महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,83,291

स्वराज्याचे तिसरे छत्रपति राजाराम महाराज

By Discover Maharashtra Views: 1620 6 Min Read

स्वराज्याचे तिसरे छत्रपति राजाराम महाराज –

छत्रपति शिवाजी महाराजांचे सुपुत्र आणि स्वराज्याचे तिसरे छत्रपति राजाराम महाराज यांची आज जयंती. इतके मोठे व्यक्तिमत्त्व असूनदेखील राजाराम महाराज हे मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात दुर्लक्षित आणि उपेक्षित व्यक्तिमत्त्व आहेत. हे पाहिल्यावर मला राहावले जात नाही. साक्षात शिवछत्रपतींच्या सुपुत्राला साजेसं कर्तृत्व असलेल्या राजाराम महाराजांच्या चरित्राची व कर्तुत्वाची अनेकांना नीट, योग्य माहिती नाही. अनेकांना त्याविषयी काही गैरसमज, चुकीचे दृष्टिकोन आहेत. राजाराम महाराजांचं तीस वर्षांचं आयुष्य अनेक अद्भुत गोष्टींनी भरलेले आहे. २४ फेब्रुवारी १६७०या दिवशी राजगडावर त्यांचा जन्म झाला तेव्हा ते पालथे उपजले. शिवाजी महाराजांना हे कळल्यावर महाराज उद्गारले, “दिल्लीची पातशाही पालथी घालील…!” नामकरण झाल्यावर महाराज म्हणाले, “राजाराम प्रजा सुखी ठेवील, आपले नाव राखील.” राजाराम महाराजांनी पुढे सर्वत्र संकटांनी ग्रासलेले असताना प्रतिकूल परिस्थितीतही हे शब्दशः खरे केले. आणि दिल्लीची पातशाही पुढे खरंच पालथी पडलीही, त्याची सुरुवात राजाराम महाराजांच्याच काळात झाली होती.

संभाजीमहाराज मोगलांच्या कैदेत पडल्यावर लगेच येसूबाईंच्या संमतीने रायगडावर किल्लेदार चांगोजी काटकर व येसाजी कंक यांनी राजारामांचे मंचकारोहण केले. राजाराम महाराज त्यावेळी होते १९ वर्षांचे. गेली नऊ वर्षं ते रायगडावरच नजरकैदेत होते. त्यांना संभाजीराजांसारखे लष्करी शिक्षण, राज्यकारभाराचे धडे मिळालेले नव्हते. त्यावेळी परिस्थिती अत्यंत बिकट होती. मोगलांनी स्वराज्याला सगळीकडून ग्रासलेले होते. गेल्या अनेक वर्षांपासून स्वराज्यातले अनेक महत्त्वाचे किल्ले मोगल काबीज करत होते. मराठ्यांचे कितीतरी मातब्बर सरदार मोगलांना जाऊन मिळत होते. रयतेचा विश्वास उडत चालला होता. आता तर प्रत्यक्ष मराठ्यांच्या राजाला मोगलांनी कैद केले आणि हालहाल करून मारले. अशा परिस्थितीत राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली. लगेच औरंगजेबाने झुल्फिकारखानाला रायगड घेण्यास पाठवले आणि प्रत्यक्ष राजधानीलाच वेढा पडला.

अवघे राजकुटुंब संकटात सापडले. तेव्हा दौलतीच्या कारभाऱ्यांची मसलत झाली आणि येसूबाईंनी महान दूरदृष्टी दाखवत राजाराम महाराजांना रायगडावरून निसटण्यास सांगितले. रायगड – प्रतापगड – तिथली लढाई – सातारा – पन्हाळा – कर्नाटक – जिंजी असा राजाराम महाराजांचा खडतर प्रवास इतका थरारक आणि रोमांचक आहे की त्यावर समकालीन कवी केशव पंडिताने ‘राजारामचरितम्’ हा संस्कृत काव्यग्रंथ लिहिला. त्या प्रवासात राजाराम महाराजांवर अनेकदा जीवावर बेतणारे प्रसंग आले. पाठलाग करणाऱ्या मोगलांना चुकवत, प्रसंगी झुंजत राजाराम महाराज तामिळनाडूतल्या जिंजीला पोहोचले आणि तब्बल सात वर्षे तिथून औरंगजेबाशी लढा दिला.

राजाराम महाराजांचे कर्तृत्व हे या लेखात थोडक्यात देखील सांगता येणार नाही. काय नि किती सांगायचे. परचक्र आल्यावर संघर्षाचा भूभाग जमेल तितका स्वराज्याच्या बाहेर ठेवावा ही शिवरायांची नीती राजारामांनी अवलंबिली. रायगड सोडल्यापासून त्यांनी सतत पत्रे पाठवून मराठ्यांचे मनोबल वाढवले, प्रोत्साहन दिले. अनेकांना एक मोठा गैरसमज आहे की वतनदारी पद्धत राजाराम महाराजांच्या काळात पुन्हा सुरू झाली आणि पुढे सरंजामशाही सुरू झाली वगैरे. असा समज बाळगून असणाऱ्यांना इतिहासाचे घोर अज्ञान आहे. संभाजीराजांच्या काळापासून मराठ्यांचे मोठमोठ्या सरदारांपासून सैनिकांपर्यंत कितीतरी लोक मोगलांना जाऊन मिळत होते याचे उल्लेख वाचलेत तर डोळे पांढरे होतील. राजाराम महाराजांनी स्थिरबुद्धीने, हिंमतीने शूर मराठे मंडळींना एकत्र आणून स्वराज्याचे रक्षण केले. १२ सप्टेंबर १६८९च्या पत्रात राजाराम महाराज म्हणतात, “हे मऱ्हाटे राज्य. तुम्ही आम्ही मऱ्हाटे लोक इनामासी खता न करिता स्वामीकार्य करावे…” ४ जून १६९१च्या सनदापत्रात राजाराम महाराजांनी तर मराठे सरदारांना महाराष्ट्रधर्म रक्षिण्यासाठी रायगड, विजापूर, भागानगर, औरंगाबाद जिंकून चक्क दिल्ली काबीज करण्यासाठी प्रोत्साहन देऊन सरंजामाची तरतूद केली होती. शेजवलकर म्हणतात, “हे पत्र एवढे महत्त्वाचे आहे, की सर्व महाराष्ट्रीय मुलांनी ते मुखोद्गत करावे !” राजाराम महाराजांची महत्त्वाकांक्षा अलौकिक होती. शिवरायांप्रमाणेच त्यांच्या विविध पत्रांतील त्यांचे उद्गार तेजस्वी आहेत.

