“चौऱ्यांशी बंदरी ऐसा जागा दुसरा नाही..!!”
२५ नोव्हेंबर १६६४ रोजी हिंदवी स्वराज्याच्या शिवलंकेच्या म्हणजेच जलदुर्ग सिंधुदुर्गाच्या बांधकामाला सुरुवात झाली.!! ह्या महाराष्ट्र देशातले अगदी दगड धोंडे सुद्धा हिंदवी स्वराज्याच्या कामी आलेत… सन १६५७ च्या कल्याण भिवंडीच्या स्वारीनंतर हिंदवी स्वराज्य पश्चिम दिशेला सिंधुसागरापर्यंत विस्तारले. जसे, ‘ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी, तसे ज्याजवळ आरमार त्यांचा समुद्र..!!’ आरमार उभारावयाचे तर जलदुर्गाचे पाठबळ हवेच आणि कोकणचा कारभार करायचा तर समुद्रावर स्वामित्व हवंच. सुसज्ज आरमार आणि त्याच्या मदतीस तेवढेच बेलाग, बलदंड असे जलदुर्गही हवेतच हे दुरदर्शी श्री शिवाजी महाराजांनी केव्हाच ओळखले होते. पुढे सन १६६४ मध्ये तळ कोकणच्या स्वारीच्या वेळी महाराज ससैन्य मालवणला आले असता मालवणच्या किनाऱ्यासमोरच भर समुद्रात एक बेट त्यांच्या मनात भरले. त्याचे नाव कुरटे बेट. ‘शुद्ध खडक, उत्तम स्थळ, विपुल गोड्या पाण्याचाही ठाव आहे, ऐसे पाहून राजियांनी आज्ञा केली- ह्या जागी बुलंद किल्ला बांधून वसवावा..!!’
त्यानुसार महाराजांनी इथे जलदुर्ग उभारायचे ठरवले. स्थानिक प्रजेला अभय दिले. वेदमूर्तींना हिंदवी स्वराज्याचा विश्वास दिला आणि महाराज भूमीपूजनास बसले. तो सुवर्णदिन होता “मार्गशीर्ष वद्य द्वितीया, शके १५८६, क्रोधीनाम संवत्सर, शुक्रवार दि.२५ नोव्हेंबर १६६४.”
दादंभट आणि जानभट अभ्यंकर ह्यांनी वेदमंत्रघोष सुरू केले. उदक सुटले, संकल्प सोडला. कोणत्याही कार्याचा शुभारंभ हा श्री गजाननाच्या पूजनानेच व्हायला हवा. जिथे महाराज भुमीपुजनाला बसले त्याच जागी एक मोठा खडक आहे. याला म्हणतात मोरयाचा धोंडा. त्याच मोरयाच्या धोंड्याची यथासांग पुजा करून राजांच्या हस्ते वेदघोषात आणि वाद्यांच्या मंजुळ स्वरात त्या नव्याने होऊ घातलेल्या जलदुर्गाचे भूमीपूजन यथासांग पार पडले.
पुढे लगेचच महाराजांनी बांधकाम प्रमुख हिरोजी इंदुलकर आणि गोविंद विश्वनाथ प्रभू सुभेदार यांना किल्ला उभारण्यासाठी आदेश दिला.. कुदळी, फावडी, खोरी, छिन्नी, हातोडया वगैरे साहित्य घेऊन पाथरवट, गवंडी, लोहार वगैरे बेटावर तळ देऊन कामास लागले. स्वतः हिरोजी इंदुलकरही कामाला लागले. किल्ल्याच्या बांधकामासाठी भरपूर बांधकाम साहित्य लागणार होते. त्याचीही जमवाजमव सुरू झाली. किल्ल्याच्या बांधकामात पोर्तुगीज कारागीरही होते.
ऐतिहासिक कागदपत्रांत ह्या दुर्गाच्या बांधकामाबाबत वर्णन असे आले आहे की – “मार्ग कठीण सर्पाकार, तरांडी होडी मात्र चालते. सभोवते सारे खडक. दुसरी तरांडी तीन कोसपर्येंत यावयास अगदी गति नाही” अशा ठिकाणी “पांच खंडी शिसे आणून जंजिरेचा पाया शोधून घातला.”
