२८ नोव्हेंबर १६५९ सोमवारी रात्री पन्हाळगड हिंदवी स्वराज्यात दाखल झाला..!!
दि.२८ नोव्हेंबर १६५९, मार्गशीर्ष वद्य नवमी, शके १५८१, विकारीनाम संवत्सर, सोमवारी रात्री ६ घटीका रात्री करवीर महालक्ष्मीचा सिंह असलेला दुर्ग पन्हाळगड हिंदवी स्वराज्यात दाखल झाला..!! पन्हाळगड मराठ्यांच्या ताब्यात आला त्यावेळी सहा घटका रात्र झाली होती. अशी बारीक नोंद शिवापूरकर देशपांडे वहीत आहे. श्री शिवाजी महाराज पन्हाळगडावर रात्रीच प्रथम आले आणि ती सबंध रात्र त्यांनी चंद्रज्योती लावून त्यांनी सर्व दुर्ग अगदी निरखून पाहिला.
दि.१० नोव्हेंबर १६५९ रोजी अफजलखानाचा प्रतापगड पायथ्याशी वध केल्यानंतर महाराजांनी उसंत न घेता दुसऱ्याच दिवशी थेट वाई गाठून ती जिंकली. वाईला पुढील स्वारीचा कार्यक्रम निश्चित होतांच एकदम जवळच्या चंदन-वंदन किल्ल्यांना वेढा देऊन त्याची नाकेबंदी करण्यांत आली. पुढे लगेचच नेतोजी पालकर, दोरोजी नी खुद्द महाराज हे मराठ्यांचे तीन सूर्य तीन दिशांनी प्रथम चंदन वंदन हे दोन गड काबीज करत आदिलशाहीत घुसले पुढे खटाव, मायणी, अष्टी, कलेढोण, वडगाव, औदुंबर, मसूर, कुंडल वगैरे ठाणी घेत वाई ते कऱ्हाड हा मुलुख काबीज केला. त्यांनी १८ दिवसांत आदिलशाहीतले चंदन, वंदन, विशाळगड वगैरे सारखे १५ दुर्ग काबीज केले. लगेचच २५ नोव्हेंबर १६५९ रोजी कोल्हापूर काबीज केले. याच मालिकेतला परमोच्च बिंदू होता तो म्हणजे पर्णालदुर्ग काबीज करणे. त्याला आधी मराठ्यांनी वेढा घातला आणि लढाई सुरू केली आणि मग तो काबीज केला.
या प्रसंगाची जेधे शकावलीतली नोंद अशी की “शके १५८१ विकारी (नाम संवत्सर) मार्गेसीर्ष वद्य नवमी सोमवारी रात्री राजश्री स्वामीनी पनाळा घेतला..”
त्याच पन्हाळगडाचं वर्णन करताना कविराज भूषण म्हणतात –
‘देखत उंचाई उदरत पाग सुधी राह द्यौ सहू मै चढे तेजे साहसनिकेत है|
सिवाजी हुकूम तेरो पाय पैदलनी सलहेर परनालो से जीते जनू खेत है |’
त्याचा मराठी अर्थ असा –
‘ज्या दुर्गाच्या उंचीकडे पाहिले असता पागोटे गळून पडते आणि अत्यंत साहसी वीर दिवसाच जे किल्ले चढू शकतात असे साल्हेर आणि पन्हाळ्यासारखे दुर्ग तुझ्या हुकुमाने हे शिवाजी, तुझ्या पायदळाने शेतावर चालावे तितक्या सहजतेने जिंकले’
अफजलखानाच्या वधापासून ते पन्हाळ्याला वेढा घालुन युद्ध करून तो हस्तगत करणे, ह्यामध्ये फक्त १८ दिवसांचा काळ गेला, त्या अवधीत १५ दुर्ग महाराजांनी ताब्यात घेतले. ह्यावरून ही भरारी त्वरेची आणि आदिलशाहीच्या हृदयात धडकी भरवणारी झाली असेच आपण निश्चितच म्हणू शकतो.
© स्वराज्यसेवक
संदर्भ –
१) राजा शिवछत्रपती : पूर्वार्ध – बाबासाहेब पुरंदरे
२) शककर्ते शिवराय : खंड १ – विजय देशमुख
३) शिवचरित्र प्रदीप – द.वि.आपटे, स.मा.दिवेकर
४) शिवभूषण – निनाद बेडेकर
५) शिव-चरित्र निबांधवली – श्री शिवचरित्रकार्यालय, पुणे
