महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

तोफ भाग २ | तोफ, एक प्रभावी हत्यार

By Discover Maharashtra Views: 1315 14 Min Read

तोफ भाग २ | तोफ, एक प्रभावी हत्यार –

मागील लेखात तोफ भाग १ आपण तोफेचा शोध , तोफांची निर्मिती , तोफांचे व तोफगोळ्यांचे निरनिराळे प्रकार या विषयी माहिती घेतली. या भागात आपण, तोफ नेमकी कशी उडवत असत ? त्याचे काही शास्त्र किंवा तंत्र होते का ? या विषयी तोफ भाग २ जाणून घेणार आहोत.

—–: तोफ चालवणे किंवा गोलंदाजी – एक शास्त्रशुद्ध तंत्र :—–

“The future of the world is to the highly educated races who alone can handle the scientific apparatus necessary for preeminence in peace or survival in war”

म्हणजेच,

“शांततेच्या काळात (इतर जमातींवर) आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी, किंवा युद्धाच्या काळात शत्रूपुढे टिकाव धरून राहण्यासाठी अत्यावश्यक असलेले, शास्त्रीय उपकरणे कुशल पणे हाताळण्याचे ज्ञान , ज्या अत्यंत उच्च शिक्षित जमातींना अवगत झाले आहे, अशाच जमातींच्या हातात या जगाचे भवितव्य आहे ”

हे उद्गार आहेत ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचे ! (२१ मार्च १९४३) ज्या तोफांच्या आणि अग्निशस्त्रांच्या बळावर पाश्चात्यांनी , आणि विशेष करून इंग्रजांनी जगावर राज्य केले त्यांना , “योग्य शिक्षण आणि शास्त्रीय उपकरणे हाताळण्याचे कौशल्य, या गुंणांच्या जोरावरच आपण जगातील इतर जमातींवर राज्य करू शकू” हे सत्य, विन्स्टन चर्चिल यांच्या किमान दोन-अडीचशे वर्षे अगोदर किंवा त्याहूनही आधी समजलेले होते ! याचा पुरावा म्हणून १६३९ (सोळाशे एकोणचाळीस ) साली जॉन रॉबर्ट्स याने लिहिलेल्या एका पुस्तकाचे उदाहरण देता येईल. या पुस्तकाचे नाव आहे, “The compleat cannoniere: or, The gunners guide” ; कशाचे पुस्तक आहे हे? शास्त्र शुद्ध पद्धतीने तोफ कशी उडवावी याचे प्रशिक्षण देणारे हे गाईड किंवा मॅन्युअल आहे ! हे गाईड इंटरनेट वर येथे उपलब्ध आहे —> https://quod.lib.umich.edu/e/eebo/A10819.0001.001?view=toc

या पुस्तकाची नुसती अनुक्रमणिका चाळली तरी विस्मयाने तोंडात बोटे जातात ! या पुस्तकाची सुरवातच मुळी , स्क्वेयर रूट कसा काढावा, क्यूब रूट कसा काढावा अशा सारख्या गणितातल्या (आपल्यापैकी बहुतेक जणांना न आवडणाऱ्या) प्रकारणांनी होते आणि पुढे हा लेखक अत्यंत कुशलपणे, तोफ चालवण्याच्या कलेचा एक-एक पैलू आपल्यासमोर उलगडत जातो. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की तोफ उडवण्यासाठी गणित-बिणित शिकण्याची काय गरज आहे ? तोफेत दारू भरायची, गोळा घालायचा आणि बत्ती देऊन उडवायची तोफ, संपला विषय ! परंतु दुर्दैवाने तोफ परिणामकारक पद्धतीने उडवणे हे इतके सोपे काम नाही. ते साधण्यासाठी गणित, भूमिती आणि ट्रिग्नॉमेट्रीचे ज्ञान असणे अत्यावश्यक असते. किती झाले तरी तोफ हे एक शास्त्रीय उपकरण आहे; आणि शास्त्र व गणित हे एकमेकांचे सख्खे भाऊ असल्यामुळे , शास्त्रीय उपकरणांचा वापर करण्यासाठी थोडेतरी गणित यावेच लागते.