मुरूड जंजीऱ्याचे हबशी सिद्दी, मुंबईचे टोपीकर इंग्रज आणि दक्षिण आणि उत्तर फिरंगाणातील पोर्तुगीज यांच्या उरावर ही शिवलंका साकार होऊ लागली. त्यामुळे सन १६६५ मध्ये खुद्द श्री शिवाजी महाराज मुघल सरदार मिर्झाराजे जयसिंहाच्या प्रचंड स्वारीत गुंतले आणि तसेच पुढे आग्रा भेटीला गेले असता, तिकडच्या चिवट राजकारणात गुरफटले असतानाही त्यांचे लक्ष ह्या नव्या किल्ल्याच्या बांधकामावर होतेच. किल्ल्याच्या मजबूत आणि खणखणीत बांधकामासाठी महाराजांनी सुरतेच्या भरपाईच्या स्वारीतून झालेल्या धनाचा सदुपयोग करायचे ठरवले. कारण बखरीतल्या वर्णनानुसार ‘जंजिरा मुस्तेद करावयासाठी कोटि होनांचे उदक महाराजांनी सोडीले’
शेजारीच वेंगुर्ल्यामध्ये डचांची वखार होती, जवळच गोव्यामध्ये पोर्तुगीजही टपलेले होते आणि इंग्रज तर पाचवीलाच पुजलेले होते. पण तरीही शिवाजी महाराज किती दक्ष होते याचे उत्तम उदाहरण…
त्यावेळी त्यांनी हिरोजी इंदुलकर यांना लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज पत्रात लिहितात…
“आमचे लक्ष सिंधुदुर्गी स्थिरावले असे हे बरे जाणणे. अवघे काम चखोट करणे. माणसे नवीन आहेती. त्यास सांभाळोन इत्येकाचा उपेग करून घेणे. पाया बहुत भला रूंद घेणे, खाली अवघा कातळ तरी वरी थोर इमारत तस्माद दो बाजूस दोन हात जागा सोडोन तट उभारता येई इतकी रुंदी घेणे, तट कोठे रुंद, तर कोठे जागजागा अरुंद येणेप्रमाणे धरावा लागतो, अनुकूल दिसेल त्याप्रमाणे करणे. पायात ओतण्यापायी शिसे धाडायचे व्यवस्था केली असे, नीट पाहोन, मोजोन, माल ताब्यात घेणे. टोपीकर साहूकार लबाड जात. डोळ्यातील काजळ चोरुन नेतील. पत्ता लागो देणार नाहीत. पुनःत्परतोन त्या कामाचा रोजमुरा मागतील सावध असणे. गोडे पाणी हाताशी बहुत पाण्याच्या ठावापाशी टाक्या बांधोन त्यात वाळू साठवणे. गोड्या पाण्यामध्ये चार दोनदा भिजू देणे. खारटाण धुतले जाईल. ती धुतलेली (वाळू) वापरणे. चुनखडी घाटावरून पाठवित असो. बरी तपासोन घेत जाणे. मिसळ असणार नाही तरी सावध असणे उत्तम. रोजमुरा हररोज देणे जाणे, त्यास किमपी प्रश्नच न देणे.”
आपले बरेच आरमार मालवण किनाऱ्याच्या आसपास ठेवून त्यावर तोफा, दारूगोळा वगैरे युद्धोपयोगी सामानाची मुबलक तरतूद केली. किनाऱ्यावर ५००० मावळे लोकांची चौकी ठेवली. गोवेकर फिरंग्यांशी ह्या वेळी तह झाला असल्याने त्यांचे ह्या कामांत हरकत करण्याचे धैर्य झाले न्हवते. त्याचप्रमाणे वाडीकर सावंतही ह्या वेळीं महाराजांचे अंकित झाले होते, त्यामुळे त्यांच्याकडूनही काही अडथळा होण्यासारखा नव्हता. जी कांही भीती होती ती सिद्दी, इंग्रज व मोगलांच्या भाडोत्री जहाजांचीच. पण एकूणच पुढे पूर्ण बांधकामात त्यांच्याकडून काहीही उपद्रव झालेला दिसत नाही.
© स्वराज्यसेवक
संदर्भ :
१) शककर्ते शिवराय : खंड २ – विजय देशमुख
२) राजा शिवछत्रपती : उत्तरार्ध – बाबासाहेब पुरंदरे
३) मैत्री सागरदुर्गांची – प्र.के.घाणेकर
४) क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र – कृष्णराव अर्जुन केळुस्कर
५) सह्याद्री स्तोत्र – स.आ.जोगळेकर
६) शिवलंका सिंधुदुर्ग – प्रविण भोसले
७) महाराष्ट्राचे जिल्हे : रत्नागिरी (तत्कालीन सध्या जिल्हा सिंधुदुर्ग) – महाराष्ट्र सरकार प्रसिद्धी विभाग
