वाघ दरवाजा

वाघ दरवाजा….
🚩स्वराज्याचे वैभव🚩

इथून बाहेर पडायला दरवाजा असेल असा विचारही कोणाच्या मनात आला नसेल इतके बेमालूम ह्याचे स्थान. शिवछत्रपतींच्या दूरदृष्टीचा हा आणखी एक नमुना. अनेक गुपित आपल्या हृदयात ज्याने साठवून ठेवली. अंगात जय- विजय ची बुलंदी नसली तरी छत्रपतींचा गनिमीकावा ठासून भरलेला. शिवतीर्थाच्या सेवेत आपली मूक कामगीरी आजही राजी खुशीने निभावणारा शिलेदार. शिवतीर्थावरील अनेक क्षणांचा मूक साक्षीदार जो सोहळ्याचा आनंद साजरा करू शकत न्हवता का दुःखात अश्रू ढाळू शकत न्हवता. मुघलांच्या वेढ्यातून राजाराम महाराजांना सुखरूप बाहेर काढण्याची जोखीम ह्याने लीलया पेलली. आणी तो इतिहासात अजरामर झाला. थोरल्या महाराजांनी नेमून दिलेल्या कार्यात त्याने रितभर ही कसू होऊन दिला नाही. पाठमोऱ्या जाणाऱ्या राजाराम महाराजांना लवून मुजरा करताना त्याचा उर दाटून आला असेल. गडावर परकीय झेंडा फडकताना मन अगदी पिळवटून गेलं असेल ह्याच. पुन्हा मावळ्यांचे पाय गडावर पडताच ह्याने आनंदाने मांडीवर थाप मारली. पोटल्याच्या डोंगरावरून तोफांचे गोळे ह्याने छातीचा कोट करून झेलले, दुर्गदुर्गेश्वराला आगीत जळताना बघताना ह्याला मौन राहावं लागलं. आणि नंतरची नशिबी आली ती अनेक वर्षाची भयान शांतता. स्वराज्याच्या अनेक शिलेदारांपैकी हा एक शिलेदार,महाराजांच्या मर्जीतला आजही ह्याच्याशी तुम्ही हितगुज साधू गेलात तर वाघासारखा आपला जबडा उघडून हा त्या अनेक रात्री आपल्याला सांगू लागेल. आजही इथली शांतता खूप काही सांगून जाते.

संकल्पना/लेखन : स्वराज्याचे वैभव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here