तोफ चालवण्याचे किंवा कोणतेही उपकरण हाताळण्याचे शास्त्रशुद्ध तंत्र अवगत नसले की काय होते, याचे उत्तम उदाहरण सी नॉर्थकोट पार्किन्सन, आपल्या “ईस्ट अँड वेस्ट” या पुस्तकात देतो, तो लिहितो, ” अल्फान्सो द अल्बुकर्क या पोर्तुगीज सेनापतीने इ.स. १५११ मध्ये आग्नेय आशियातले मलाक्का हे शहर काबीज केले तेव्हा त्याला तेथे अग्नीशस्त्रे व पोर्तुगीजपूर्व काळातील तोफांचे साचे सापडले ; किंबहुना मलय लोकांनी पोर्तुगीजांवर वेळूच्या कांड्यांमधून दारूच्या साह्याने डागलेल्या बाणांमुळेच पोर्तुगीज सैन्याची सर्वाधिक हानी झाली. परंतु तरी देखील पोर्तुगीजांनी हे शहर जिंकले , कारण मलय लोकांकडे ही शस्त्रे असली तरी ती प्रभावीपणे चालवण्यासाठी लागणारे तंत्र व कवायती सैन्य उपलब्ध नव्हते !

पुढे १८७१-७२ मध्ये सुलतान महादी (मलेशियातील सिलंगोरचा सुलतान) याच्या बाबतीतही तेच झाले. सुलतान महादीकडे तोफा होत्या, परंतु त्या एका जागी बांधून ठेवलेल्या असत; या तोफांचे तोंड समोरील परिस्थतीतीनुसार हवे तसे फिरवता येत नसे व त्या गरजेनुसार एखाद्या उंच गाड्यावर उचलताही (elevate) येत नसत. सुलतान महादीचे सैनिक तोफ उडवण्यापूर्वी त्या तोफेभोवती जमत व तोफ परिणामकारक रित्या उडावी म्हणून प्रार्थना करत ! आता अशी प्रार्थना करून का तोफ परिणामकारकपणे उडणार होती? तोफेसमोर हे असले तंत्र-मंत्र, पूजापाठ करणाऱ्या लोकांमध्ये एखाद्या उत्तम तोफेचा देखील विनोद करून ठेवण्याची पुरेपूर क्षमता असते !”

तोफांच्या बाबतीत हिंदुस्थानी लोकांचेही हेच झाले ! तोफांची नावं ‘मुलुख मैदान’, ‘ज्वालाभवानी’, ‘फत्तेमुबारक’ अशी उग्र ठेवली , परंतु शास्त्रशुद्धपणे या तोफा वापरण्याचे तंत्र आत्मसात केले नाही, त्यामुळे शास्त्रकुशल व युद्धकुशल इंग्रजांपुढे आपल्याला शरणागती पत्करावी लागली यात नवल ते काय !

———–: तोफ उडवण्याचे तंत्र :————–

“Be methodical if you would succeed in business, or in anything. Have a work for every moment, and mind the moment’s work.”

म्हणजेच,

“व्यवसायात किंवा कुठल्याही बाबतीत यश मिळवायचे असेल तर तंत्रशुद्ध राहा. प्रत्येक क्षणाला काम करा, आणि त्या क्षणाला हाती घेतलेले काम लक्षपूर्वक व चोख करा”

विल्यम मॅथीव्स (१९४२-१९९७) या कवीचे हे उद्गार आहेत. तोफांच्या बाबतीतही तंत्रशुद्ध पणे काम करण्याला अतिशय महत्व आहे. वर उल्लेख केलेल्या जॉन रॉबर्ट्स या १७व्या शतकातील लेखकाने तोफ कशी भरावी व उडवावी याचे तंत्र आपल्या पुस्तकात दिले आहे, या प्रकरणाचे नावच मुळी , “How to loade and fire a Peece of Ordnance like an Artist.” म्हणजे, “एखाद्या कलाकाराप्रमाणे तोफ कशी भरावी व उडवावी” असे आहे ! हे तंत्र पुढील प्रमाणे आहे:-