सेतू माधवराव पगडी लिहितात, “१६८९ पासूनच स्वराज्य रक्षणाची फार मोठी जबाबदारी राजारामांवर पडली, ती त्यांनी मोठ्या निष्ठेने तडीस नेली. हा लढा जनतेचा लढा आहे, सामुदायिक नेतृत्वाशिवाय हा लढा जिंकणे शक्य नाही, हे त्यांना पटले होते. म्हणून त्यांनी आपले सरदार व मुत्सद्दी यांच्या कर्तृत्वास पूर्ण स्वातंत्र्य दिले. राजारामांच्या उदार धोरणामुळे शेकडो मराठे पुढे आले.” स्वराज्याचे आधारस्तंभ संताजी घोरपडे, धनाजी जाधव, रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण यांच्या कर्तुत्वाविषयी काय सांगावे ? नाशिकपासून तंजावरपर्यंत मराठे संघर्ष देऊ लागले. मोगलांकडून किल्ले परत मिळवू लागले. उत्तरेकडे मराठ्यांची घोडदौड याच काळात होऊ लागली. पराक्रमी लोकांना राजाराम महाराजांनी बक्षिसं देऊन गौरविले, नावाजले. औरंगजेबाच्या छावणीत असलेल्या मुहम्मद अली वारसी याने मोगल साम्राज्यातील तसेच त्याकाळातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे मृत्यूशक नोंदवून त्यांच्याविषयी थोडक्यात पण मार्मिक टिपणं लिहून ठेवलेली आहेत. राजाराम महाराजांबद्दल तो लिहितो, “नऊ वर्षे राजारामाने पराक्रमाने आणि दराऱ्याने राज्य केले…” म्हणूनच मतभेद व लढाई झाल्यानंतरही संताजी घोरपडे स्वतःचे हात बांधून राजाराम महाराजांसमोर आले व स्वामिनिष्ठेची ग्वाही दिली.

राजाराम महाराजांच्या चरित्राचा नीट अभ्यास केला तर ते स्वराज्य टिकवण्यात कारणीभूत ठरले असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. जिंजीला राजधानी करून त्यांनी मोगलांना शह दिला. इंग्रज – फ्रेंच – डच यांच्याशी दूरदृष्टीने आर्थिक व्यवहार करून स्वराज्याला आर्थिक बळ दिले. खुद्द औरंगजेबाचा पुत्र कामबक्ष व मोगल सेनापती झुल्फिकारखान यांच्याशी राजकारण साधून मोगल गोटात भेद करण्याची त्यांनी आपली मुत्सद्देगिरी दाखविली. असे त्यांच्या कर्तुत्वाचे कितीतरी अल्पपरिचित पैलू आहेत. त्यांच्या आज्ञेने कृष्णाजी अनंत सभासदाने सभासद बखरीच्या रूपात पहिले संपूर्ण विश्वसनीय शिवचरित्र लिहिले. मोगलांना झुलवत व झुंजवत ठेवून राजाराम महाराज १६९८ मध्ये महाराष्ट्रात आले व कोकणात उतरून सागरी किल्ल्यांची पाहणी केली. त्याच वेळेस राजाराम महाराजांनी आपल्या पुण्यशील पित्याच्या स्मरणार्थ सिंधुदुर्गावर शिवराजेश्वर मंदिर बांधले. सततच्या दगदगीमुळे वयाची तिशी उलटत नाही तेव्हाच राजाराम महाराजांचे सिंहगडावर निधन झाले. राजाराम महाराज खरंच काहीसे उपेक्षित राहिलेत. त्यांच्यावर फार कमी पुस्तकं लिहिली गेलीत. जयसिंगराव पवारांचा वगळल्यास त्यांच्यावर मोठा चरित्रग्रंथ नाही. काही लोक जेव्हा त्यांना नामधारी छत्रपती म्हणतात तेव्हा डोक्यात तिडीक जाते. अशांना त्यांच्याविषयी काहीच माहिती नसते. त्यांना त्या काळच्या इतिहासाचे अज्ञान असते. खंत वाटते. त्यांचा इतिहास वाचा, अभ्यासा, इतर छत्रपतींप्रमाणेच त्यांचाही जयजयकार करा, स्फूर्ती घ्या आणि कृतज्ञता व्यक्त करा एवढंच सांगणं.स्वराज्याचे तिसरे छत्रपति.

– प्रणव कुलकर्णी

Leave a comment