मराठी भाषेचा इतिहास आणि जैन धर्म

मराठी भाषेचा इतिहास आणि जैन धर्म

मराठी भाषेचा इतिहास आणि जैन धर्म –

जगातील प्रत्येक व्यक्तीला आपली मातृभाषा ही प्रिय असते.मग आमच्या मराठीचे तर काय बोलू कौतुके…..इतकी रसाळ,गोमटी,सुंदर भाषा आपली मातृभाषा असणे म्हणजे आपले भाग्यच म्हणायचे. जगातील बोलल्या जाणाऱ्या भाषांचे भाषाकुल सिद्धांत नुसार वर्गीकरण करण्यात येते.त्यानुसार भारतातील भाषा ४ भाषाकुलामध्ये बोलल्या जातात.त्यातील मराठी ही  इंडो युरोपियन भाषाकूलातील एक भाषा आहे.मराठी भाषेचा इतिहास.

जैन धर्माचा भारतीय भाषांच्या विकासामध्ये भरीव असा वाटा राहिला आहे. तमिळ,तेलगू,कन्नड या भाषेतील प्रारंभीच्या साहित्य रचना ह्या जैन साहित्य कलाकृतीच आहेत. मराठी आणि गुजराती या भाषाही जैन महाराष्ट्री या प्राकृत भाषेतूनच उदयाला आल्या आहेत.प्राकृत महाराष्ट्री या भाषेत जैनाचार्यानी विपुल प्रमाणात ग्रंथ रचना केल्या आहेत,त्यामुळेच त्या भाषेला जैन महाराष्ट्री असे नावं पडले. मराठी भाषेची जडण घडण प्राकृत -> महाराष्ट्री प्राकृत ->महाराष्ट्री अपभ्रंश -> मराठी अशी एकंदर झालेली दिसते.

मराठी भाषेचा इतिहास शोधण्याचा जर प्रयत्न केला, तर इ.स ७७८ सालच्या “कुवलयमाला” या उद्योतन सूरीकृत जैन ग्रंथात ‘इय अठ्ठारस देसी ‘  म्हणून ज्या अठरा देश भाषांचा उल्लेख केला आहे त्यात मराठीचा उल्लेख येतो. तसेच श्रवणबेळगोळ येथील इ.स ९८१ मध्ये घडवण्यात आलेल्या भगवान गोमटेश्र्वर यांच्या उतुंग मूर्तीच्या पाया शेजारी कोरलेला

–  श्री चामुंडराये करवियले, गंगाजे सूत्ताले करवियले |

हा शिलालेख मराठीतील आद्य शिलालेख म्हणून निदर्शनास येतो.

आज जरी आक्षीचा शिलालेख उजेडात आला असला तरी तो संस्कृत मिश्रित आहे.त्यामुळे श्रवणबेळगोळ येथील भगवान गोमटेश्र्वरांच्या पाया शेजारील शिलालेख मराठी भाषेच्या दृष्टीने प्रौढ असा आद्य शिलालेख होत.

मराठी भाषेचे दाखले प्राचीन कन्नड साहित्यातही मिळतात. सुप्रसिद्ध कन्नड कवी पंप यांच्या इ.स.९३२मध्ये  रचलेल्या ‘विक्रमार्जूनविजय ‘ या काव्यात द्रोणाचार्यांच्या तोंडी “अरे होय जाबाप्पा” असे मराठी उद् गार घातले आहेत.या काळातील मराठी भाषेतील साहित्यकृती जरी मिळत नसली तरी वरील उद् गारावरून मराठी भाषा ही त्यावेळी बोलली जात होती हे सिद्ध होते.

कविश्रेष्ठ पंप हे चालुक्य राजा अरिकेसरी-२ याच्या दरबारातील प्रसिद्ध जैन कवी होते.

चालुक्य राजा सोमेश्वर तिसरा ( भूलोकमल्ल) (इ.स.११२६-११३८) याने रचलेल्या ‘मानसोल्लास’  नावाच्या संस्कृत ग्रंथात काही मराठी पदे आली आहेत. या राजाच्या अमलाखाली बराच मराठी भूभाग येत होता.त्यामुळे येथे बोलीभाषेचा साहित्यातील वापर स्वाभाविक आहे.कराड कन्या म्हणून इतिहासात प्रसिद्ध चंद्रलेखा ही शिलाहार राजकन्या  भुलोकमल्ल सोमेश्वर तिसरा याची आई होती. पिता विक्रमादित्य सहावा व राणी चंद्रलेखा यांनी जैन धर्माला अनेक दान दिल्याचे दाखले मिळतात. भुलोकमल्लने ही या धर्माला राजाश्रय दिला होता.

सुमारे याच काळातील गुजरात मधील जैन कवी यशचंद्र (इ.स.११२८)यांच्या “राजमती प्रबोध” या काव्यात एका महाराष्ट्रीयनाने राजमतीच्या सौंदर्याचे वर्णन मराठीत केल्याचे दाखवले आहे ते असे –

“देव चतुरागुळाची जीहा मी काई सांघवी|
गोमटी मुह फाफट नीलाट  चापटू”

तसेच १४ व्या शतकात नयचंद्राने आपल्या हिंदी “रंभामंजरीत” आणि इ.स.१२१० मध्ये कन्नड कवी रण्ण यांनी अनंतनाथ पुराणात मुद्दाम मराठी पंक्तीचा उपयोग केला आहे. या प्रमाणे जैन कवींनी मराठीचा उपयोग करून तिच्या अस्तित्वाचा पुरावा इ.स. च्या ८ व्या शतकापासून दिला आहे.व मधून मधून तिचा उपयोगही केला आहे.

इ.स.५ वे ते १० वे शतक हा अपभ्रंश भाषेचा काळ मानला जातो.आणि इ.स.१४ व्या शतकापर्यंत जैन कवींनी या भाषेत मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती केलेली दिसते.तसे पाहता इ.स. च्या ११ व्या शतकापासून मराठी भाषेमध्ये ग्रंथ निर्मिती सुरू झालेली होती. लीळाचरित्र, विवेकसिंधु या सारखे मराठी ग्रंथ या काळातीलच आहेत.त्या मानाने उशिरा म्हणजे इ.स १५ व्या शतकात पासून मराठी जैन साहित्य निर्मिती झाल्याचे दिसून येते कारण या आधीचे जैन मराठी ग्रंथ आजपावतो तरी उपलब्ध नाहीत. तेव्हा या ही आधी जैन मराठी ग्रंथ लिहिले होते की नाही हा संशोधनाचा विषय आहे.

– श्री.वर्धमान श्रीपाल दिगंबरे.

संदर्भ:
१.प्राचीन मराठी जैन साहित्य, डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे.
२.प्राचीन मराठी वाड्मयाचा इतिहास: युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई( तृतीय वर्ग कला)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here