“प्रथम तोफेचे सर्व भाग जागच्या जागी आहेत याची खात्री करून , तोफ मारा करण्याच्या स्थितीत आणावी. वाऱ्याची दिशा पाहून , तोफेची दारू ठेवलेल्या कुप्या (budge barrel) तोफेजवळ योग्य ठिकाण पाहून ठेवाव्यात. या नंतर तोफेला बत्ती देण्यासाठी पेटवलेली मशाल वाऱ्याने विझणार नाही अशा बेताने आडोसा करून ठेवावी. या नंतर तोफेचा कान ( तोफेला बत्ती देण्यासाठी, तोफेच्या मागच्या भागात असलेले एक छोटे छिद्र ) साफ करून घ्यावा.(तोफ भाग २)

या नंतर एका सहकाऱ्याने तोफेच्या उजव्या बाजूला उभे राहून, तोफेच्या नळीत एक ओलसर स्पंज घालून ती आतल्या बाजूने पुसून घ्यावी, जेणेकरून तोफेच्या आत राहिलेली आधीची दारू पूर्णपणे निघून जाईल. तोफेचे स्पंजिंग झाल्यावर तोफेच्या आत साठलेला कचरा काढून टाकण्यासाठी तोफेच्या नळीवर हलक्या हाताने दोन-तीन तडाखे द्यावेत. यानंतर तुकडीतील दुसऱ्या एका माणसाने , तोफेच्या दारूची कुपी उघडून, पळीच्या (ladel) साह्याने त्यातली दारू काढून घ्यावी. पळीमध्ये जास्त झालेला दारूचा ढीग दारूच्या कुपीत काढून टाकून ,पळीला हलकासा झटका द्यावा, यामुळे पळीत भरलेली दारू पळीत नीट बसेल.

अशा प्रकारे पळी दारूने भरून घेतल्यानंतर, तोफेच्या उजव्या बाजूला, तोफेच्या नळीपासून शक्य तितके दूरवर उभे राहून, हात स्थिर ठेऊन , हातातली पळी तोफेच्या नळीत शेवटपर्यंत (तोफेच्या कानापर्यंत ) आत घालावी. पळी तोफेच्या नळीत शेवटपर्यंत गेल्याची खात्री झाल्यावर, पळीच्या मुठीजवळ असलेल्या छोट्या दांड्यावर उजव्या हाताचा अंगठा दाबावा व पळी पूर्ण उलटी करून हाताला थोडे झटके द्यावेत , जेणेकरून पळीतली दारू तोफेच्या नळीत पडेल. या नंतर पळी तोफेच्या नळीतून बाहेर काढून, एक चांगला बोळा (कापडी किंवा इतर ज्वालाग्राही पदार्थापासून तयार केलेला ) तोफेच्या नळीत घालावा व ठासणी (सळई) च्या साह्याने तीन -चार ठोके देऊन , ढोसून तो आधी घातलेल्या दारूपर्यंत भिडवावावा. असे ठोके दिल्यामुळे तोफेत ओतलेली दारू जर इतस्त: पसरली असेल तर ती एका जागी जमा होऊन तोफ चांगल्या प्रकारे उडते.

दारू भरताना व बोळा आतमध्ये घालताना , एका सहकार्याने तोफेचा कानावर आपला अंगठा दाबून धरावा. या नंतर तोफगोळा तोफेत घालावा व तो ठासणीच्या साह्याने आतल्या मिश्रणावर ठोकून बसवावा. यानंतर आधी घातला, तसला आणखी एक बोळा तोफेत घालून तो ठासणीने दाबून, तोफगोळ्यावर बसवावा. यानंतर तोफेच्या नळीत ठासणीने २-३ जोराचे ठोके द्यावेत, यामुळे तोफेच्या नळीत सर्वप्रथम ओतलेली दारू व त्यानंतर घातलेला बोळा, तोफगोळा आणि दुसरा बोळा हा सर्व ऐवज घट्ट बसून, या मध्ये पोकळी राहिली असेल तर ती निघून जाते.(तोफ भाग २)

