छत्रपती शाहू महाराज आणि आवजी कवडे व मार्तंड मंदिराचा जीर्णोद्धार🚩
छत्रपती शाहू महाराजांच्या कारकीर्दीत सुद्धा मंदिराची नूतनीकरणे छत्रपतींच्या आज्ञेने घडून आलेली दिसून आली आहेत. मौजे अंदूर परगणे नळदुर्ग येथील प्राचीन मार्तंड देवाचे मंदिर मुसलमानांनी औरंगजेबाच्या महाराष्ट्रातील वास्तव्यात केव्हा तरी भ्रष्ट केले. तथापि तेथील पुजाऱ्यांनी मूर्ती तत्पूर्वीच मौजे बाले, परगणे सोलापूर या ठिकाणी सुरक्षितपणे हलविली. तद्नंतर ५०/६० वर्ष या ठिकाणीच मूर्ती सन्मानाने ठेवण्यात आली. पुढे आवजी कवडे या भक्ताला स्वप्नात दृष्टांत झाला की अंदूरचे प्राचीन मंदिर पुन्हा तू बांधून तेथेच माझी स्थापना करावी. तथापि या कामास नळदुर्ग चे देशमुख, नरसिंगराव, हैबतराव बंडगर आणि अजिजखान यांनी हरकत घेतलेली दिसून येते.
अजिजखान याने मंदिराच्या परिसरातील असलेली जुनी मशीद पाडून ती नवीन करण्याबद्दल फौजदाराकडे परवानगी मागितली. तथापि छत्रपती शाहू महाराजांनी आज्ञा केली की ही मशीद देवळाच्या परिसराच्या बाहेर बांधतील असे करणे. आणि जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार आवजी कवडे यांनी करावा. यास कोणी हरकत न करता साह्य करावे. देशमुख व बंडगर यांना ताकीद केली आहे की हे काम निर्विघ्नपणे पार पाडावे. याच पत्रातून देवाच्या पुजाऱ्यास अभय ही देण्यात आलेले आहे.
तथापि छत्रपती शाहू महाराजांची आज्ञा झाली तरी प्रत्यक्षात मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम इ. १७५९ मध्ये आवजी कवडे यांनी पूर्ण केलेले दिसते. अजून एका पत्रात केरोजी अटोळे मोकासदार यांना छत्रपती शाहू महाराजांनी कसबे जालना येथील समर्थ रामदास स्वामींच्या मठाचा विध्वंस अविंधांनी (मोगलांनी) केला होता तर त्याचीही पूर्व स्थापना करण्यास सांगितले आहे.
मार्तंड देवाच्या जीर्णोद्धार चे शाहू दफ्तरातील पत्र खाली देत आहे.
(सन १७४१)
राजमंडल
माहे सवाल
रोजकीर्दी
सु|| आसने
तेरीख ९ रोज मार्गसीर्ष शुध येकादसी इंदुवासरे शके १६६३ दुर्मतीनाम संवत्सरे मु|| शाहू नगर
किता येक चिटनीसी तीथवार छ मजकूर श्री मार्तंड वास्तव्य मौजे अंदुरे पाI नलदुर्ग येथे प्राचीन स्थल होते त्यास मोगलाच्या उपसर्गामुले पुजारी यानी श्रीची मूर्ती मौजे बाले पाI सोलापूर येथे नेऊन ठेविली मागे अविंदांनी देवालये होते ते भंगिले देवाची मूर्तीही आजी पनास साठी वरसे बाल्यातच राहिली सांप्रत श्री ने राजश्री आवजी कवडे यासी दृष्टांत दाखविला जे देवालये याचा जीर्णोद्धार करून पूर्ववत प्रास्थापना करणे त्यावरून त्याणी आंदुरियातील देवालये बांधोन तयार केल्याउपरी बालियातून मूर्ती आणून स्थापना करावी त्यास मूर्ती आणावयास कोणी हरकत करितात व नरसिंगराव देशमुख नलदुर्ग हेही खलेल करितात देवालयाजवळ मसीद आहे ते उलगडून नवीन बांधावयाविसी अबदुल अजीजखान याणे पाI मजुकुरच्या फौजदारास लिहिले पाI की ते जागा नवी मसीद बांधणार त्यास नरसिंगरावाकडून फौजदारास सांगोन श्रीच्या देवालयाच्या परिघांत मसीद आहे ते बाहेर बांधावी ते न करिता जुनी मसीद मागो नये येद्यापि मोडिली तर जेथील तेथेच बांधावी म्हणोन सांगतात हे गोष्टी कार्याची नव्हे याउपर फौजदारास च्यार गोष्टी सांगोन देवाच्या परिघाबाहेर मसीद बांधेत ते करणे आणि बालियातून श्रीची मूर्ती आणवणे श्रीच्या कार्यास कोणी हरकत करील त्यास ताकीद करून पूर्ववत पाI श्रीची स्थापना होऊन पूजा अर्चा चाले ते करणे पुजारी यास कौल देऊन मूर्ती आणवणे म्हणऊन पत्रे
१ नरसिंगराऊ देसमुख नलदुर्ग यास पत्र सदरहू मजकुरप्राI
१ सरदारानी पागा व सिलेदार व बाजे लोकानी यास दस्तक
१ राजश्री हैबतराव बंडगर अमीर उल् उमराऊ यास आज्ञा जे जो हरकत करील त्यास ताकीद करणे
१ उभयपत्री पुजारी यास
संदर्भ -(मूळ लेख माधवराव ओंकार व मधुकर रामचंद्र कुलकर्णी, पान नंबर १४५ ,१४७, पुस्तक – महाराष्ट्र इतिहास आणि संस्कृती – पर्यालोचन)
(पत्रासाठी संदर्भ – शाहू दफ्तर रू क्र ६अ , पत्र क्रमांक ४ , पुडके क्रमांक ६ आ, पत्र क्रमांक ७७७६)
मोगलाई प्रांतातील अंदुरे गावच्या मार्तंडदेवाचे मोगलांनी भंगीलेले देवालय बांधून त्यांत पूर्ववत मार्तंडाच्या मूर्तीची स्थापना मराठ्यांनी केली.
Atul Talashikar
