थेऊरचा श्री चिंतामणी

By Discover Maharashtra Views: 3806 4 Min Read

थेऊरचा चिंतामणी…

अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधीदेखील या ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे.

थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे. (थेऊरपासून जवळच ऊरळीकांचनला महात्मा गांधींनी स्थापन केलेले निसर्गोपचारकेंद्र आहे.)

हे मंदिर पुण्याहून पुणे-सोलापूर महामार्गे २२ किमी अंतरावर आहे. मुळा-मुठा-भीमा या तीन नद्यांच्या संगमावर थेऊर वसलेले आहे. थेऊर हे पुण्याच्या जवळ आहे. हे मंदिर खोपोली-जुना मुंबई पुणे महामार्गे खंडाळ्याच्या थोडे आधी आहे. थेऊर हे पुणे-सोलापूर महामार्गाच्या थोडेसे आडवाटेवर एका तासाच्या अंतरावर आहे.

श्री क्षेत्र चिंतामणीची कथा

आख्यायिकेनुसार राजा अभिजित आणि त्याच्या पत्नीने घोर तप केले आणि गणासूर याला जन्म दिला. जेंव्हा गणासूराने ऋषी कपिला यांच्या आश्रमाला भेट दिली तेंव्हा ऋषींनी त्यांच्या जवळील चिंतामणी रत्नाचा वापर करून गणासूराला उत्तमोत्तम पंचपक्वान्नांचे जेवण खाऊ घातले. गणासूराला त्या चिंतामणी रत्नाचा लोभ सुटला आणि त्याने कपिला ऋषींकडून ते रत्न जबरदस्तीने हिसकावून घेतले. दुर्गा देवीने कपिला ऋषींना गणपतीची मदत घेण्याचा सल्ला दिला.

गणपतीने गणराजाला कदंबवृक्षाखाली पराभूत करून त्याच्याकडून ते मौल्यवान रत्न हस्तगत करून पुन्हा कपिला ऋषींना दिला. याचे बक्षीस म्हणून कपिला ऋषींनी ते रत्न गणपतीच्या गळ्यात घातले आणि तेंव्हापासून गळ्यात चिंतामणी रत्न घातलेला गणपती चिंतामणी विनायक म्हणून ओळखला जाऊ लागला. ही कथा कदंबवृक्षाखाली घडल्यामुळे थेऊरला ‘कदंबपूर’ असेसुद्धा म्हणतात.

श्री चिंतामणी मंदिर आणि परिसर

चिंतामणीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. गणपतीच्या डोळ्यात मौल्यवान रत्ने जडित आहेत. देवळाचे महाद्वार किंवा मुख्यद्वार हे उत्तरेकडे आहे आणि मुळा-मुठा नदीच्या मार्गाला जोडते. मंदिराच्या संकुलाच्या आंत एक छोटे शिवमंदिर आहे.

चिंतामणी हा श्री माधवराव पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत आहे. श्री माधवराव यांनी त्यांचे शेवटचे दिवस या देवळात व्यतीत केले आणि गणपतीचे नांव घेत त्यांनी शेवटचा श्वास सोडला. थेऊर येथे संत मोरया गोसावी यांनी घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन गणपती नजदीकच्या मुळा-मुठा नदीतून दोन वाघांच्या रूपाने अवतीर्ण झाला आणि त्याने त्यांना सिद्धी प्रदान केली.

पूजा आणि उत्सव

दर्शनाची वेळ सकाळी ६ ते दुपारी १ आणि दुपारी २ ते रात्री १०

इथे गणेश चतुर्थी साजरी केली जाते, तसेच गणेश जयंती ही अतिशय मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. यावेळी द्वारयात्रा आयोजित केली जाते आणि भाविक येथे गणपतीचा जन्म साजरा करण्यास मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.

माधवराव पेशवे यांनी शेवटचे दिवस इथे व्यतीत केले. त्यांनी मंदिराला सर्व प्रकारे सहाय्य केले होते. त्यामुळे माधवराव आणि त्यांची पत्नी रामाबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त मंदिरात कार्तिक महिन्यात रमा-माधव पुण्योत्सव आयोजित केला जातो.

जवळची इतर दर्शनीय स्थळे:
  • थेऊरच्या दक्षिणेकडील डोंगररंगांमध्ये भुलेश्वराचे प्राचीन आणि प्रेक्षणीय शिवमंदिर आहे. अंदाजे अंतर ४० किमी
  • श्री नारायण महाराज यांचा आश्रम व दत्तमंदिर पुणे-दौंड मार्गावर केडगांव येथे आहे. अंदाजे अंतर ४३ किमी
  • थेऊरजवळील लोणीपासून सुमारे चार ते पाच किमी अंतरावर रामदरा हे ठिकाण आहे. येथे पाण्याने वेढलेले शिवमंदिर आहे. अंदाजे अंतर ४ ते ५ किमी
  • थेऊर फाट्याओअसून जवळच पुणे-सोलापूर महामार्गावर उरळीकांचन येथे महात्मा गांधी यांनी स्थापन केलेला निसर्गोपचार आश्रम आहे. अंदाजे अंतर १३ किमी
  • वाघोली-केसनंद या मार्गावर वाडेबोल्हाई मंदिर आहे. अंदाजे अंतर १३ किमी
  • पुणे-नगर मार्गावर तुळापुर येथे भीमानदीकाठी संगमेश्वर मंदिर आणि छत्रपती संभाजीमहाराज यांचे स्मारक आहे. अंदाजे अंतर २१ किमी

Credit – art of living

बाजींद कांदबरी

Leave a comment