बाला त्रिपुरा देवी | आमची ओळख आम्हाला द्या

2 Min Read

बाला त्रिपुरा देवी | आमची ओळख आम्हाला द्या –

कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर याठिकाणी कोपेश्वर नावाचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरावरील शिल्पकला अप्रतिम आहे. हाताच्या अंगठ्याच्या आकारापासून ते सहा फूट उंचीपर्यंत च्या मूर्ती मंदिराच्या मंडोवरावर पहावयास मिळतात. अनेक देवी देवता, अष्टदिक्पाल, विविध प्रकारच्या देवांगणा, हत्ती, सिंह ,व्याल इत्यादींचे अंकन मंदिराच्या प्रत्येक भागावर केलेले दिसून येते. शिल्पकलेने नटलेले हे मंदिर स्थापत्य कलेचा अविष्कार म्हणावा लागेल. या मंदिराचा स्वर्गमंडप पाहिल्यास, खरोखर स्वर्ग असा असेल का? हा प्रश्न मनात निर्माण झाल्यावाचून राहत नाही. मंदिराच्या मंडोवरावर असलेल्या अनेक शिल्पांपैकी एक शिल्प म्हणजे सरस्वती म्हणून ओळखले जाणारे बाला त्रिपुरा देवी चे प्रस्तुत शिल्प होय.

भारतीय मूर्तिशास्त्राचा चिकित्सक अभ्यास करताना काही बाबी निदर्शनास आल्या. त्या अशा की, मूर्तीच्या हातातील एखादे आयुध ओळखून त्यावरून त्या देवतेची ओळख करणे. केवळ हातात पुस्तक(भुर्जपत्र) आहे, म्हणून प्रस्तुत मूर्तीस सरस्वती संबोधायचे का? अशाच पद्धतीने आजवर बऱ्याच मूर्तींची ओळख करण्यात आलेली आहे.

प्रस्तुत शिल्पातील देवी अर्ध पद्मासनात विराजमान आहे. डोक्यावर कलाकुसरयुक्त करंडक मुकुट आहे. मुकुटावरील नक्षीकाम रेखीव व आकर्षक आहे. कानातील चक्राकार कुंडले खांद्यावर स्थिरावलेली आहेत. गळ्यामध्ये ग्रीवा, हार ,स्कंदमाला, केयुर, कटकवलय इत्यादी अलंकार देवीने परिधान केलेले आहेत.देवी चतुर्भुज असून प्रदक्षणा क्रमाने खालचा डावा हात अभय मुद्रेत असून त्यात अक्षमाला आहे, डाव्या वरच्या हातात अंकुश आहे. उजव्या वरच्या हातात पाश, तर उजव्या खालच्या हातात भुर्जपत्र (पुस्तक) आहे. देवीच्या शरीराची एकंदरीत रचना अतिशय नाजूक आहे. दोन्ही पायाच्या मधे  नेसलेल्या वस्त्राचा सोगा अतिशय खुबीने कलाकाराने दाखवला आहे.

देवीचा चेहरा अत्यंत प्रसन्न वाटतो. डोक्या मागील प्रभावलयामुळे देवीचा चेहरा अधिकच उठावदार वाटतो. अशी हि  देवी सरस्वती नसून बाला त्रिपुरा देवी आहे. लक्षण ग्रंथात हिच्या आयुधांचा उल्लेख आहे. हिची उत्पत्ती कथा आहे. असे असताना केवळ हातात भुर्जपत्र (पुस्तक) दिसले म्हणून या मूर्तीस सरस्वती म्हटले गेले. परंतु ही सरस्वती नसून बाला त्रिपुरा देवी आहे. महाराष्ट्रातील अनेक मंदिरांवर ह्या देवीचे अस्तित्व आढळून येईल. पण त्यांची ही ओळख सरस्वती म्हणूनच केली जाते. परंतु असे नसून ती मूर्ती बाला त्रिपुरा देवीची आहे हे विसरून चालणार नाहि.

डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर

Leave a comment