एवढे झाले की वाऱ्याची दिशा बघून तोफेच्या दारूची कुपी पुन्हा तोफेजवळ आणावी व अपघात होणार नाही अशा बेताने तोफेजवळ ठेवावी. शेवटी तोफेचे तोंड काळजीपूर्वक लक्षाकडे वळवावे आणि तोफेच्या कानात दारू भरायला सुरवात करावी. ही दारू तोफेचा कान भरून, तोफेच्या कानाच्या भोवताली असलेल्या चकतीवर येई पर्यंत भरावी. असे केल्यामुळे सुरक्षितपणे तोफ पेटवता येते, अन्यथा तोफेची दारू पेटल्यावर तिच्या धक्याने हातातली मशाल उडून अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे काहीजण, तोफेच्या कानापासून दोन-तीन इंचापर्यंत दारूची ओळ करून, मग या दारूला मशाल लावतात, कारण तोफेचा कान जेवढा मोठा असेल तेवढी जास्त काळजी कानात दारू भरताना आणि तोफ उडवताना घ्यावी लागते.”

वरील वर्णन वाचल्यावर वाचकांच्या लक्षात येईल की तोफ भरणे व ती उडवणे हे एक तंत्रशुद्ध काम आहे आणि एक तोफ उडवण्यासाठी किमान ४ ते ५ लोकांची आवश्यकता असते. हे वर्णन वाचल्यावर तोफ भरणे व उडवणे हा एक वेळकाढू प्रकार आहे असे वाटेल, परंतु इंग्रजांनी या सगळ्या क्रिया कवायती मध्ये बसवून कमीत कमी वेळेत तोफ कशी उडवता येईल याचे एक तंत्रच तयार केले होते. याबद्दल इंग्रजांची तारीफ करावी तेवढी थोडी आहे.

तोफ भरणे आणि उडवणे यातील तंत्रशुद्ध पणा आणि शिस्त याबद्दल सी. नॉर्थकोट पार्किन्सन काय म्हणतो पहा :-

“तोफेचा किंवा अग्नीशस्त्राचा शोध हा लढाई जिंकण्यातला निम्म्याहूनही कमी भाग आहे. तोफेचा प्रभावी वापर करायचा असेल तर ती तोफगाड्यावर चढवून, तिची नियमित देखभाल करून, ती नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे. तोफेचे गोळे नेहमी घासून, पुसून आणि गंजू नयेत म्हणून रंग लावून ठेवले पाहिजेत. तोफेची दारू नेहमी कोरडी ठेवली पाहिजे, त्याचप्रमाणे दारू ठेवायच्या कुप्या देखील वेळोवेळी उलथ्या-पालथ्या करून स्वच्छ व कोरड्या ठेवल्या पाहिजेत. तोफ उडवताना लागणाऱ्या ठासण्या, दारू भरायच्या पळ्या आणि अशा इतर वस्तूंचे नियमित परीक्षण झाले पाहिजे.

तोफा उडवणाऱ्या तुकडीच्या लोकांना कवायत शिकवून , या कवायतीच्या माध्यमातून त्यांचे काम त्यांच्याकडून घोटून घेतले पाहिजे. तोफ उडवणाऱ्या माणसांच्या तुकडीतील माणसाला त्याचे स्वतःचे व आपल्या सहकाऱ्याचे देखील काम करता आले पाहिजे. या कवायतीचा अचूकपणा व वेग यावरच तोफेच्या माऱ्याचा अचूकपणा आणि तोफ उडवणाऱ्या तुकडीची सुरक्षा देखील अवलंबून असते . तोफ भरण्याच्या प्रक्रियेमध्ये थोडी जरी चूक झाली; उदाहरणार्थ तोफगोळा भरल्यानंतर तोफ ठासणीने चांगली ठासली गेली नाही तर तोफ फुटून, तोफ उडवणाऱ्या तुकडीचा जीव जाण्याचा संभव असतो.”

