बाजींद भाग २० | बहिर्जी नाईक यांची कहाणी

बाजींद भाग २० | बहिर्जी नाईक यांची कहाणी

बाजींद भाग २० | बहिर्जी नाईक यांची कहाणी…

बाजींद भाग २० – मोठ्या कुतूहलाने त्याने पहिले पान उघडले…तो वाचू लागला…वाचू लागला….आणि वाचतच राहिला…!

निमिषें,पळे, घटिका भूतकाळात विलीन होऊ लागल्या..तहान भूक विसरुन तो सर्वांगाने जणू डोळे करुन ती वही वाचू लागला…!
पहिला दिवस संपला… दुसरा…तिसरा…चौथा….पाचवा…!

तब्बल पाच दिवस तो आणि ती वही जणू एकरूप, एकजीव झाले होते…!

जेव्हा तो भानावर आला…तेव्हा त्याच्या डोळ्यातून धारा वाहत होत्या…अंगावरील रोमरोम पुलकीत झाले होते..!

तीच दुनिया जी पाच दिवसापूर्वीची होती..तो विचित्र नजरेने पाहत होता..!

भोवताली बसलेले ते वाघ असे का बसले होते इतके दिवस त्याचे रहस्य त्याला समजू लागले…!
विचित्र आवाज करुन त्याने त्या वाघांना जवळ बोलवले…मायेने कुरवाळले व तो थकल्या पावलांनी गुहेच्या बाहेर आला….!

समोर जो बलाढ्य हत्ती उभा होता तो शतश त्याच्यासमोर झुकून उभा होता…

तो त्या विस्तीर्ण जंगलात सर्वत्र मोठ्या आनंदाने पाहू लागला.
ते निर्जीव, निर्मनुष्य, भयप्रद जंगल त्याला विलक्षण सजीव वाटू लागले..!
आनंद अवर्णनीय होता..!

काय असे घडले होते त्याच्यासोबत ??
ती वही, साधी वही नव्हती ती बाजींद ने त्या वन्य प्राण्यांची भाषा समजून घेण्याचे जणू तंत्रच त्यात लिहले होते.
जशी माणसांची दुनिया असते, तशी प्रत्येक जीवांची पण दुनिया असते,भावभावनांचे अनेक खेळ जसे मानवी आयुष्यात होतात, अगदी तसेच पण वेगळ्या पद्धतीने प्राण्यांच्या दुनियेत होतात.
ती त्यांची भाषा शिकायचे जणू सांकेतिक स्फुट विज्ञानच बाजींद ने पुढील पिढीसाठी लिहून ठेवले होते.

ते कुठे व कसे लपवले याची माहिती कोणाला तरी दिल्याशिवाय त्याने प्राण सोडले नव्हते याची जाणीव सुर्यकांत ला झाली.
त्याचे डोळे अश्रूंनी भरुन गेले.

मग मात्र त्याने कंबर कसली.
उजाड झालेल्या चंद्रगड मध्ये पुन्हा जीव फुंकण्याचे ध्येय धरुन त्याने काम सुरु केले.
जंगली जनावरे त्याच्या एका शब्दावर काहीही करु लागली.

पण, जोवर शूरवीर मनुष्याची फौज उभी होत नव्हती तोवर बाजींद ज्या ध्येयासाठी खस्त झाला त्याच्या बलिदानाचे चीज होणार नव्हते, ज्या पवित्र भावनेने त्याने प्राण्याच्या गूढ भाषेचे ज्ञान लिहून ठेऊन त्याचा उपयोग समाजाला करता यावा ती भावना घेऊन उठलेले अनेक स्नातक निर्माण केल्याशिवाय होणार नव्हती.

या गोष्टीचा विचार करत महाराष्ट्रभरातून निस्वार्थी भावनेने प्रतिकूल परिस्थितीत लढत असलेले अनेक वीर सुर्यकांत ने एकत्र जमवले.
प्राण्यांच्या गूढ भाषा जाणणाऱ्या त्याच्या विलक्षण कौशल्याने सर्व त्याला जणू देवाचाच अवतार मानू लागले, पण प्रत्यक्षात तसे नव्हतेच…तो साधाच मनुष्य होता.
पण ज्याने जे काम उभे केले ते मात्र महान होते.
चंद्रगड ला “बाजींद” चे झपाटलेले जंगल बनवले.
इथे पाऊल ठेवणारा परका माणूस परत जिवंत जाणार नाही असा नियम बनवला गेला.
केवळ महाबलेशवर जंगल नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या आख्यायिकेत बाजींद बद्धल बऱ्याच अंधश्रद्धा पेरल्या गेल्या आणि ती शे दोनशे वीरांची टोळी देशासाठी जगू लागली.
पण, मर्यादा राखून..!
उभा आडवा महाराष्ट्र पारतंत्र्यात असताना शे दोनशे वीर उठून बंड कसे उभा करतील.
अशक्य होते ते, आता ते सर्व शोधत होते एक संधी.
सुर्यकांत ब्रम्हचारी राहिले व त्यांच्या फौजेतील सर्वात निस्वार्थी व पात्र धारकऱ्याला ते गूढ ज्ञान देत असत व त्याला “बाजींद” म्हणून सेनेचे नेतृत्व देत असत..!
100 वर्षे झाली हाडमांस शिंपून आम्ही हे बाजींद चे जंगल व दहशत टिकवून आहोत.
मी सध्याचा “बाजींद” या नात्याने नेतृत्व करत आहे.
गुप्तपणे सारा महाराष्ट्र फिरला, जागोजागी अन्याय, अत्याचार पाहून काळीज तुटत होते.

