महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

विनोबा भावे | विनायक भावे

By Discover Maharashtra Views: 3632 6 Min Read

विनोबा भावे | विनायक भावे…

असे म्हणतात की चालणाऱ्याचे भाग्य चालते .काही महाभागांच्या चालण्यामुळे अनेकांचा भाग्योदय घडतो .त्यांच्या चालण्याला पदयात्रेचे रूप येते .सतत सर्वोदयाच्या वाटेने चालणारा यात्रिक भारताला भेटला तो विनोबांच्या रूपात. विनोबा  भावे भारतीय होते ,पण त्यांनी अवघ्या विश्वाचे नागरिकत्व स्वीकारले होते.’ जय हिंद’ किंवा’ जय महाराष्ट्र ‘या शब्दांनी कोणाचे अभिवादन न करता ते ‘जय जगत ‘असे म्हणत. समर्थांचा ‘रामराम’ आणि विनोबांचा ‘जय जगत ‘ही दोन्ही महापुरुषांची स्फुरणे होती.

रायगड जिल्ह्यातील गागोदे या गावी ११ सप्टेंबर १८९५ रोजी विनायक भावे यांचा जन्म झाला.भावे हे तसे वाईचे.वाई हे भावे यांच्या वाडवडिलांचे इनामगाव होते. विनोबांचे आजोबा हे शिवभक्त होते. शंभूराव हे त्यांचे नाव . शंभुचा सरळपणा आणि भलेपणा विनोबांच्या ठायी आला होता .ते हरिजनांना मंदिरात प्रवेश देत ,त्यांच्या पंक्तीत वाढप करीत, मुसलमान गवयाचे गाणे वार्षिक उत्सवात घडवून आणत. लोकांच्या लेखी हा व्यक्तिगत विक्षिप्तपणा होता. वाट सोडून चालणे आणि चालता-चालता नवी वाट शोधून काढणे हा आजोबांकडून विनोबांना मिळालेला वारसा होता .

विनोबाजींचे आजोबा नोकरीनिमित्त बडोद्याला रहात होते. विनोबांना आजोबांनी बडोद्यात शिक्षणासाठी बोलावून घेतले होते.बडोद्याचे सार्वजनिक ग्रंथालय हे विनोबांना विसावा वाटत होते.श्री अरविंदजींचे पूर्वाश्रमीचे निवासस्थान हे विनोबांचे मंदिर होते.माणिकरावांचा आखाडा,मुजुमदारांचा वाडा ही सभास्थाने विनोबाजींना प्रिय होती. वटवृक्षाची छाया ,विस्तार आणि डौल विनोबांना फार आवडत असे . भ्रमंतीचे वेड तर एवढे होते की, पाच-दहा मित्रांना बरोबर घेऊन तत्वचर्चा करीत .विनोबा भर दुपारी दहा-पंधरा मैलांची विचारयात्रा करीत.या यात्रेचा शेवट घरापुढच्या अंगणात उभाउभी होणाऱ्या सहज संवादाने होई.

विनोबांच्या आई त्यांना ‘विन्या’ म्हणत असे. त्यांनी आईसाठी ‘गीता’ मराठी भाषेत लिहिली. ‘गीताई’ म्हणून ती सर्वत्र प्रसिद्ध आहे. भारतीय संस्कृती व जीवनशैलीबद्दल त्यांचा विशेष अभ्यास होता. राष्ट्रभाषा हिंदी असावी व लिपी देवनागरी असावी, असा त्यांचा आग्रह होता. त्यांना १४ भारतीय भाषा येत होत्या. वेद आणि आश्रम अवस्थेवर त्यांचा विश्वास होता. अभ्यास होता. त्यांचा दृष्टिकोन वैश्विक होता.

विनोबांची स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाची कामगिरी म्हणजे भूदान चळवळ. देशातील जमीनदारांनी त्यांच्या जमिनीचा सहावा हिस्सा भूमिहीनांसाठी दान करावा, असे त्यांचे आवाहन होते. १९५१ साली काही लोकांनी तेलंगण भागात जमीनदाराविरुद्ध संघर्ष केला. तेलंगणात जमिनीचा प्रश्न उग्र गंभीर स्वरूपात उभा राहिला. साम्यवाद्यांनी जमीनदारांचे हत्याकांड सुरू केले. सरकारने शस्त्रबळावर या बंडाचा बीमोड करण्याचा प्रयत्न केला. शस्त्रांचा खणखणाट होत राहिला. रक्ताचे पाट वाहू लागले. तेलंगणातील शांती ढळली. विनोबाजी द्रवले. व्याकूळ झाले .18 एप्रिल 1951 या दिवशी पोचमपल्ली या गावी त्यांनी ग्रामस्थांची सभा घेतली.

