१७ ऑगस्ट १६६६ : न भुतो न भविष्यती आग्र्याहून सुटका..!!!
“पराभव (प्रभव) नाम संवत्सरे, शके १५८८, श्रावण वद्य द्वादशी, शुक्रवार दि.१७ ऑगस्ट १६६६ हा दिवस उजाडला. ३ महिने एकही शस्त्र हाती न धरता, थोडाही रक्तपात न करता सह्याद्रीतील एका स्वतंत्र स्वाभिमानी हिंदु राजाने मोठ्या चलाखीने, उत्तर हिंदुस्थानात निरंकुश सत्ता असलेल्या बलाढ्य व पाताळयंत्री मुघल बादशहा औरंगजेबाच्या शहास अखेर काटशह दिलाच.”
त्या दिवशी दुपारी ४ ते ५ च्या दरम्यान शिवाजीराजांनी आग्र्याच्या कैदेतुन स्वतःची, पुत्र संभाजीराजे आणि मागे राहिलेल्या इतर निवडक लोकांची मोठ्या चतुराईने सुटका करवून घेतली. नजरकैदेतून निसटण्यासाठीचा हा दिवस शिवाजीमहाराजांनी अतिशय विचारपुर्वक निवडला असावा. कारण –
१) त्या दिवशी शुक्रवार होता. म्हणजेच सरकारी दरबाराला साप्ताहिक सुट्टी होती. तसेच बादशहासहीत सर्वांची गर्दी नमाजासाठी मशिदीकडे असणार होती.
२) जुम्माचा दिवस म्हणून बाजारपेठही बंद होती.
३) दरबार नसल्याने त्यादिवशी संभाजीराजेही पूर्ण दिवस शिवाजी महाराजांजवळच असणार होते.
४) पहारे नित्याचेच होते पण सुट्टीचा दिवस असल्याने त्यातही थोडीशी ढिलाई अपेक्षित होती.
या सर्व गोष्टींमुळे राजांना व त्यांच्या बरोबरच्या लोकांना निसटून जाण्यास सर्व परिस्थिती पूर्णपणे अनुकूल होती. पूर्व योजनेनुसार त्या दिवशी मथुरेच्या ब्रम्हवृंदाला आणि फकिरांना वगैरे वाटण्यासाठी दुपारी ४ च्या सुमारास मिठाईचे पेटारे पाठवण्याचे ठरले होते, त्याप्रमाणे दुपारी पेटारे भरण्याचे काम सुरू झाले. त्या दिवशी सकाळपासूनच राजांचे ‘डोके दुखायला लागले होते’ म्हणून महाराज पलंगावरच स्वस्थ पडुन राहिले होते. त्यामुळे त्यांना औषध आणण्याच्या निमित्ताने त्यांचे राहिलेल्यापैकी बरेच लोक आधीच बाहेर पडले. नंतर दुपारी थोडं उशिरा दोन – अडीचच्या सुमारास महाराजांच्या जागी पलंगावर.. नव्हे नव्हे जणु मृत्यु शय्येवरच हिरोजी फर्जंद अंगावर शेला पांघरून झोपले. हिरोजींना राजांनी सूचना दिल्याप्रमाणे सोन्याचे कडे असलेला एक हात बाहेर काढुन ते झोपले. बलराम पुरोहित व त्याचे पहारेकरी अधुनमधून आत डोकावत होते, तेव्हा त्यांना काय वाटत असेल कोण जाणे..!!
सायंकाळी (४-३०/ ५ च्या आसपास) नमाजाच्या वेळेस मिठाईचे पेटारे राजांच्या डेऱ्यातून बाहेर पडले. प्रतापी शिवशंभू ज्यावेळी पेटाऱ्यातुन निसटले त्यावेळी बादशहा औरंगजेब आणि त्याचे बहुतांश अधिकारी जुम्म्याचा नमाज पढण्यात दंग होते. पेटारे तिथून बाहेर जात असताना पहारेकऱ्यांनी नित्यनेमे पहिले १/२ पेटारे तपासले, नेहमीप्रमाणे त्यात मिठाईच होती. शिवशंभू बहुधा त्यानंतरच्या कुठल्यातरी पेटाऱ्यात बसले असावेत. (किंवा शंभूराजे ज्या पेटाऱ्यात बसलेले त्या पेटाऱ्याचे भोई शिवाजी महाराज झाले होते असाही एक मतप्रवाह आहे).
