महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

वाफगाव भुईकोट | Vafgaon Fort

By Discover Maharashtra Views: 4315 8 Min Read

वाफगाव भुईकोट | Vafgaon Fort

गडकोटांची भटकंती करताना आपल्याला अनेक गावातुन जुने वाडे व गढीकोट पाहायला मिळतात. यातील काही वाडे अथवा गढी म्हणजे चक्क भुईकोट किल्लेच असतात. अशीच एक गढी म्हणुन ओळखली जाणारी वास्तु म्हणजे वाफगाव भुईकोट (Vafgaon Fort) किल्ला. मल्हारराव होळकर यांनी बांधलेला व यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असलेला हा भुईकोट किल्ला आजही मध्ययुगीन वैभवशाली इतिहासाची साक्ष देत उभा आहे. एखादा परिपूर्ण भुईकोट त्यातील वास्तुसह पहायचा असल्यास वाफगाव भुईकोट हे सर्वात योग्य ठिकाण आहे. सध्या हा भुईकोट रयत शिक्षण संस्थेला बक्षीस रुपात दिलेला असुन रयत शिक्षण संस्था वाफगाव यांच्या ताब्यात आहे. या किल्ल्यात पूर्वी होळकरांची टाकसाळ असल्याचे सांगण्यात येते.

वाफगावच्या भुईकोटाला भेट दयायची असल्यास सर्वप्रथम राजगुरुनगर गाठावे. राजगुरुनगर पासून १२ कि मी.अंतरावर वाफगाव आहे. वाफगावमध्ये शिरताना लांबूनच या कोटाची भक्कम तटबंदी नजरेस पडते तर गावात शिरल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजूस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैभव स्मृती असे लिहिलेली कोटाच्या भव्य दरवाजाची कमान नजरेस पडते. कमानीच्या बाहेरील बाजुस समोरच हनुमानाचे मंदिर आहे. कमानीच्या बाहेरील भिंतीवर दोन्ही बाजूस शरभ शिल्पे व खालील बाजूस कमळाची नक्षी कोरलेली असुन एक घोडयावरून युद्धावर निघालेल्या स्वाराचे शिल्प कोरले आहे तर आतील दोन्ही बाजुस हत्ती व त्याखाली कमळाची नक्षी कोरलेली आहेत. कमानीतील लाकडी दरवाजे आजही शिल्लक असुन दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत.

वाढत्या लोकवस्तीमुळे रस्त्याच्या बाजुने असणारी तटबंदी व दरवाजाच्या शेजारी असणारे दोन्ही बुरुज पुर्णपणे नष्ट झाले आहेत. आज या तटबंदीच्या टोकाला नदीकाठी असणारा केवळ एक उध्वस्त बुरुज पाहायला मिळतो. नगरकोटाची तटबंदी नदीकाठाने काही प्रमाणात शिल्लक असुन त्यातील दोन बुरुज आजही पहायला मिळतात. वाफगाव भुईकोटाची रचना संपुर्ण गावाभोवती नगरकोट व या नगरकोटच्या आत एका टोकाला राजपरीवारासाठी बालेकिल्ला अशी असुन अर्धे वाफगाव या नगरकोटाच्या आत वसले आहे. कोटाच्या रक्षणासाठी वेळू नदीचे पात्र कोटाच्या तीनही बाजूस फिरवलेले असुन एका बाजुस जमीन आहे. संपुर्ण नगरकोट १६ एकरमध्ये पसरलेला असुन बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ ४ एकर आहे.

नगरकोटाच्या दरवाजातून सरळ जाणारा रस्ता बालेकिल्ल्याकडे जातो. बालेकिल्ल्याकडे जाताना वाटेत काही जुने वाडे पहायला मिळतात. बालेकिल्ल्याच्या दरवाजासमोर महादेवाचे श्री राजेश्वर मंदिर आहे. संपुर्ण मंदीर दगडी बांधणीतील असुन शिखराला चुन्याचा गिलावा केलेला आहे. संपुर्ण मंदिराभोवती दगडी तटबंदी असुन मंदिराबाहेरील मंडपात दगडी नंदी आहे तसेच दरवाजा बाहेरील भिंतीवर दोन्ही बाजुला दोन द्वारपाल कोरलेले आहेत. मंदिराचे गर्भगृह व सभामंडप असे दोन भाग असुन सभामंडपाच्या खिडक्यांना दगडी जाळी बसवलेली आहे. या मंदिराचे बांधकाम राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात झालेले असुन मंदिराच्या बाजूला भिंतीलगत असणाऱ्या चौथऱ्यावर पूर्वी धर्मशाळा होती. मंदिराच्या गाभाऱ्यात आजही होळकरांच्या पूजेच्या वस्तु पहायला मिळतात.

