पुरंदर, एका शुर गडाची शोकांतिका –
व्यक्ती काय किंवा स्थळ काय, त्याच्या वाटेला सारखाच काळ येतो असे नाही. पुरंदरची आजची स्थिती अत्यंत बिकट आहे. नाजूक आहे. कधीकाळी दैदिप्यमान लष्करी आणि भौगोलिक मरातम मिळवलेला हा शूर गड भविष्यात केवळ दगडा मातीचा पहाड नाही राहिला म्हणजे मिळवलं. प्राचीन हिंदूंचे हे आधारस्थान होते, मुसलमानांचा हा आधारस्तंभ तर मराठ्यांचा हा कलीजाच होता! खांदेरी गड ज्यावत नौदालने नासावला, किंबहुना आगरी- कोळी लोकांनी ज्यावत त्याला weekend दारूचा अड्डा बनवला ते पाहून काळजाला ज्या चरा पडतात त्याहून अधिक घाव पुरंदरची सध्यस्थिती पाहताना पडता. पूर्वी ब्रिटिशांनी आणि आज भारतीय सेनेने पुरंदरची जी उपेक्षा चालवली आहे, त्याची तक्रार करण्याची कुठे सोय नसल्याने त्याप्रति निदान लिहिण्यावाचून मला गत्यंतर नाही हे उमगून पुढील प्रयोजन आरंभिले :
मुद्दा:
1. सन 1818 मध्ये पुरंदर पेशव्यांकडून ब्रिटिशांकडे आला आणि तेव्हापासून या गडाच्या दुर्भाग्याचा आरंभ झाला. तो आजही चालूच आहे. सन 1947 मध्ये गड ब्रिटिश आर्मीकडून महाराष्ट्र वा भारत सरकारकडे न येता परस्पर भारतीय सेनेकडे गेला.
2. रायगड व पन्हाळा प्रमाणेच पुरंदरच्या माचीला भिडणारा मोटारी रस्ता निर्माण झाल्याने माचीवर उत्तराभिमुख असलेल्या सरदरवाज्याचे अस्तित्व आणि त्याखाली असलेल्या वाटा पर्यायाने नष्ट झाल्या.
3. पुरंदरच्या माचीवर दहा फुटी काँक्रीटचा रस्ता असून भारतीय सेनेने केवळ मुरारगेट पासून भैरवखिंडीच्या अलीकडे पर्यंत जाण्यासच परवानगी दिली आहे.म्हणजे म्हकाळ व बावची माची फक्त दुरून डोळे भरूनच काय ती पाहता येते. अशा प्रकारे माचीचे संपूर्ण स्वरूप मन मानेल त्या कारभाराने बदलल्यामुळे तिला पूर्वीचे स्वरूप राहिलेले नाही, हे सांगणे न लागे !
4. माचीवर असलेला बुलंद सरदरवाजा पाहता त्याच तोलामोलाची तटबंदी (मेटे) माचीभोवती असणार. छोटेखानी पहारेखातर बुरुजांची पडझड सुरू होऊन शंभराहून अधिक वर्षे लोटली आहेत. बावची माची तर पूर्ण डोंगरजमा होऊन त्यावर कवायतीसाठी मैदान व हेलीपॅड देखील बांधला आहे. हा कळस नव्हे काय?
5. ब्रिटिश आमदनीत पुरंदरचा वापर अधिकाऱ्यांच्या हवा पालटाखातर, लष्करी सेनोटोरियमसाठ, करमणुकीसाठी – रिलॅक्सेशनसाठी करत. नंतर ट्रेनिंग सेंटर उभारण्यात आले. त्यायोग पेशवे,पुरंदरे व इतर साऱ्या वाड्यांवर बंगले उभारले गेले. याशिवाय लक्ष्मीनारायण, रामचंद्रजी, गजानन, सटवाई, गडदेवी पद्मावती यांची देवालय दुरुस्ती अभावी लय पावली. या देवता गडपायथ्याच्या गावी आजही आहेत. भारतीय सेना ब्रिटिश सेनेचे जुने कित्ते, प्रोटोकॉल्स गिरवण्यात अग्रेसर असल्याने आधीच असलेल्या कुधारणांत आणखी भर पडली आहे.
