महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,75,121

श्री विष्णू मंदिर, धोडंबे

By Discover Maharashtra Views: 1229 2 Min Read

श्री विष्णू मंदिर, धोडंबे –

नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यातील प्रसिद्ध अश्या धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले धोडंबे हे साधारण पाच हजार लोक वस्तीचे एक गावं. नाशिकहून मुंबई-आग्रा महामार्गावर ५० कि.मी. अंतरावर वडाळभोई गाव लागते. डाव्या हाताने वडाळभोईतून भायाळेमार्गे धोडंबेकडे जाता येते. वडाळीभोईतून धोडंबे हे अंतर आठ कि.मी. आहे तर चांदवड ते धोडंबे हे अंतर २६ कि.मी. आहे. कदरू आणि विनता नदीच्या संगमावर धोडंबे गाव वसले आहे. धोडप किल्ल्यामुळे गावाला धोडंबे असे नाव पडले असावे तसेच धौम्य ऋषींमुळे गावाला धोडंबे हे नाव पडले असेही ग्रामस्थ सांगतात. धोडंबेत महादेव अन् विष्णू यांची शेजारी शेजारी अशी दोन हेमाडपंती मंदिरे असून हे धोडंबेचे वेगळेपण म्हणता येईल.(श्री विष्णू मंदिर, धोडंबे)

महादेव मंदिरा शेजारी दीड फूट अंतर सोडून प्राचीन विष्णू मंदिर आहे. या मंदिराचा मुखमंडप पडला असून, समोर ओटा बनविण्यात आला आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आपल्याला दिसून येते. विष्णू मंदिराचे सभागृह म्हणजे एक अनोखा शिल्पं सोहळा आहे.

सभामंडपाचे छत फुलांच्या झुंबरासारखे असून अतिशय सुंदर आणि रेखीव असे आहे. सभामंडपाची भिंत व छताला जोडणाऱ्या भागात वाद्य वाजविणाऱ्या, कृष्णलीला दाखवणाऱ्या स्त्री प्रतिमा पहायला मिळतात. या शिवाय सभामंडपातील छतावर यक्षिणी छताला आधार देण्या बरोबर वेगवेगळ्या कामात मग्न आहेत. एक यक्षिणी दोन हातांनी छताला तोलते आहे तर इतर दोन हातांनी आपल्या बाळाला सावरत त्याला दूध पाजते आहे. अंतराळातील छतावर असलेले कालिया मर्दनाचे कृष्णशिल्पं तर शिल्पंकलेचा अप्रतिम आविष्कार म्हणता येईल. गर्भगृहाची द्वारशाखाही नक्षीकाम व देवतांनी सजली आहे. गर्भगृहात भगवान विष्णूची काळ्या पाषाणातील मूर्ती असून इतरही काही मुर्त्या आहेत.

संदर्भ: ‘वारसायन’, श्री. रमेश पडवळ

©️ रोहन गाडेकर

Leave a comment