योगमुद्रेतील विष्णु

योगमुद्रेतील विष्णु

योगमुद्रेतील विष्णु –

जाम (ता.जि.परभणी) येथील मंदिरावर बाह्यभागात दशावतार मूर्ती शिल्पांकित आहेत. त्यावरून या मूर्तीला चुकून बौद्ध अवतारातील विष्णु संबोधले जाते. पण मूर्तीला चार हात असून वरच्या दोन हातात शंख आणि चक्र स्पष्ट दिसत आहेत. त्यावरून हा विष्णु असल्याचे स्पष्ट होते. खालील दोन हात योगमुद्रेत असून उजव्या हातात पद्म आहे. पद्ममासनातील ही मूर्ती दूर्मिळ आहे. अशीच योगमुद्रेतील विष्णु मूर्ती उमरगा येथील शीव मंदिरावर देखील आहे.

योगासनातील या विष्णुमूर्तीवर अलंकरण अतिशय किमान दाखवलेले असते. मस्तकापाठिमागे प्रभावळ दिसून येते. याच मूर्तीला हातातील आयुधांच्या क्रमावरून “आसनस्थ केशव” असे संबोधन देगलुरकरांनी आपल्या संशोधनात वापरले आहे. गदेचा अपवाद वगळता बाकी आयुधांचा विचार केल्यास ते बरोबरही वाटते.

या योगमुद्रेतील मुर्तीचे बुद्ध मुर्तीशी साम्य चटकन डोळ्यात भरते. याच परिसरातील विष्णु मुर्तींवर दशावतारांचे अंकन दाखवत असताना ९ वा अवतार बुद्ध दाखवला जातो. औंढा येथील केशव मुर्तीवर तो दाखवलेला आहे.

छायाचित्र सौजन्य – Arvind Shahane

-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here