महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,91,457

वतन की स्वराज्य

By Discover Maharashtra Views: 1416 3 Min Read

वतन की स्वराज्य भावनांचा कल्लोळ उडवणारी कथा –

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब स्वराज्य गिळायला आला. त्याला ठाऊक होतं की वतनाचं आमिष दाखवलं की मराठे हळू हळू का होईना फूटतील आणि याचा फायदा मोगल साम्राज्य विस्ताराला होईल. अर्थात आपल्या इथे देखील वतन मिळण्याच्या अपेक्षेने ज्यांची वतनदारी गेली आहे ते गेलेली वतनदारी मिळवण्यासाठी मोगलांचे उंबरठे झिजवू लागले. स्वराज्यासाठी वतनावर पाणी सोडणारे कान्होजी जेधे यांचे पुत्र देखील हव्यासापोटी मोगलांना जाऊन मिळाले सध्या मिळालेल्या पुराव्यावरून तरी असंच दिसून येतं.

संभाजी महाराजांना ही बाब पटली नाही म्हणून सर्जेराव आणि शिवाजीराव जेधे यांना छत्रपती संभाजी महाराज यांनी पत्राद्वारे चांगलंच सुनावलं. सर्जेरावांना ५ ऑक्टोबर १६८७ रोजी लिहिलेल्या पत्रात म्हणतात, विचित्रगड चे हवालदार संताजी निंबाळकर याला परभारे आपला भाऊ शिवाजीराव जेधे याने मोगलांची चाकरी करण्याचे योजिले.

संताजी निंबाळकर याने शंभू छत्रपतींच्या कानावर घातले तेव्हा महाराजांनी सर्जेराव यांना खडे बोल सुनवत म्हटलय की तुमचे भाऊ शिवाजीराव जेधे मोगलाईत गेला तर तुम्ही इतक्या दिवस खाल्लेल्या अन्नाला जागून आमच्याकडे यायचे होते पण तुम्हीही मोगलांकडे गेलात यावरुनच तुमची एकनिष्ठता समजली. जे काही सांगायचे आहे ते संधान न बांधता आम्हास लिहून पाठवणे, त्यात जर तुमची एकनिष्ठता समजून आली तर मंजूर होईल आणि त्याप्रमाणेच वर्तणूक करावी…

मूळ पत्र मुखत्वे खडे बोल सुनवणारच आहे. पत्रातील भाषा अक्षरशः सडेतोड आहे पण पत्र आणि मूळ घटनाक्रम पाहता पत्रात आपल्या माणसांप्रती असलेली पोटतिडीक व कळकळ स्पष्ट पणे जाणवते. सर्जेराव आणि शिवाजीराव या दोन्ही बंधूंना या पत्राचा परिणाम लगेच जाणवला नाही. पण पत्रातील शब्द मात्र त्यांना प्रचंड बेचैन करत होते. पुढे दीड वर्ष सर्जेराव मुघलांकडे च होते पण आपल्या वडलांपासून चालत आलेली स्वराज्याची निष्ठा आपल्या कडून पायदळी तुडवली जात आहे याची सल त्यांना बहुदा टोचत असावी.

निळोपंत पेशवे यांना ही बाब लक्षात आली. सर्जेराव यांच्या मनाची घालमेल ओळखत निळोपंत पेशव्यांनी यांनी अभयपत्र देऊन सर्जेरावना स्वराज्यात येण्यासाठी उद्युक्त केलं. त्याला सर्जेरावांनी सकारात्मक प्रतिसाद देखील दिला. सर्जेराव स्वराज्यात परत आले. स्वराज्यात आले खरे परंतू स्वराज निष्ठा दाखवण्याची जबाबदारी मात्र सर्जेरावांनाच दाखवावी लागणार होती. रोहिडा हा त्यावेळी मुघलांच्या ताब्यात होता निळोपंत पेशवे यांनी रोहिडा स्वराज्यात आणण्याची जबाबदारी सर्जेरावांच्या वर सोपवली.

स्वराज्याच्या प्रति असलेलं आपलं इमान पुन्हा सिद्ध करण्यासाठी सर्जेरावानां काही करून रोहिडा स्वराज्यात परत मिळवायचाच होता. युद्धाची तयारी सुरू झाली कारीहून सर्जेराव यांनी आपले विश्वासू सैनिक घेऊन रोहिड्यावर हल्ला चढवला. पराक्रम, त्याग, आणि पराकोटीची स्वामिनिष्ठा यासोबत मानवी मनाला लागलेली वतनाची चटक आणि त्यामुळे स्वराज्यनिष्ठेला लागलेलं नख अशा सर्व भावनांचा अक्षरशः उडालेला ठळकपणे दिसून येतो. सर्जेरावांनी पराक्रमाची शर्थ करत रोहिड्यावर हल्ला चढवला आणि पुन्हा तमाम मराठ्यांचे स्फुर्ती निशाण डौलाने रोहिड्यावर फडकू लागलं.

✍️ अचिंत्य

विजयश भोसले

1 Comment