चामुंडा | आमची ओळख आम्हाला द्या

चामुंडा

चामुंडा | आमची ओळख आम्हाला द्या –

लातूर शहरामध्ये केशवराज मंदिर आहे. हे सिद्धेश्वर लातूरचे ग्रामदैवत आहे. मंदिराचे बांधकाम नवीन जरी असले ,तरी मंदिरात व मंदिर परिसरात प्राचीन मूर्ती दिसून येतात.  याच मंदिराच्या छोट्या देवकोष्टात श्री महिषासूर्मर्दिनी माता म्हणून पुजली जाणारी चामुंडा आहे. या मूर्तीचा वरच्या बाजूस महिषासुरमर्दिनी माता असे लिहिले आहे. पण ती मूळ चामुंडा आहे.

चामुंडा देवी चर्तुभुज असून उजव्या खालच्या हातात सुरा ,उजव्या वरच्या हातात डमरू, डाव्या वरच्या हाताच्या करंगळीत नख देवी आपल्या दातांनी कुरतडत आहे, डाव्या खालच्या हातात कपालपात्र आहे, मूर्तिशास्त्र लक्षण ग्रंथानुसार हिला कृश दाखवावे असा संकेत असल्याने ही कृश आहे. तिच्या हाताची आणि पायाची हाडे स्पष्ट दिसतात .देवीच्या डोक्यावर जटामुकुट आहे. कानात चक्राकार कुंडले, गळ्यात ग्रीवा, स्तन हार, कटकवलय, केयूर कटीसूत्र ,पाद वलय व पादजालक इत्यादी आभूषणांनी देवी सालंकृत आहे. रुक्ष स्तन व आत गेलेले पोट स्पष्ट दिसते.

आत गेलेल्या पोटावर विंचू कोरलेला आहे. देवीचे नेसूचे वस्त्र व त्यावरील अंकित मोत्यांच्या माळा अधिकच उठावदार आहेत. चेहऱ्यावरील भाव उग्र असून डोळे विस्फारलेले आहेत. देवीचे वाहन प्रेत या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे. देवीचे वाहन प्रेत असल्याने तिला प्रेत वाहना चामुंडा असेही म्हणतात. शेजारी उजवीकडे देवीचा गण उभा आहे .एकंदरीत ही सर्व लक्षणे चा मुंडेची असताना तिला महिषासुरमर्दिनी माता कोणत्या आधारावर म्हटले जाते हे समजण्यास कारणच नाही.

हा फोटो लातूरचे आमचे पोलिस मित्र धनंजय गुट्टे यांनी प्राप्त करुन दिला आहे.

डाॅ.धम्मपाल माशाळकर.
मूर्ती अभ्यासक, मोडीलिपी व धम्मलिपी तज्ञ सोलापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here