6. सन 1818 नंतर पुरंदरवर ख्रिश्चन मिशनऱ्यांचा राबता वाढला आणि त्यांनी गडावरील मंदिरांना उपसर्ग करायला सुरुवात केली. त्यापैकी हनुमंताच्या मूर्तीला इजा केल्याने पूर गावच्या लोकांनी कंपनी सरकारला तक्रार केली.आज ती चिन्हविछिन्न मूर्ती बालेकिल्ल्याच्वरील बिन्नी दरवाजाच्या आत डाव्या बाजूला तटाला पाठ टेकवून बेवारसपणे विसावत आहे. सन 1940 च्या कृ.वा. पुरंदरे संपादित पुस्तकात हिचा उल्लेख आहे. खूप वेळ शोध घेतल्यावर ही मूर्ती शिळा वाढलेल्या झाडीत जशीच्या तशी त्याच ठिकाणी मला सापडली. आपला नाकर्तेपणा किंबहुना नामर्दपणा उघडकीस आणणारा हा भक्कम पुरावाच नाही का?
7. आता जाऊ बालेकिल्ल्यावर, बालेकिल्ल्याचे तीन मुख्य भाग पडतात- कंद(खांद) कडा, राजगादी आणि केदार टेकडी. सिंहगडावर तानाजीं शिड्या लावून बालेकिल्ल्यात गेले, तसे प्रयोजन पुरंदरवर अजिबात नाही. हीच या गडाची खासियत! दिलेरखानाच्या अग्निभक्षात सापडला तो हा कंदकडा. त्यावरील पांढरा व काळा बुरुज केव्हाच जमीनदोस्त झाले. उर्वरित कंदकडा बुरुजासमवेत साऱ्याची कालवश पडझड झाली असून बहुदा चिंचोळ्या वाटेमुळे येथे जाण्यास संपूर्ण बंदी आहे.
8. बालेकिल्ल्याच्या प्रमुख पाच मोठ्या बुरुजांपैकी बिन्नी दरवाजातून प्रवेश करताना उजवीकडे लागतो तो निशाणीचा बुरुज. मोठ्या तोफा ठेवण्यासाठी, तसेच बंदुकीचा मारा करण्यासाठी अनेक जंग्या आजही स्पष्ट दिसतात. पूर्वी यावर जरीपटकाचे मुख्य निशाण सदैव असे. दसऱ्याच्या दिवशीच हे बदलले जाई. एरवी काव लावून रंगवीत असत. सध्या बालेकिल्ल्यावर जे काही निवडुंग, बेशरम, उनाड झाडांचं रान माजले आहे त्याला येथूनच प्रारंभ होतो.
8. त्याचप्रमाणे वर राजगादीवर जाण्यासही संपूर्ण बंदी आहे. जवानांची नजर चुकवून हत्ती बुरुज पाहत असताना वर जाण्याचा मी सायास करून पाहिला. पण अर्ध्या रस्त्यावरच छातीभर गवतात अडकल्याने पुढचा चढ अशक्य वाटून मी खाली उतरण्यास सुरुवात केली. उतरत असताना केदार टेकडीवरील जवानाने मला पाहिले. आणि त्यानंतर सुमारे तासभर उलट सुलट चौकशी करून मग सोडले. राजगडाप्रमाणेच राजगादीवर सुद्धा छत्रपतींचा आणि पेशव्यांचा वाडा होता. त्याची आज पूर्ण पडझड झाली असून आता वर काय रान माजले असेल ते एक पुरंदरेश्वरलाच ठाऊक.
9. दुसरा महत्त्वाचा बुरुज म्हणजे शेंदऱ्या बुरुज उर्फ शेंड्या बुरुज. या वाटेवर जाण्यास पूर्णतः मनाई असून सैनिकांची नजर चुकवून मी येथे गेलो. सध्या शेंदऱ्या बुरुज पूर्णतः निवडुंगाच्या जाळीने व्यापला असून तो धड नजरेस सुद्धा पडणे दुष्कर होते. एक फार प्रसिद्ध आख्यायिका सन १३८० बहमनी काळातली आहे – सुलतान पहिला महंमद याने गडाची दुरुस्ती करताना शेंद्ररी बुरुजाचा पाया उभा राहत नसल्याने बहिरनाक सोमनाक याला २०५ होन व दोन गावे इनाम देऊन त्याचा थोरला मुलगा नागनाक व सून देवकाई यांना जिवंत बुरुजाच्या पायाशी पुरून सोन्याच्या विटा लावल्या व त्यानंतर हा बुरुज उभा राहिला. या बहिरनाकचे अविचारे-अवचरे आडनावाचे वंशज आजही या इनाम जमिनीचा उपभोग घेत आहेत. येथे गाडलेल्या धनाच्या अपेक्षाने कैकांनी पूर्वी याजागी खणत्या लावल्या.
