आद्य क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे समाधी | Wastad Lahuji Salve Samadhi

आद्य क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे समाधी | Wastad Lahuji Salve Samadhi

आद्य क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे समाधी –

शिवाजीनगर कडून संगमवाडीकडे जाताना संगमवाडीचा पूल ओलांडून पलीकडे गेल्यावर पूल संपल्यावर लगेच डाव्या हाताला एक कच्चा रस्ता सुरु होतो. त्या रस्यावरून पुढे गेल्यावर रस्त्याच्या शेवटी समोर एक मोठे मैदान दिसते. त्या मैदानाच्या शेवटच्या टोकाला आद्य क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे यांची समाधी आहे.हि समाधी साध्या पद्धतीने काळ्या दगडामध्ये बांधली आहे.(Wastad Lahuji Salve Samadhi)

लहूजी यांचा जन्म दि.१४ नोव्हेंबर १७९४ रोजी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नारायणपूर गावच्या साळवे कुटुंबामध्ये झाला. हे कुटुंब दांडपट्टा, तलवार, कुऱ्हाड चालवण्यात पटाईत होते. गुप्त बातम्या काढणे व माग काढणे, शत्रूसैन्यात घुसून लढणे आदी कौशल्ये या कुटुंबाकडे होती. त्यामुळे महाराजांनी त्यांना सैन्यामध्ये राऊत या पदावर नेमून पुरंदरच्या रक्षणाची जबाबदारी सोपवली होती.

दांडपट्टा चालवणे, तलवारबाजी, घोडेस्वारी, बंदूक चालवणे या सर्व युद्ध कलांमध्ये लहुजी निपुण होते. इंग्रजांच्या जुलमी राजवटीचा सामना करण्यासाठी त्यांनी सशस्त्र क्रांती करून या देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी इ.स१८२२  मध्ये गंज पेठेमध्ये एक तालीम सुरू केली. हि तालीम सध्या आद्य क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे तालीम या नावाने ओळखली जाते. तालमीतले शिष्य त्यांना वस्ताद म्हणू लागले. हीच देशातील पहिली क्रांतिशाळा जिथे अनेक क्रांतिकारी घडले. या तालमीचे उद्धाटन हे सरदार रास्ते यांनी केले. त्यावेळी लहुजींनी दांडपट्टयाचे अनेक खेळ करून दाखविले. त्याचबरोबर बंदुकीने नेम धरणे, तलवारबाजी असे मर्दानी खेळ दाखवून लोकांना व तरुणांना आकर्षित करून घेतले. यानंतर अनेक तरुण लहुजींच्या तालमीत दाखल झाले.यात प्रामुख्याने बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा ज्योतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे यांचा समावेश होता.

दि. २० जुलै १८७९ रोजी इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांना रात्री झोपेत असताना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. दि. ७ नोव्हेंबर १८७९ रोजी वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्याने लहुजींच्या मनावर खूप मोठा आघात झाला. त्यानंतर अवघ्या १३ महिन्यांनी म्हणजेच दि. १७ फेब्रुवारी १८८१ रोजी सध्याच्या संगम पुलाच्या परिसरातील एका घरामध्ये वस्ताद लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली आणि एका महान क्रांतिपर्वाचा शेवट झाला.

संदर्भ:
फोटो १ : Google
साप्ताहिक विवेक : https://www.evivek.com/…/2/15/Krantiveer-Lahuji-Salve.html

पत्ता : https://goo.gl/maps/JkbfhrBQ7KEvvhh29?coh=178571&entry=tt

आठवणी इतिहासाच्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here