मल्लिकार्जुन मंदिर, पार्डा (दराडे), ता. लोणार, जि. बुलढाणा
लोणारपासून सुमारे ८ ते १० किलोमीटर अंतरावर पार्डा (दराडे) येथे जुन्या स्थापत्यशैलीचे, कोरीव दगडी काम आणि अप्रतिम प्राचीन शिल्पकलेने समृद्ध असे श्री क्षेत्र मल्लिकार्जुन महादेव मंदिर आहे. धार्मिक श्रद्धेसोबतच ऐतिहासिक, स्थापत्यशास्त्रीय आणि शिल्पकलेच्या दृष्टीने या मंदिराला विशेष महत्त्व आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये जाणवणारे हे शिवमंदिर परिसरातील भाविक तसेच इतिहासप्रेमी आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.
पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराचे संपूर्ण बांधकाम कोरीव दगडांनी केलेले आहे. मंदिराला तीन प्रवेशद्वारे असून, मुख्य गाभाऱ्यात मल्लिकार्जुनाचे शिवलिंग आहे. जागृत देवस्थान अशी भाविकांची श्रद्धा असल्याने श्रावणातील सोमवारी तसेच महाशिवरात्री, आमली बारस आणि विविध पर्वकाळात येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. श्रावण महिन्यात लोणार येथील विरज धारेचे पाणी आणून महादेवाचा अभिषेक करण्याची परंपराही आहे.
मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ अंगाने स्थूल, ठेंगणे आणि सुमारे दीड ते दोन फूट उंचीचे यक्ष-यक्षिणींचे शिल्प आहे. त्यांच्या हातात दिवा व मशाल असून, प्रसन्न मुद्रेतील ही शिल्पे जणू मंदिरात येणाऱ्या भाविकांचे स्वागत करत असल्याचा भास होतो. मंदिरासमोर नंदी असून, शिलास्तंभावर नागदेवतेचे सुंदर शिल्प कोरलेले आहे.
या मंदिराला प्राचीन धार्मिक आणि ऐतिहासिक संदर्भही जोडलेले आहेत. शिवपुराणातील चिलया बाळाची कथा याच परिसरात घडल्याचे सांगितले जाते. देवगिरीच्या यादवकालात हे ठिकाण महत्त्वाचे धार्मिक केंद्र असावे, असे येथील स्थापत्य आणि शिलालेखांवरून जाणवते. राजा रामदेवराय यांनी येथे दोन रात्री मुक्काम करून मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख असलेला शिलालेख येथे आढळतो.
मंदिरासमोर मोठी पुष्करणी आहे. पर्वकाळात हजारो भाविकांनी एकत्र येऊन स्नान करावे, अशा स्वरूपाची तिची रचना आहे. आजही या पुष्करणीच्या पाण्यात मोडतोड झालेल्या अनेक प्राचीन मूर्ती आढळतात. मंदिराशेजारी कोरीव दगडांनी बांधलेली विहीर असून, परिसरात दोन-तीन बारवांचे अवशेषही आढळतात. यापैकी एक बारव मंदिराच्या गाभाऱ्याजवळ झाकलेल्या अवस्थेत असल्याचे सांगितले जाते.
मंदिरात आतापर्यंत जवळपास चार शिलालेख आढळले असून, अक्षरांच्या वळणावरून ते १४व्या शतकातील असल्याचे मानले जाते. यादवकालीन गधेगळेचा लेख आजही ठळकपणे वाचता येतो. त्यावरील शापवचनात देवासमोर ठेवलेल्या मुद्रा घेणाऱ्यास २० आसूंचा दंड ठोठावण्यात येईल आणि दंड न देणाऱ्यास गाढव लागेल, असा उल्लेख आहे. त्याचबरोबर देवतेची पूजा-अर्चा करणाऱ्यास विजय प्राप्त होईल, असा आशीर्वादही या लेखात दिलेला आहे.
मंदिराच्या परिसरात विविध आकारांच्या अनेक प्राचीन शिवपिंडी आढळतात. चक्र, चांदणी, बदाम, गोल, त्रिकोणी आणि चौकोनी आकारांच्या शिवपिंडी हे येथील वैशिष्ट्य आहे. मंदिराच्या बाह्यांगावर विष्णूचे विविध अवतार कोरलेले असून, सप्तमातृका पट्ट, क्षीरसागरातील विष्णूचे शिल्प तसेच इतर अनेक प्राचीन शिल्पे मंदिराच्या शिल्पवैभवात भर घालतात.
श्रावणातील सोमवारी आणि प्रमुख धार्मिक पर्वांमध्ये मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. धार्मिक महत्त्वाबरोबरच यादवकालीन इतिहास, प्राचीन स्थापत्य, शिलालेख आणि शिल्पकलेचा अभ्यास करण्यासाठीही हे ठिकाण महत्त्वाचे आहे. मल्लिकार्जुन मंदिर हे केवळ श्रद्धास्थान नसून विदर्भाच्या प्राचीन सांस्कृतिक आणि स्थापत्य वारशाचा मौल्यवान ठेवा आहे. या ऐतिहासिक मंदिराचा पर्यटन विकास आराखड्यात समावेश करून त्याचे संवर्धन, जतन आणि योग्य पद्धतीने विकास व्हावा, अशी अपेक्षा आहे.
Written By: Vidarbha Darshan