पुढे रात्र झाली, रात्र पळापळाने वाढत चालली, रामसिंहाचे विश्वासू नोकर रामकीशन, जीवा जोशी, श्रीकिशन उपाध्याय व बलराम पुरोहित मात्र अधूनमधून महाराजांच्या शामियान्यात डोकावून बघत होते. पण राजांच्या पलंगापर्यंत कोणीच येत न्हवतं, दुरूनच आत काय चाललंय हे बघून पहारेकरी परत जात. नेहमीप्रमाणे ‘महाराज’ हात शेल्याबाहेर काढून झोपले होते. त्यांचा नेहमीचा मंदिलही उशाशी होता. एक सेवक पाय चेपत बसला होता. बाकी आत निःशब्द शांतता पसरलेली होती.
तीन महिने सहा दिवस शिवाजी महाराजांच्या डोक्यावर मृत्यू सतत वावरत होता पण काहीना काही कारण घडत गेले आणि महाराजांचे मरण टळत गेले. किंबहुना महाराजांनी त्यांच्या बुद्धीचातुर्याने शीतयुद्धाच्या डाव पेचांनी ते पुढे नेले. पण शेवटी पाश आवळले जातील याची खात्री पटल्यामुळे महाराज संभाजीराजांसह आग्र्यातून वेषांतर करून निसटले.
ह्या अत्यंत बिकट प्रसंगाच्या स्वकीय आणि परकीय कागदपत्रांत मिळणाऱ्या नोंदी याप्रमाणे –
{१} जेधे शकावली – शके १५८८, पराभव संवछरे, राजश्री सिवाजीराजे श्रावण वद्य द्वादसी अगरीयातून पेटारियांत बैसोन पळाले.
{२} सभासद बखर –
….मग एके दिवशी राजे व राजपुत्र एकच पेटारियांत बसले. पुढे मागे पेटारे करून मध्ये पेटारियांत बसून चालिले. ते वेळी आपला साज सर्व उतरून, हिरोजी फरजंद यास घालून, आपले पलंगावरी निजविला. हात मात्र त्याचा उघडा बाहेर दिसू दिला आणि शेला पांघरून निजविला. आणि एक पोरगा रगडावयास ठेवला. जवळील कारकून होते त्यास अगोदर दिल्ली पलीकडे तीन कोसावर एक गांव होता तेथे ठिकाण करून पुढे रवाना केले होते. आणि आपण उभयता पेटारियांत बसून निघोन चालिले. चौकीचे लोक होते त्यांनी एक दोन पुढील पेटारे उघडून पाहोन वरकड पेटारे न उघडिता जाऊ दिले. शहरावाहेर दोन कोसांवरी जाऊन पेटारे टाकून पायउतारा होऊन, कारकून ज्या गावी होते त्या गावास गेले.
{३} पोर्तुगीज कागदपत्रांतली नोंद – शिवाजी मोगलांच्या तुरूंगातून एका फळांच्या पेटाऱ्यातून निसटला. तब्बल छत्तीस तास तो त्या पेटाऱ्यात होता.
{४} सुरतच्या ईस्ट इंडिया कंपनीला सेंट जॉर्ज बोटीवरून इंग्रजांनी पाठवलेले पत्र –
शिवाजीवर इतका कडक पहारा ठेवूनही अखेरीला तो आणि त्याचा मुलगा असे दोघे दोन पेटाऱ्यात बसून निसटून गेले अशी खात्रीलायक बातमी नुकतीच आली आहे. त्याचा कोठेच तपास लागत नाही. या बाजूच्या प्रांतात (शिवाजीच्या सुटकेमुळे) सर्वत्र भीती आणि संशय याचे वातावरण पसरले आहे.
ही योजना ठरवणे आणि अंमलात आणणे म्हणजे अगदी तंत्रशुद्ध, नियोजनबद्ध फसवणुकीचा आणि संपूर्ण गुप्ततेचा एक अत्योत्कृष्ट आविष्कार आहे.
© स्वराज्यसेवक
संदर्भ :
१) शककर्ते शिवराय : खंड २ – श्री.विजय देशमुख
२) राजा शिवछत्रपती : उत्तरार्ध – बाबासाहेब पुरंदरे
३) Shivaji’s Visit to Aurangzib at Agra – जदुनाथ सरकार व रघुवीर सिंग
४) शिवचरित्र प्रदीप – द.वि.आपटे, स.म.दिवेकर
५) शिवचरित्र निबंधावली – श्रीशिवचरित्र कार्यालय, पुणे
६) राणा जयसिंग आणि शिवाजी यांची राजकारणी चढाओढ – वासुदेव सीताराम बेंद्रे
७) पोर्तुगीज-मराठे संबंध – स.शं.देसाई
८) शिवकालीन पत्रसार संग्रह : खंड १ व २ – श्रीशिवचरित्र कार्यालय, पुणे
९) छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथ – प्रमुख संपादक डॉ.जयसिंगराव पवार
१०) दिनविशेष – प्रल्हाद नरहर जोशी
विवेक जोशी
