बळवंतराव मेहेंदळे धारातीर्थी | Balwantrao Mehendale –
पानिपताच्या मुख्य रणसंग्रामाच्या साधारण १ महिना आधी पानिपताच्याच मैदानावर रोहिले, गिलचे आणि मराठ्यांच्या सैन्यात छोट्या-मोठ्या चकमकी चालू असतानाच मराठ्यांचे एक प्रमुख सेनानी, श्रीमंत भाऊसाहेब पेशव्यांचे परममित्र “बळवंतराव (तथा रामचंद्र) गणपतराव मेहेंदळे हे कार्तिक अमावस्या, रविवार, दि.७ डिसेंबर १७६० रोजी रणांगणावर धारातीर्थी पडले.”
दि.७ डिसेंबरला उत्तरेत थंडीची पहिली लाट आली आणि त्याच दिवशी मराठयांनी रणखांब उभारून अफगाणांना युध्दाचं आव्हान दिलं. म्हणजे काय तर मराठे व अब्दाली ह्या दोन्ही पक्षांच्या छावण्यांच्यामध्ये दोन्ही छावण्यांपासून काही अंतरावर झाडी तोडून मैदान करून एक रणखांब ठोकला होता. दोन्ही बाजूंचे सैन्य, तोफा आपापल्या छावणीबाहेर या खांबाच्या अनुरोधाने येत लढाई करीत आणि सायंकाळी आपापल्या छावणीत तोफांसहित परतत, ही साधारणपणे सध्याच्या छाजपूर गावी आहे. याच ठिकाणी महिनाभर अनेक लहानमोठ्या चकमकी घडल्या.
दि.७ डिसेंबर रोजीच मराठे तोफखान्याची नवी रचना करण्यात गुंतले होते. त्यांनी तोफाही मूळ छावणीपासून ओढून पुष्कळ पुढे आणलेल्या होत्या. या नव्या हालचाली नजीबखान आणि सुलतानखान रोहिल्यांनी पाहिल्या आणि अबदालीचा छावणी न सोडण्याचा हकूम मोडून बाहेर पडून तोफांची रचना करीत असलेल्या मराठ्यांच्या फोजेवर जोरकस हल्ला चढवला. तो सहन न होऊन सुरवातीला मराठ्यांची फौज तोफा सोडून छावणीकडे पळू लागली, हल्ल्याविषयी गैरसावध असणारे मराठ्यांचे सैन्य नजीबखाना आणि त्याचा भाऊ सुलतानखानाने मार देत ढकलत अगदी मराठ्यांच्या छावणीच्या खंदकाजवळ आणले.
सुलतानखानाने मराठ्यांच्या छावणीवर हल्ला केला, त्यादिवशी रणखांबाजवळ पहिली मोठी लढाई झाली, ही लढाई दुपारपासून संध्याकाळपर्यंत चालू होती. पाच सात हजार रोहिले आपल्या छावणीजवळ आलेले पाहून मराठ्यांनाही स्फुरण चढून ते लढण्यास बाहेर आले, तेव्हाच बळवंतराव मेहेंदळेही हे ही चेव येऊन आपल्या तुकडीसह पुढे सरसावले. इब्राहीमखान आणि बळवंतराव मेहेंदळे यांनी रोहिल्यांना असा काही सडकून मार दिला की ३/४ हजारांवर रोहिले मरून पडले आणि उरले सुरले जीव घेऊन पळत सुटले.
त्याचवेळी बळवंतराव मेहेंदळे निधड्या छातीने आपल्या फौजेला उत्तेजन देत थोडे पुढे गेले असता दुर्दैवाने एकाएकी त्यांस झंबुरकाचा गोळा लागून ते घोड्याखाली आले. चांगल्या पोषाखातला मराठा सरदार पाहून रोहिले त्याचे शीर कापण्यास पुढे सरसावले आणि त्यांनी त्यांच्या मानेवर तलवार चालवलीही. हे पाहून अकलूजचे खंडेराव नाईक निंबाळकर धाडसाने पुढे होऊन बळवंतरावांच्या प्रेतावर पडले आणि चार-पाच राऊतांच्या सहाय्याने त्यांनी अर्धवट मान कापलेले ते प्रेत तसेच मराठ्यांच्या गोटात आणले. इतके सर्व होईस्तोवर साधारणपणे रात्रीचे साडे आठ वाजले असून (अमावस्या असल्याने) अंधारात शत्रू कोण नी मित्र कोण ते ओळखता येईना त्यामुळे नाईलाजाने दोन्ही बाजूंचे योध्ये लढणे अर्धवट टाकून आपापल्या छावणीत परत गेले.
त्याच रात्री बळवंतराव मेहेंदळे ह्यांचे प्रेतांस विधिपूर्वक अग्निसंस्कार करण्यात आले. त्यांची पत्नी ताईसाहेब मेहेंदळे ह्या त्यांच्याबरोबर सती गेल्या. त्यांचा पुत्र अप्पा बळवंत मेहेंदळे, त्यांची बहीण म्हणजे नाना फडणीसांची आई हे आप्तही त्या करूण प्रसंगी छावणीत असल्याने छावणीत हलकल्लोळ उडाला. भाऊसाहेबांना त्यांचा उजवा हात असलेला आपला मित्र पडल्याने मोठा धक्का बसला. तसंच मराठ्यांच्या छावणीवरही काहीशी निराशेची व धोक्याची छाया पडली.
नाना फडणवीसांनी मोरोबा दादांना लिहिलेल्या पत्रात ते लढाईच वर्णन करताना म्हणतात – “छ.२८ रबिलाखरी श्रीमंतांकडील मोर्चावर चालून चार पाच हजार आले. लढाईस आरंभ होतांच अस्तमान झाले. ते दिवशी बळवंतराव गणपत (मेहेंदळे) यांस छातीत गोळी लागली. तसेच घोड्याखाली पडले. तो त्यांजकडील माणसे धावली. त्यातील एकाने तोंडावर वार केला. दुसऱ्याने गळा कापून ते शीर नेऊ लागले, तो पाच सात राऊत धावून सोडविले. गळा अर्धा कापला होता तसेच आणून दहन केले. समागमे स्त्री अग्निप्रवेश केली.” त्या दिवशी त्यांजकडील दीड हजार माणूस आपल्या आरुब्यापुढे पडले होते. औशीची तीन घटका रात्र पावेतो लढाई झाली. आपल्याकडील दिडशे पावेतो ठार व पाच सातशे पावेतो जखमी झाले. ही लढाई फार चांगली झाली होती; परंतु बळवंतराव यांचा असा प्रकार झाला त्यामुळे ते सर (शेर) झाले’
या प्रसंगाची इंग्रजी कागदोपत्री नोंद अशी – ‘मराठे आणि शहामध्ये मोठी लढाई झाली, दोन्हीकडचे मिळून बारा हजार सैनिक ठार किंवा जखमी झाले आणि अनेक सेनापती रणात पडले.’
© स्वराज्यसेवक
संदर्भ :
१) नानासाहेब पेशवा : एक विलक्षण कालखंड – ले. – उदय स.कुलकर्णी, अनुवाद – विजय बापये
२) मराठी रियासत : खंड ४ : पेशवा बाळाजी बाजीराव – गो.स.सरदेसाई
३) पानिपत : १७६१ – त्र्यंबक शंकर शेजवलकर
४) अज्ञात पानिपत – मनोज दाणी
५) पानिपतचा रणसंग्राम – शंभुराम रामचंद्र देवळे
६) पेशवे – श्रीराम साठे
