विष्णुची वराह मूर्ती

विष्णुची वराह मूर्ती

विष्णुची वराह मूर्ती –

मत्स्य, कुर्म या नंतर तिसरा अवतार वराह मानला जातो. वैष्णव मंदिरांवर वराह अवताराच्या मूर्ती प्रामुख्याने आढळून येतात. ही वराहमूर्ती जाम (ता. जि. परभणी) येथील प्राचीन मंदिरावरची आहे. मुख वराहाचे व शरिर मानवाचे अशी स्थानक मूर्ती (म्हणजे उभी) या प्रकारातील हा नृवराह म्हणून ओळखला जातो. उजव्या खालच्या हातात गदा आहे. वरच्या हातात पद्म आहे. त्यातही वैशिष्ट्य म्हणजे वरती कमळ फुललेले तर खालच्या बाजूस कळी आहे. डावा मुडपलेला हात आहे त्यावर लक्ष्मी विराजमान आहे. त्या हातात शंख आहे. डाव्या खालच्या हातात चक्र आहे. डावा पाय शेष नागाच्या फण्यावर टेकवला आहे. शिवाय कासवही या पायाखाली आढळून येते.

मूर्तीला सुंदर अलंकारांनी मढवले आहे. शंख पकडला त्या हातात शंखाला पकडण्यासाठी सोन्याची साखळी गुंफावी असाही दागिना दिसून येतो. शंखाच्या खोबणीत बोटं बरोबर बसवली आहेत. शंख कसाही पकडला आहे असे नाही. उजव्या हाताची गदा ऐटदारपणे जमिनीवर रोवलेली आहे. सगळ्याच मूर्तीला एक छानसा डौल प्राप्त झालेला आहे. जामचे मंदिर वैष्णव मंदिर असल्याने विष्णुने सुंदर कलात्मक प्रतिमांचे अंकन यावर आढळून येते.

छायाचित्र सौजन्य – Arvind Shahane.

-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद.

असाच नृवराह सिल्लोड तालुक्यातील जोगेश्वरी गुंफा मंदिरात कोरला आहे. त्याचा कालावधी अजिंठा लेणीच्या प्रारंभीच्या काळातील असावा. तिथूनच खाली खान्देशात उतरण्याचा एक प्राचीन व्यापारी मार्ग होता .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here