्यात असणार्या तमाशाच्या फडाकडे त्यांचे लक्ष लागून राहिले.श्रीधरच्या कानावर त्या वाड्यातल्या तमाशाचे सूर ऐकायला येत.हा तमाशा पहायला गावातले ब्राह्मण आणि कुलकर्णी जाऊ लागले. त्यामुळे रात्री पटकन उठून तमाशाला जायचे धाडस श्रीधरांना होईना. मनातली तळमळही त्यांना गप्प बसू देईना. बापू चोरून तमाशाला जाऊ लागले. तमासगीरांना त्यांनी अनेक लावण्या लिहून दिल्या. तमाशात बापूरावाच्या लावण्या आणि कवने गायली जाऊ लागली. `
श्रेष्ठवर्ण मी ब्राह्मण असूनी !
सोवळे ठेवले घालूनी घडी !!
मशाल धरली हाती तमाशाची
लाज लावली देशोघडी!!
ह्या जिद्दीने कुबेराला लाजवील असे वैभव तमाशाच्या जोरावर पायाशी लोळवीन` हा संकल्प करूनच बापूराव घराबाहेर पडले. गावोगावी तमाशाचा फड उभे करू लागले. पुढे त्यांना तमाशा चा नादच लागला त्या नादातच त्यांनी गण गवळणी लावण्या अशा रचना करण्यास सुरुवात केली १८९० ते १९०० या काळात पट्टे बापूराव प्रत्यक्ष तमाशाच्या फडात उभे राहिले .पठ्ठे बापूरावांनी तमाशात ‘रंगबाजी’चे लेखन केले.
त्याकाळात अनेक तमासगीर महाराष्ट्राच्या खेडोपाडी जत्रा यात्रा मधून तमाशा सादर करून तग धरून होते. पट्टे बापूरावांनी याच काळात आपली लोकप्रियता कायम ठेवली . त्याकाळात आपल्या जातीपातींचा मोठ्या गौरवाने उल्लेख करीत. तमाशा क्षेत्र तर गोकुळासारखे अथवा खटल्याच्या घरासारखे असे. जातीय अस्मितेचा तुरा आपल्या डोक्यावर मिरवणारे तमासगीर कलगी -तुर्याच्या लढती खुल्या दिलाने करीत. हार- जीत होई .हारणारा आपली हार मोठ्या मनाने स्वीकारी. पट्टे बापूराव यांच्या दगडूबाबा साळी शिरोलीकर, अर्जुना वाघोलीकर,भाऊ फक्कड यांच्याशी लढती झाल्याचा इतिहास आहे .या लढतीमध्ये पठ्ठे बापूराव हारले होते .त्यावेळी त्यांना वर्षभर बांगड्या भरून रहावे लागले होते .
बापूरावांचे स्वतःचे काव्य, योग्य साथ, पहाडी आवाज आणि लावणीतील शृंगाराने तमाशा बदलला. त्यातून श्रीधरची वाहवा होता होता `पठ्ठेबापूराव ` म्हणून ते प्रसिद्धीला आले. पुढे एक लक्ष लावणी करणारा हा शाहीर, मुंबईत येऊन बटाट्याच्या चाळीत राहू लागला. तेथेही तमाशाच्या फडात जाऊन त्यांना लावण्या रचून देण्याचे काम त्यांनी काही दिवस केले.
याच काळात त्यांना नामा धुलवडकरांच्या फडात पवळा हिवरगावकर नावाची नर्तिका भेटली.तिला काहीजण `मस्तानी ची उपमा द्यायचे. ती आधीच ’नामचंद पवळा’ म्हणून प्रसिद्ध होती. बापूरावांची काव्यप्रतिभा पवळाच्या सान्निध्यात बहरली. बापूरावांचे काव्य अन पवळाचा गोड गळ्या व ठसकेबाज नृत्याने ती
रसिकांच्यासमोर सादर झाली. बापूराव आणि पवळा यांची कीर्ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरली. १९०८-०९ साली छत्रपती शाहू महाराजांसमोर `’मिठाराणी’चा वग पठ्ठे बापूरावांनी सादर केला.
नामा धुलवाडकर यांच्या तमाशात पवळा पहिल्यांदा नाचली. पवळासारखी रूपवान स्त्री नाचताना पाहून प्रेक्षक फिदा व्हायचे. पवळाने आपल्या नृत्याने तमाशात नवी क्रांती केली. पवळाच्या रूपाने तमाशात नाचनारीण म्हणून स्त्रीचा समावेश झाला होता. पवळाच्या बाबतीत मजेशीर कहाणी सांगितली जाते. तमाशा प्रेमी बाबूराव घोलप यांनी आपल्या आत्मचरित्रात याबद्दल रंजक माहिती लिहून ठेवली आहे. पवळा आणि पठ्ठे बापूराव या जोडीने तमाशाला नवे वळण दिले.पवळाच्या पायात जणू जन्मजात नृत्य होते.
बापूराव विषयी प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील म्हणतात, शाहीर पठ्ठे बापूराव-ज्यांचा उल्लेख सार्थपणे ‘लावण्यांचे विद्यापीठ’ असा केला जातो, त्या बापूरावांच्या एका गौळणीतील शृंगार तर मला ‘ओलेती’ या चित्रकृतीच्या दर्जाचा वाटतो. ज्या अवीट गौळणीत शृंगाराच्या तप्त ज्वाला आहेत; मात्र तीत छछोर बाजारूपण नाही. रंगाची उधळण आहे, खुलेपणा आहे, पण बीभत्सपणाचा लवलेशही नाही. त्या गौळणीची धुंदावणारी चाल,पारंपरिक स्वरसाज… सारेच काही और
“श्रीरंग सारंगधरा,
लाजुनी धरिते उरा
चला नेते माझ्या मंदिरा
हो, उडवा रंग, रंग, रंग
तुम्ही माझ्या महाली चला ना
थाट विलासी केला भला ना गुलाबाच्या फुलांचा झेला
जागोजागी मी खोविला
पहिला तुम्हा पचला, तर मग उचला नचला नंग नंग नंग, उडवा रंग रंग रंग
त्या निःसंग, ढंगदार रात्रीचे वर्णन करता करता बापूराव राधा-कृष्णाचा हा शृंगार “मग आनंद मारील चिपळ्या, करील दंग दंग दंग’
सोळा हजारात देखणी ही गवळण आजही तेवढ्यात आवडीने गायली व ऐकली जाते .
सोळा हजारात देखणी
चाँद दिसे जणू दर्पणी
मीच एक राधा गवळ्याची
सखे साजणी……
अशा बेहोषीच्या लावण्या व गवळणी उंचच उंच झुल्यावर नेऊन ठेवतात. यावरून तमाशा क्षेत्रातील पहिल्या अजरामर जोडीचे महत्त्व अधोरेखित होते.
शुभ मंगल चरणी गणनाचला हा गण पठ्ठे बापूराव यांनी रचला.
तमाशा कलेला सुवर्णयुग दाखवणाऱे ,आजची लावणी उद्या न गाणारे व आजचा पैसा आजच खर्च करणारा असा नावलौकिक असणारे ,पठ्ठेबापूराव यांचा आज जन्मदिवस .पट्टे बापूराव यांच्या आयुष्यातून पवळा निघून गेल्यानंतर त्यांचा तमाशाचा व्यवसाय हळूहळू ढासळत गेला व पुणे येथे पठ्ठेबापूराव यांचे निधन झाले.
लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे