भारतीय हत्ती, त्याचे संस्कृतीमधील महत्व आणि प्राचीन ग्रंथामधील उल्लेख
हत्ती हा प्राणी भारतीय संस्कृतीमध्ये प्रचंड शक्ती आणि प्रगतीचे प्रतीक मानला जातो. जैन,हिंदू आणि बौद्ध या भारतीय धर्मियांमध्ये हत्तीबद्दल अपार श्रद्धा आहे. इंद्र ही देवता ऐरावत नावाच्या हत्तीवर स्वार असते असे मानलं जात.हत्ती पर्जन्याचं प्रतीक आहे. महाराष्ट्रात पावसाच्या हादगा या राशीला हत्ती हे वाहन असते. जो पाऊस हत्तीसारखाच प्रचंड प्रमाणात पडतो अशी जन मनात भावना आहे.
भारतात हत्तीला माणसाळण्याचे काम खूप प्राचीन काळापासून सुरू झाल्याचे दिसते.आणि तो पाळीव प्राणी म्हणून माणसाच्या कामात मदत करू लागला असल्याचे अनेक प्राचीन पुरावे आपणास पहावयास मिळतात. भारतीय लोकांनी ओझे वाहण्यासाठी,प्रवासासाठी, मनोरंजनासाठी,युद्धासाठी, राजकीय आणि धार्मिक कामासाठी हत्तीचा वापर खूप जुन्या काळापासून केल्याच दिसत.सिंधू संस्कृतीमध्ये ही सापडलेल्या मुद्रा वरून हत्तीच्या अस्तित्वाचे पुरावे सापडतात.
दक्षिण भारतात प्रत्येक देवस्थानाच्या समोर एखादा हत्ती आपणास दिसेलच. म्हैसूरचा शाही दसरा हत्ती विना अधुराच आहे.महाराष्ट्रात ही अनेक देवस्थानांनी हत्ती पाळलेला दिसतो यात्रा,जत्रा यावेळी याच हत्तीवरून देवाची मिरवणूक निघत असते.जिनभास्कर भट्टारक पट्टाचार्य श्री.जिनसेन महाराज, करवीर पीठ यांच्या नांदणीच्या मठात ही धार्मिक कार्यासाठी हत्तीचा वापर होतो.
भारतात खूप प्राचीन काळापासून राजे युद्धासाठी आणि महत्त्वाच्या विविध राजकीय सोहळ्यासाठी हत्तीचा वापर करत आले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळी रायगडावर तीन हत्ती मिरवणुकीत सामील होते असे दाखले मिळतात ज्यातील एका हत्तीवर राजे स्वतः अग्रस्थानी बसले होते.
अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये हत्ती बाबत लिखाण झाल्याचं दिसतं.पाल्यकाप्य यांचे “गज आयुर्वेद”, बृहस्पती यांचे “गजलक्षण”,कौटिल्य यांचे “अर्थशास्त्र”, नीलकंठ यांचे “मातंगलीला”, हेमाद्रीचे “गजदर्पण” चालुक्य नृपती सोमेश्वर तिसरा याचे “मानसोल्लास” इत्यादी ग्रंथ सांगता येतील मात्र दुर्दैव म्हणजे यातील बऱ्यापैकी रचना आज मिळत नाहीत.
मुखत्व पाल्यकाप्य या मुनींच नाव आवर्जून घ्यावं लागतं त्यांनी लिहिलेल्या “हस्ति आयुर्वेद” किंवा “गज आयुर्वेद” या ग्रंथात हत्तींचे वर्गीकरण,आहार,विहार,त्यांना होणारे रोग,त्यावरील उपचार,त्यांचे प्रशिक्षण आणि मानव जातीसाठीचे उपयोग यावर भरपूर अभ्यास आणि लिखाण केलं आहे.पाल्यकाप्य मुनी हे जंगलामध्ये हत्तीच्या कळपासोबत रहायचे आणि त्यावेळी त्यांनी केलेली निरीक्षणे त्यांनी या ग्रंथात नोंदवली आहेत. याच बरोबर जैन मुनी हंसदेव यांनी ही “मृगपक्षिशास्त्र” या ग्रंथात हत्ती, सिंह,वाघ,गेंडा,विविध पक्षी व इतर प्राण्यांचे, त्यांच्या आहार,विहार,संगोपन,प्रकार, प्रजनन आणि त्यांच्या स्वभावाचे सुंदर वर्णन केली आहेत.
हिंदू धर्मीयांमध्ये गणपती हा मानवाचे शरीर आणि हत्तीचे शिर असलेला कलेचा देवता मानला जातो.
जैन धर्मामध्ये सुद्धा हत्तीचे महत्व असून तीर्थंकरांच्या पंचकल्याणक मध्ये इंद्र ही देवता त्याच्या पाच सोंडेच्या सफेद हत्तीवरती बसून येते असे मानले जाते.त्याच बरोबर जैन धर्मामध्ये चौवीस तीर्थंकर जे आहेत या चौवीस तीर्थंकरांचे प्रत्येकी एक असं वेगळे चिन्ह आहे. जसे भगवान आदिनाथ यांचे बैल चिन्ह, भगवान महावीरांचे सिंह चिन्ह त्याच प्रमाणे हत्ती हे तीर्थंकर अजिनाथ भगवान यांचे चिन्ह आहे.
जैन मतानुसार तीर्थंकरांच्या जन्माआधी तीर्थंकरांच्या मातेला दिव्य अशी १६ स्वप्न पडतात त्या स्वप्नामध्ये मातेला पडलेलं हत्ती हे एक पवित्र स्वप्न असत. अशा प्रकारे तीर्थंकर जन्माआधीपासून जैन धर्मामध्ये हत्तीचे महत्व अधोरेखित होते.
बौद्ध धर्मीयांमध्ये ही गौतम बुद्ध जन्माआधी त्यांच्या मातेला सफेद हत्तीचे स्वप्न पडल होत असे उल्लेख आहे.त्याच बरोबर महायान संप्रदायातील तांत्रिक शाखेतील विनायक ही हत्तीच शिर व मानवी शरीर असलेली देवता प्रवास करणाऱ्या भिक्खू ना विघ्न आणणारी मानली गेली तदनंतर हीच देवता विघ्न हरण्यासाठी पूजली जाऊ लागली.असे काही संदर्भ पहावयास मिळतात.विनायक ही एक बोधिसत्व देवता मानली गेली आहे.
भारतातील जैन,हिंदू आणि बौद्ध या तिन्ही धर्माच्या वास्तू शिल्पकलेमध्ये सामायिक आढळणारे एक शिल्प वा चित्र म्हणजे गजलक्ष्मी. ज्यात मधे लक्ष्मी असते आणि तिच्या दोन्ही बाजूला एक एक असे दोन हत्ती जलकुंभ अथवा फुलांचा हार घेऊन उभे असतात. असे शिल्प अनेक लेण्या,मंदिर यावर पहावयास मिळतात.गजलक्ष्मी ही सुख,समृद्धी,ऐश्वर्य व सामर्थ्याचे प्रतीक मानली जाते.वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेण्यांमध्ये गजलक्ष्मीचे शिल्प पहावयास मिळते त्याच बरोबर जैन तीर्थक्षेत्र श्रवणबेळगोळ येथील विंधगिरी डोंगर चढल्यानंतर तेथील एका प्रवेशद्वारावर हे गजलक्ष्मीचे शिल्प आपणास स्पष्ट पहावयास मिळते. गजलक्ष्मी ही पर्जन्याची ही देवता मानली असून हत्ती मेघांचे प्रतीक तर लक्ष्मी ही पृथ्वीचे प्रतीक आहे.
जैन मुनी हंसदेव यांचा “मृगपक्षिशास्त्र” हा पशुपक्षी शास्त्रावरील एकच संस्कृत भाषेतील ग्रंथ आज उपलब्ध आहे. या ग्रंथात ते जंगलात १३ प्रकारचे हत्ती आढळतात असे सांगतात.त्यामधील शारीरिक जडण घडणं,वागणूक गुणवैशिष्ट्यांनुसार भद्रगज, मंदगज आणि सकीर्णगज हे हत्ती राजाने आपल्या पदरी बाळगावे असे ते म्हणतात त्याच बरोबर पद् मी गज मंत्री,सेनापती,युवराजांच्या वापरासाठी उत्तम असल्याचे ते सांगतात.
