बिजवर विष्णू मंदिर, शनिवार पेठ, पुणे

बिजवर विष्णू मंदिर, शनिवार पेठ, पुणे

बिजवर विष्णू मंदिर, शनिवार पेठ, पुणे –

शनिवार पेठेत वीर मारुती मंदिराच्या शेजारी बापट कुटुंबियांच्या मालकीचे एक छोटेसे विष्णू लक्ष्मी मंदिर आहे. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात विठ्ठल लक्ष्मण लिमये यांच्या पराक्रमामुळे त्यांना शनिवार पेठेतील ही मंदिराची जागा १८०७ मध्ये मिळाली. त्यावर एक मंदिर उभारून त्यातील मूर्तीची स्थापना २२ मार्च १८३८ रोजी त्यांच्या पत्नी रखमाबाई लिमये यांनी केली. सध्याच्या मंदिराची उभारणी १८९० मध्ये झाली आहे. रखमाबाई यांचे नातेवाईक असणारे विद्वान पंडित विष्णू बापट ह्यांच्याकडे या देवस्थानाची जबाबदारी आली. त्यांच्याच वंशजांकडे सध्या बिजवर विष्णू मंदिर ह्या देवस्थानाची जबाबदारी आहे.

सुमारे मीटरभर उंचीच्या संगमरवरी विष्णुमूर्तीचे खालचे दोन्ही हात कमरेवर ठेवलेले असून वरच्या उजव्या हातात शंख आणि वरच्या डाव्या हातात चक्र आहे. मूर्तीचा कोरलेला मुकूट,  डाव्या खांद्यावरून गळ्यात रूळणारे जानवेही कोरलेलेच आहे. विष्णूच्या पायांजवळ गायी आणि पायाखाली गरुडही कोरलेला दिसतो. श्री विष्णुमूर्तीच्या शेजारी आकाराने लहान अशी पद्मासनस्थ लक्ष्मी मूर्ती असून तिला दोनच हात दाखविलेले आहेत. या दोन्ही मूर्तीना वेगवेगळी प्रभावळ दिसते. ही लक्ष्मी-नारायण दंपती जुन्या लाकडी मखरात स्थापन केलेली आहे.

या मंदिरातील लक्ष्मीची मूर्ती विष्णु मूर्तीच्या तुलनेत खूप लहान वाटते. मूळची लक्ष्मीची मूर्ती भंगल्यामुळे ही छोटी मूर्ती नंतर बसवली गेली. त्यामुळे या देवस्थानाला  बिजवर विष्णू मंदिर म्हणूनही ओळखले जाते. विठ्ठलाप्रमाणे दोन हात कटीवर असणाऱ्या ह्या विष्णु मूर्तीचे एकदा दर्शन घ्यायलाच हवे.

संदर्भ :
मुठेकाठचे पुणे – प्र. के. घाणेकर

पत्ता :
https://goo.gl/maps/ChvSEsGfM2wqA8Py6

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here