औंढ्या नागनाथचा केवल शिव

औंढ्या नागनाथचा केवल शिव

औंढ्या नागनाथचा केवल शिव –

शिवाची मूर्ती ज्या आणि जितक्या विविध भावमूद्रेतल्या आढळून येतात तशा इतर कुठल्याच देवतेच्या नाहीत. औंढा नागनाथच्या प्राचीन मंदिरावर शिव विविध मूर्तीं पैकी हा एक वैशिष्ट्यपूर्ण “केवल शिव”.

शिवाचा उजवा खालचा हात वरद मूद्रेत असून त्यावर अक्षमालाही आहे. उजव्या वरच्या हातात त्रिशुळ आहे. डाव्या वरच्या हातात नाग धारण केला आहे. वैशिष्ट्य म्हणजे या नागाचा शेपटाकडचा भाग खाली भक्तांच्या माथ्यावर आशिर्वाद वाटावा असा पसरला आहे. उजव्या त्रिशुलधारी हातात तोडे आहेत. पण डाव्या नाग धारण केलेल्या हाताला सर्पाचाच वेढा तोड्या सारखा दाखवला आहे. कलात्मकतेची कमाल आहे. डाव्या खालच्या हातात बीजपुरक आहे. शिवाच्या उजव्या बाजूला नंदी बसलेला आहे.

शिवाची आभुषणेही उग्र रूपातच दाखवली जातात. पण इथे केवल रूपात ही आभुषणे जाडसर ठोकळच पण कलात्मक दाखवून शिल्पकाराने आपल्या प्रतिभेची पावतीच दिली आहे. पायात रूळणारी नररूंडमाळ इथे जाडसर दागिना दर्शवली आहे. कानात झुलणारे वर्तूळाकार कुंडल, यज्ञोपवितही कलात्मकरित्या खाली जावून परत वर मेखलेच्या पट्टीत अडकवले आहे.मुद्रा केवळ सौम्य नसून जरासे स्मित करणारी आहे. या मुर्तीच्या वरच्या हातातील त्रिशुळ, सर्प आणि खालचा नंदी झाकला तर आपण खुशाल याला विष्णु म्हणू शकतो. खालच्या भक्तांसोबत एक चामरधारिणीही आहे.

केवल शिवाचा अर्थ एकट्या शिवाची मूर्ती असा ढोबळ नाही. उत्पत्ती स्थिती लय यात लयाची देवता असलेल्या शिवाची  केवल शिवाची मूर्ती फार वेगळं काही सुचवते. जिर्ण झालेलं, नकोसं असलेलं, विहित कार्य संपलेलं ते मी नष्ट करतो. आणि नविन सुंदर रसरशीत अर्थपूर्ण जगण्याला निर्माण होण्यासाठी जागा करून देतो असा व्यापक सुंदर अर्थ “केवल शिवा”चा लावता येतो. सनातन धर्मात मृत्युला वाक्याच्या शेवटचा पूर्णविराम न मानता दोन वाक्याच्या मधला ठिपका मानतात. (पूनर्जन्म संकल्पना) केवल शिवाची ही किंचित स्मित शांत मूद्रा त्या आगामी जिवाच्या स्वागतासाठी उत्सुक अशी आहे. शिवलीलामृतात

कारूण्य सिंधू भवदू:ख हारी
तूजवीण शंभो मज कोण तारी

अशी प्रार्थना याच आर्ततेतून उमटते.

महाकवी गालिबला आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या काशी विश्वनाथ मंदिर, तो परिसर आणि आख्या काशी नगरीचेच फार अप्रुप वाटले. त्याने या शहरावर फार्सीत कविता लिहिली. (गझल नाही, नज्म म्हणजे कविता) शिवाच्या सान्निध्यात आपल्याला शांती लाभली हे वर्णन करणारी गालिबची ही कविता. मूळ कविता फार्सी. तिचे नाव “चराग-ए-दैर”.त्याचा गद्य अनुवाद निशिकांत ठकार सरांनी केलाय. पद्य अनुवाद मी केलाय.

दिव्यांचे देऊळ
आपल्या रंगभर्‍या मस्तीने
स्वर्गाला लाजविणार्‍या बनारसला
न लागो कुणाची वाईट नजर
पुनर्जन्मावर विश्वास ठेवणारे म्हणतात
इथल्या मरणाला लाभतो
अमरत्वाचा जर
हे मंदिर आहे
रंगीबिरंगी आश्चर्याचे जग
इथल्या वसंतात
सदोदीत फुलण्याची धग
इथे शरद बनून राहतो
उजळ कपाळीचा चंदनटिळा
आणि वसंतवारा घालतो
फुललहरींचे जानवे
इथली धुसर संध्या
स्वर्गीच्या भुवयांमधल्या
कुंकवागत जाणवे
पैगंबराला दिसलेल्या दिव्य प्रकाशापासून
घडलेल्या इथल्या मूर्ती
त्यांच्या चेहर्‍यावर
गंगेकाठच्या दिव्यांच्या
लवथवत्या उत्साहाची पूर्ती
सूर्य-चंद्र जेंव्हा रेंगाळतात
पूर्व क्षितीजावर टेहळण्यासाठी
ही काशी सुंदरी उचलते गंगेचा आरसा
आपले लावण्य न्याहळण्यासाठी
तार्‍यांनी खच्चून भरल्या एका रात्री
विशुद्ध भाव बाळगून गात्री
मी विचारले एका साधुला
महाराज,
या दु:खी जगातून
निष्ठा-प्रेम-भलेपणा-विश्वास
यांनी घेतला अखेरचा श्वास
बापलेक दाबताहेत परस्परांचा गळा
भावाचा भावाच्या वाईटावर डोळा
सार्‍या कोमल भावनांचा
झाला लय
मग का होत नाही प्रलय ?
का वाजत नाही शेवटची रणभेरी ?
अंतिम संहाराची
कोणा हाती दोरी ?
मंद हसू ओठांवर खेळवत
प्रेमभाव डोळ्यांत मिळवत
तो म्हणाला
ही नगरी आहे
विधात्याचे प्रिय काळीज-वतन
तो होऊ देणार नाही ही नष्ट
वा हीचे पतन
हे एैकून अभिमानाच्या गुलालाने
भरून गेले बनारसचे कपाळ
विचारांच्या पंखांना शिवता येऊ नये
असे उंचावले बनारसचे आभाळ

हा केवल शिव पाहून मला गालिबच्या या ओळी आठवल्या.

छायाचित्र – Travel Baba.

श्रीकांत उमरीकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here