१.भद्रगज:- माहुतच्या मनासारखे वागणारे आणि शरीरावर शुभकारक भोवरे असणारे, सामर्थवान आणि ऐश्वर्य वृद्धिंगत करणारे असतात त्यांना राज्याभिषेक, पट्टाभिषेक कार्यक्रमावेळी वापरावे.
२.मंदगज:- युध्दात कुशल असतात त्याच बरोबर ओझे वाहण्यास चांगले असतात.
३.संकीर्ण गज:- शुभ समजले जातात,लवकर माणसाळतात, माहुताचे ऐकणारे,त्यांचे खाणे पिणे जपल्यास कोणते ही काम बिनचूक करणारे असे असतात.
४.पद् मी गज:- गळ्यात,अंगावर झुल असावी असे मनात बाळगणारे,नेहमी कार्य तत्पर,थोडे शिकवले तरी लगेच शिकणारे,बुद्धिमान मालकाच्या आज्ञा मानणारे, दुर्गुणरहित असतात.हाच हत्ती धार्मिक कार्यासाठी ही योग्य असावा.
जंगली हत्ती पकडण्यासाठी जलबंधनादी उपायांनी शिकाऱ्यांनी त्यास सुखाने मिळवावे असे जैन मुनी हंसदेव आपल्या ग्रंथात सांगतात तसेच भुकेने व्याकुळ आणि हत्तीनीने तिरस्कारीलेले पिल्लू प्रयत्नांनी मिळतात असे ते लिहतात.
आणखीन एक जैन मुनी हेमचंद्र यांनी सुद्धा आपल्या “अभिधान चिंतामणी” या ग्रंथात हत्तींच्या ४ जाती सांगितल्या आहेत.
“भाद्रो, मंदो, मृगो, मिश्र: चतस्रो गजजातय.”
चालुक्य नृपती सोमेश्वर तिसरा यांनीही आपल्या “मानसोल्लास” या ग्रंथात हत्ती वरती लिखाण केलेलं आहे. याने ही हत्तींचे ४ प्रकार सांगितले आहेत. हा तोच नृपती आहे जो साहित्य प्रेमी होता आणि जो आपल्या युवराज अवस्थेमध्ये राजा विक्रमादित्य सहावा यांच्या वतीने तेरदाळ ( कर्नाटक) येथील शिलाहार राज्याच्या गोंक जिनालयामधील भ.श्री नेमिनाथ मूर्ती प्रतिष्ठापना वेळेस तेथे रठ्ठ राजा कार्तवीर्य तृतीय,कोल्हापूर शिलाहार महासामंत निमदेव यांसोबत कार्यक्रमास हजर होता.
अशा प्रकारे भारतीय संस्कृतीमध्ये, समाजामध्ये प्राचीन काळापासून हत्तीच्या पालनासाठी उपयुक्त असे अभ्यासपूर्ण ग्रंथ निर्माण झाले असून जे हत्ती पकडण्यापासून त्यांच्या संगोपनाची शास्त्रीय माहिती आपणास पुरवतात.हत्तीला होणारे रोग,त्यावरील उपचार,हत्तींचे प्रजनन,संगोपन,आहार,विहार त्यांचा विविध कारणासाठी योग्य वापर यासारखी अफाट माहिती ही ग्रंथ आपणास देतात त्यामुळे भारतीय लोकांना हत्ती कसा पाळावा हे दुसऱ्या लोकांनी येऊन सांगण्याची काहीही गरज नाही. एव्हाना आम्ही लोक कसे हत्ती पळतो हे त्यांनी शिकून घ्यावे.
(संदर्भ: मृगपक्षिशास्त्र, हंसदेव. संकलक: डॉ.मारुती चितापल्ली )
✍️श्री. वर्धमान श्रीपाल दिगंबरे
वळीवडे,कोल्हापूर
8805783121