10. गडाच्या बुरुजावरून माचीखाली उतरण्यासाठी अनेक चोरवाटा, चोरदिंड्या, भुयारे होती. आजही आहेत. याचा प्रत्यय हत्ती बुरुज पाहताना आला. येथे आज रॉक क्लाइंबिंगची प्रॅक्टिस सैनिक करतात. सुदैवाने मी गेलो तेव्हा तेथे कुणीच नव्हतं. हा तीन स्तरांचा बुरुज असून दुसऱ्या बुरुजावरून तिसऱ्या बुरुजाकडे जात असताना भुयार लागते. ते पाहिले. बुरुजावरून माची उतरण्यासाठी सुद्धा एक चढ असलेले भुयार बहुदा होते, पण ते चिणून काढलेले आहे.
11. पुढे केदार टेकडी मागे कोकण्या बुरुज, फत्ते बुरुज यावरही अशाच चोरदिंड्या आहेत. पण आज तेथे जाऊ दिले जात नाही. केदारेश्वराला नमस्कार करून सेनेचे जवान आपली पाठवणी करतात. बाकी काही-काही एक पाहू देत नाहीत. बालेकिल्ल्यावर मोबाईल नेण्यास सक्त मनाई असून कागद पेन जरी हाती दिसला तरी बॅगेत ठेवण्यास सांगतात, हे विशेष!त्यामुळे सारं काही नजरेत साठवूनच बालेकिल्ला उतरावा लागतो.
12. केदारेश्वर मंदिराचे रंगकाम सध्या चालू आहे. ब्रिटिश काळात फक्त याच एका मंदिराची व्यवस्था ठेवली गेल्याने तेवढेच एक शाबूत राहिले आहे. बाकी बालेकिल्ल्यात प्रवेशत असताना डावीकडे कातळात कोरलेल्या गणेशमूर्तीची उध्वस्थ अवस्था पाहून काळजात ज्या कळा उठतात त्यांना पारावार नाही. इंद्राच्या मूर्तीचे वज्रलेपन झालेले असून त्यास नाव दिले नव्हते. म्हणून मी रंगारीला विचारले असता तो उत्तरला “ही ब्रह्मदेवाची मूर्ती आहे. तीवर तसे नाव द्यायला सांगितला आहे.” ते ऐकून मी डोक्याला हात लावला. बहुत सांगी करून अंतिम “हा रंगारी केवळ हुकूमाचा ताबेदार, या कडून काय अपेक्षा करणार?” या निष्कर्षावर येऊन मी केदार टेकडी उतरलो.
13. राजगडावरील चोर दरवाजा (मुळात हा चोर दरवाजा नाही), रायगडावरील वाघ दरवाजा आपातकालीन वा मागून गड उतरणार्या दरवाजांप्रमाणेच केदार दरवाजा पुरंदरवर आहे. हा केदार टेकडीच्या खाली असून आज तेथे जाण्यास संपूर्ण मनाई आहे. केदार दरवाजा सुद्धा सध्या चिणून काढलेला ऐकलं. त्या भागातली तटबंदी संपूर्ण नाहीशी झाली आहे.
14. आता पाहूया वज्रगड. पण अरेच्चा.. कसा पाहणार? भारतीय सेनेने तेथे जाण्यास सक्त मनाई केली आहे. सन 2017 मध्ये काही इतिहास मित्रांनी तिथे जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भारतीय सेनेच्या जवानांनी एके 56 त्यांच्यावर रोखून धरल्या. वज्रगड जवानांना नेमबाजीचा सराव करण्यासाठी नेमला असून इतरांना जाण्यास सक्त मनाई आहे.
एकंदर पाहता भारतीय सेना पुरंदर वज्रगड यांचा वापर केवळ कवायती, नेमबाजीचा सराव, रॉक क्लाइंबिंग आणि इतर प्रशिक्षणा खातर करते हे स्पष्ट आहे. बदल्यात त्याच्या देखभालीच बघणं दूरच पण साधं झाडी, कुरणे, ऊन-पाऊस-वारा या नैसर्गिक ऱ्हासातून होणाऱ्या हानिपासून संरक्षण म्हणून काही एक करत नाही. उलट वाटेल तेथे कॉंक्रिटीकरण करून कुधुनीकरण चालविले आहे.
वरील सेना उपक्रम इतरही करण्याजोगे असून पुरंदरवर जाण्यास, संशोधन करण्यास जी संपूर्ण सक्त मनाई करण्यात आली आहे त्याने हा आधीच विफलावस्थेत असलेला शूर गड बरबादीच्या दारात उभा आहे. त्यामुळे दुर्भाग्यने भविष्यात केवळ दगड धोंड्याचा राहणार, हे निश्चित.
भारतीय पुरातत्व खाते, महाराष्ट्र सरकार तसेच आपण आणि साऱ्या गडसंवर्धन मंडळांनी पुरंदरच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे.
तुर्त इतकेच!
ll श्री पुरंदरेश्वरचरणी अर्पणअस्तु ll
– श्रीयोग पाटील