महाराष्ट्रावर परकीय आक्रमकांच्या टोळधाडी आळीपाळीने तुटून पडत होत्या.
वतने, जहागिरी यासाठी स्वकीय बांधवांचे अगदी आनंदाने गळे चिरणारी पिढी तयार होत होती.
आपण परकीय सत्तेच्या अधीन आहोत हेच लोकांना समजत नव्हते.
धर्म, मानवता नावालाही शिल्लक नसताना, एक बाल क्रांतिकारक उठला पुण्यातून ज्याने भागवत धर्माचा भगवा पताका आपल्या राज्याचा ध्वज म्हणून जाहीर केला आणि हिंदुस्थानातील पाचही जुलमी राजवटी विरुद्ध प्रचंड लढा उभा केला ते पण कोणतीही परिस्थिती अनुकूल नसताना..!

त्यांचे नाव …”पुण्यश्लोक शिवाजी महाराज”

महाराजांच्या या पवित्र कार्याची महती आमच्या रक्तारक्तात भिनली गेली.
तेव्हाच आम्ही ठरवले..हे बाजींद चे गूढ गुप्त ज्ञान आता फक्त आणि फक्त हिंदवी स्वराज्यासाठी द्यायचे…!

मी गेली ६ महिने आमच्या जंगलातील घरी गिधाडे खंडोजी तुझ्यावर पाळत ठेऊन आहेत.
जेव्हा तू यशवंतमाचीत कुस्ती खेळायला जाणार होतास तेव्हा स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांनी तुझ्यावर सोपवलेली यशवंतमाचीची जबाबदारी हे देखील मला या पशु पक्ष्यांनी सांगितले…!
तुझा या सवित्रीवर बसलेला जीव आणि बेरडाच्या हल्ल्यात तू कर्तव्य सोडून तू चूक करणार हे मी आधीच जाणले होते, तुम्हाला नाईलाजास्तव त्या दरीत उडी टाकून पळावे लागले आणि भिल्लांच्या भीतीने तुम्हाला इथवर आणण्या इतपत सर्वच्या सर्व घटना…..आपोआप घडल्या नसून…त्या मी घडवल्या आहेत..!

तुम्ही इथे आला नसून….आणले गेला आहात…!

असे म्हणताच बाजींद पुन्हा हसू लागला…आणि त्याच्या त्या हसण्याने जंगलातील सर्व प्राणी प्रचंड कल्लोळ करु लागले…!

सायंकाळच्या संधीप्रकाशात डोक्यावर धो धो पडणारा पाऊस वाचवण्यासाठी….खंडोजी, नारायण, सखाराम, मल्हारी व सर्जा पाचही जण एका विस्तीर्ण झाडाखाली उभे होते…अंगावरील बोचरी थंडी सोसत ते चौघेही खंडोजी च्या तोंडून ती बाजींद ची विलक्षण कथा ऐकण्यात गढून गेले होते…!

सुर्य अस्ताला जाऊ लागला अन खंडोजी उठला….!
त्याला जाणवले की कथा सांगायच्या नादात सुर्य अस्ताला जात आहे…तो ताडकन उठून भर पावसात भराभर पावले टाकत जाऊ लागला….!

त्याला त्या भर पावसात बाहेर जाताना पाहताच ते चौघेही त्याला हाक मारु लागले..पण विजेचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस यामुळे क्षणात तो दिसेनासा झाला…!

सखाराम ने दीर्घ श्वास घेतला आणि मल्हारी,सर्जा व नारायण कडे पाहत बोलू लागला…..!

गड्यानो, ह्यो खंडोजी साधासुधा माणूस नक्कीच नाय.
त्यो ज्या बाजींद ची कथा सांगतोय,त्यात नक्कीच कायतरी लपले आहे…चला…आजच्या रातीला निवारा हुडकुया…उद्या येरवाळी त्यो येडा नक्की हजर असलं….!

क्रमशः बाजींद भाग २० | बहिर्जी नाईक यांची कहाणी

संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

बाजींद कांदबरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here