अन्नान्नदशेत काळ कंठणारी ‘अन्न -वस्त्रहीन ‘ अशी हरिजन कुटुंबे विनोबांना भेटली. “बाबा काम द्या, आम्ही कष्ट करू. जमीन द्या, आम्ही जगू. आमच्या मुलांना जगवू. रात्रंदिवस मेहनत करू. आम्हाला जमिनीचा तुकडा द्या. भाकरीचा तुकडा आम्ही मिळवतो”विनोबांनी गावाला आवाहन केले: “वाचवा या बांधवांना”
या त्यांच्या आवाहनाने रामचंद्र रेड्डी नावाच्या एका गृहस्थांनी आपली शंभर एकर जमीन दान दिली. त्या पाठोपाठ अनेकांना या भावनेचे भरते आले. भूदान ,संपत्तीदान ,श्रमदान, बुद्धीदान ,असे दातृत्वाचे नाना प्रकार विनोबांनी लोकांपुढे ठेवले. ग्रामदान, जीवनदान याकडेही लक्ष वेधले. दान म्हणजे विषमतेचे निराकारण.ज्याचा वाटा त्याला देणे या सर्वोदयसूत्राचा एक आविष्कार विनोबांची भूदानगंगा तेलंगनात उगम पावली.भारतभर वाहत राहिली आणि सर्वोदयाच्या सागराला जाऊन मिळाली. वय वर्षे 55 ते 68 या तेरा वर्षात विनोबांनी भूदानयज्ञ केला. चाळीस हजार मैलांची वाटचाल केली. दोन हजार भाषणे केली .समाजप्रबोधन केले. तेलंगणातून तमिळनाडूकडे ,मग केरळातून कन्याकुमारीकडे अशी भ्रमंती सुरू केली .

कन्याकुमारीच्या खडकावर उभे राहून त्‍यांनी रामकृष्ण- विवेकानंदांचे स्मरण केले.पाँडिचेरीच्या आश्रमात जाऊन माताजींचे आशीर्वाद मिळवले . चंबळ खोऱ्यातील डाकूंचे वृत्तीपरिवर्तन केले . प्रथम हृदयपरिवर्तन मग जीवन परिवर्तन शेवटी समाजपरिवर्तन हा विनोबाप्रणित विकासमार्ग होता.

विनोबांची प्रत्येक सभा ही नवविचार सभा होती. एका सभेत ते म्हणाले,” आपल्या समस्यांचे निराकरण राजकारणाने होणार नाही, अध्यात्माने होईल. येथून पुढे राजकारणाच्या जागी विज्ञान यावे. धर्म – संप्रदायांनी आपली जागा अध्यात्माला द्यावी ” दुसऱ्या एका सभेत सामाजिक प्रदूषणाविषयी बोलताना विनोबाजी म्हणाले “सध्याच्या विकारग्रस्त समाजात प्रत्येक वस्तूचे मूल्य पैशांनी ठरते. स्वतः कष्ट न करता पैशाच्या बळावर इतरांचे श्रम जेव्हापासून माणूस विकत घेऊ लागला, तेव्हापासून अनेक सामाजिक दूषणे निर्माण झाली…… मूठभर अनुत्पादक वर्गाच्या हाती पैशामुळे जमीन आणि उत्पादनाची साधने एकवटली……. जोपर्यंत श्रमाला सन्मानाची जागा प्राप्त होत नाही, तोपर्यंत सर्वांचे कल्याण अशक्य आहे.” विनोबांचा कांचनमुक्ती विचार हे या दिशेने टाकलेले एक पाऊल होते.

केवळ समाज प्रबोधनातून ७० दिवसांत त्यांना सुमारे १२ हजार एकर जमीन मिळाली.
विनोबा हे महात्मा गांधीं यांचे एकनिष्ठ अनुयायी होते.१९४८ साली महात्मा गांधींच्या निधनानंतर निर्माण झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर विनोबांनी सत्य-अहिंसा व सर्वधर्म समभावावर आधारलेला सर्वोदयाचा मार्ग सांगितला. म्हणूनच गांधीजींच्या तत्त्वावरील ‘श्रद्धा’ परत मजबूत करण्याचे काम त्यांनी केले, असे मानले जाते. 1921 मध्ये वर्धा येथे सत्याग्रह आश्रमाची एक शाखा निघाले आणि तिचे नेतृत्व गांधीजीनी विनोदांवर सोपवले .व्यासंग आणि आचारशुद्धता यामुळे विनोबांना ‘आचार्य ‘ ही पदवी देण्यात आली. ते गांधीकुलाचे आचार्य आणि आचार्यकुलाचे आध्य प्रणेते ठरले. विनोबाजी म्हणजे अभ्यास, आचार आणि कार्यक्रम हे समीकरण सर्वसामान्य झाले. गांधीजींनी आपले दोन वारसदार आपल्या हयातीतच निवडले होते.

जवाहरलाल हे त्यांचे राजकीय वारसदार झाले .विनोबाजी हे त्यांचे आध्यात्मिक वारसदार ठरले.
१९७५ मध्ये इंदिराजींनी आणीबाणी पुकारली .मौनाच्या उंबरठ्यावरून विनोबा भावे नी अभिप्राय व्यक्त केला ,हे अनुशासन पर्व आहे’ काही लोकांना हा अभिप्राय अनुचित व अनपेक्षित वाटला.त्यांनी ‘सरकारी संत ‘ही संज्ञा दिली.

लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

बाजींद कांदबरी

Leave a comment