वर नमूद केलेल्या तोफ भरण्याच्या क्रिया किंवा कवायती अशिक्षित किंवा अर्धशिक्षित लोक सुद्धा थोड्या प्रशिक्षणाने प्रभावी पणे करू शकतात. परंतु तोफेचा अचूक नेम लागण्यासाठी या तुकडीतील प्रमुख गोलंदाजाला गणिताचे ज्ञान असणे आवश्यक असते. तोफेचा कोन, तोफेच्या माऱ्याचा मार्ग इत्यादी निश्चित करण्यासाठी क्वाड्रन्ट ( quadrant ) सारखी उपकरणे वापरता येणे आवश्यक असते. या सर्व गोष्टींचे सविस्तर ज्ञान जॉन रॉबर्ट्सने “The compleat cannoniere” मध्ये दिले आहे , त्यामुळे ते येथे विस्ताराने देण्याचा मोह आवरतो.(तोफ भाग २)

१७व्या शतकातील गोलंदाजी कशी होती हे दाखवणारा एक उत्कृष्ट व्हिडिओ युट्यूब वर उपलब्ध आहे. खाली संदर्भसूचीत पहिल्या क्रमांकावर या व्हिडिओची लिंक दिली आहे, तो वाचकांनी आवर्जून पाहावा. पहिल्या भागात वर्णन केलेले तोफगोळ्याचे हॉटशॉट व चेन शॉट हे तोफगोळ्याचे प्रकार व मॉर्टर तोफ देखील त्यात दाखवली आहे !

इथपर्यंत आपण तोफ म्हणजे काय आणि ती कशी उडवत असत हे बघितले. आता हिंदुस्थानी आणि मराठी तोफखाना कसा होता ते आपल्याला पहायचा आहे. परंतु हा विस्तृत विषय असून त्याला तत्कालीन समाजाची मनस्थिती, शिक्षण वगैरे अनेक पैलू असल्यामुळे, आपण हा विषय या लेखमालेच्या तिसऱ्या आणि अंतिम भागात पाहू . पण या भागाची एक छोटीशी झलक येथे पाहावयास हरकत नाही, ही झलक मी गो. नी. दांडेकरांच्या ‘दुर्गभ्रमण गाथा’ या पुस्तकातील काही भाग येथे उदघृत करून तुम्हाला दाखवणार आहे. पहा गो.नी.दा काय म्हणतात :-

“आंग्रेजी तोफांचा भडिमार अठराशे अठरामध्ये रायगडावर सतत आठवडाभर सुरु होता. ते आंग्रेज गोलंदाज होते, मराठे नव्हते. मराठयांच्या तोफा चालत, त्याचीही एक गंमत होती. तोपची थोडे होते. बहुदा ते सगळे मुसलमान असत. ऐयाशी. अगोदर तोफेचा मारा पक्का करायचा. “इधर नहीं, इधर ! हां, तो मै क्या कह रह्या था ? उधरच !” यांत घटकाभर गेली. मग तोफेच्या कान्यात वात ओवायची. मग बुंध्यात दारू भरायची. मग ती चेळायची. मग आत गोळा सोडायचा. मग त्यावर ताग, शेणकूट, असा भराव. तोही चेळायचा. मग एकदा हगायला जाऊन यायचं. मग एकदाची वात पेटवायची. गोळा बेअंदाजी कुठं तरी जाऊन पडायचा. मग चिलीम प्यायला मोकळे ! त्यात घटकाभर गेली ! असे दिवसांतून चार-पाच गोळे उडवले, की अगदी गगनींची घार मारली !

आंग्रेजांच्या तोफा अशा वेळकाढू नसत. हजारो मैलांवरून ते आलेले ….. तेंव्हा यांच्या तोफा एकदा मोर्च्यावर आल्या, कीं सतत रातदीस न पाहता आग ओकणारच. तशी ती रायगडीही ओकीत होत्या.”

************* तोफ भाग २ समाप्त ***************

संदर्भ :-

१) Cannon Gunnery – early 17th Century – https://www.youtube.com/watch?v=5caj4F4PI_s.
२) East and West – C.Northcote Parkinson.
३) A history of firearms from earliest times to 1914, W.Y. Carman (https://archive.org/details/in.gov.ignca.4174)
४) The compleat cannoniere: or, The gunners guide, John Roberts of Weston, 1639
(https://quod.lib.umich.edu/e/eebo/A10819.0001.001/1:2…)
५) Churchill By Himself, Richard M. Langworth.
६) दुर्गभ्रमण गाथा – गोपाल नीलकंठ दाण्डेकर.

लेखक :- सत्येन सुभाष वेलणकर, पुणे

टीप :- हा लेख प्रामुख्याने मध्ययुगीन तोफांना डोळ्यासमोर ठेऊन लिहिण्यात आला आहे.

Leave a comment