मंदिरातुन बाहेर पडल्यावर समोरच बालेकिल्ल्याचे दगडी बांधकामातील मुख्य प्रवेशद्वार आहे. बालेकिल्ल्याचा आकार चौकोनी असुन किल्ल्याला उत्तराभिमुख मुख्य प्रवेशद्वार व पश्चिमाभिमुख दुसरा दरवाजा असे दोन दरवाजे आहेत. किल्ल्याचे प्रवेशद्वार हे मजबुत दगडात असून दारांवर लोखंडी पट्ट्यावर टोकदार लोखंडी खिळे बसवलेले आहेत जेणेकरून हत्तीलाही दरवाजावर धडक देता येऊ नये. किल्ल्याला दरवाजाशेजारी दोन,चार टोकाला चार व एका तटबंदीत मध्यभागी एक असे एकूण ७ बुरुज असून प्रत्येक बुरुजावर तोफेच्या व बंदुकीच्या मारगीरीसाठी झरोके व जंग्या आहेत. किल्ल्याच्या बांधकामात फांजीपर्यंत घडीव दगड व फांजीवरील भागात विटांचा वापर केला आहे.

किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार भव्य असुन दरवाजाच्या उजव्या बाजूच्या बुरुजाशेजारी चुन्याचा घाणा व त्याचे दगडी चाक दिसुन येते. दरवाजावरील दगडी कमानीत फुलांची नक्षी कोरलेली आतील बाजूस पहारेकऱ्यासाठी देवड्या आहेत. मुख्य दरवाजातील दिंडी दरवाजाने आत शिरल्यावर समोरच राजमहालाभोवती असलेल्या तटबंदीची भिंत आडवी येते. या भिंतीला लागुनच चुन्याच्या घाण्याचे चाक उभे करून ठेवले आहे. दरवाजाशेजारी असलेल्या देवडीतुन बुरुजावर जाण्याचा मार्ग सध्या बंद करण्यात आला आहे. येथुन उजव्या व डाव्या बाजुने तटावर जाण्यासाठी पायऱ्या असुन उजव्या बाजुच्या पायऱ्याशेजारी एक समाधी चौथरा दिसुन येतो.

किल्ला पहाण्यास तटावर न चढता डाव्या बाजुने किल्ला पहाण्यास सुरवात करावी. या वाटेवर सर्वप्रथम विटांच्या बंदिस्त तटबंदीत असलेला दुमजली राजमहाल लागतो. हा महाल राणीचा महाल म्हणुन ओळखला जात असुन मध्ययुगीन सुबक लाकडी काम असलेल्या या महालाच्या दुसऱ्या मजल्यावर विष्णुपंचायतन आहे. या मंदिरातील सर्व मुर्ती राणी अहिल्यादेवी होळकर यांनी स्थापन केलेल्या आहेत. राजमहालाच्या समोरील एका चौथऱ्यावर १०-१२ फुट लांबीच्या दोन तोफा दिसुन येतात. चौथऱ्याच्या मागे डाव्या बाजुस एक चौकोनी पायऱ्या असलेली बारव असून हि बारव राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या कारकिर्दीत बांधली गेली. या बारवेच्या काठावर विष्णू-लक्ष्मीचे राजस्थानी शैलीतील लहानसे मंदिर आहे.

मंदिरासमोर किल्ल्याच्या कोपऱ्यातील बुरुजात तटाच्या भिंतीत एक लहानसा दरवाजा असुन त्यात विहीर आहे. या विहिरीत उतरण्यासाठी दरवाजातून १५ ते २० पायऱ्या असुन तेथुन तसेच बुरुजावरून देखील या विहीरीतील पाणी काढता येते. तटावरील सैनिकांना पाण्यासाठी खाली उतरावे लागू नये यासाठी अशी रचना करण्यात आली आहे. या विहिरीच्या पाण्याचा आजही पिण्यासाठी वापर केला जातो. विहीर पाहुन झाल्यावर समोरच तटाला लागुन पायऱ्यानी तटबंदीवर चढावे व मुख्य दरवाजाच्या दिशेने किल्ल्याला फेरी मारण्यास सुरवात करावी. तटावरून किल्ल्याचा संपुर्ण परीसर नजरेस पडतो. किल्ल्यात आश्रमशाळा असल्याने शाळेच्या वापरासाठी मूळ वास्तूत काही प्रमाणात बदल करून इतर काही वास्तू नव्याने बांधण्यात आल्या आहेत. तटबंदीच्या बाहेर तीन बाजुस वेळू नदीचे पात्र नजरेस पडते.

दरवाजा शेजारील बुरूजावर तोफा व बंदुकीचा मारा करण्यासाठी झरोके व जंग्या यांचे विटांमधील सुंदर बांधकाम असुन खालील देवडीतुन वर येणारा मार्ग सध्या बंद करण्यात आला आहे. येथुन तटबंदीला वळसा मारत तटबंदीच्या दुसऱ्या भागात आल्यावर तटबंदीखाली असलेला दुसरा दरवाजा दिसतो. हा दरवाजादेखील मुख्य दरवाजाप्रमाणे असुन याच्या आतील दोन्ही बाजूस पहारेकऱ्यासाठी देवड्या आहेत पण दरवाजाशेजारी बुरुज नाहीत. या दरवाजातुन बाहेर आल्यावर समोर नगरकोटाची दुसरी तटबंदी व त्यातील दोन बुरूज पहायला मिळतात पण यातील एक बुरुज मोठया प्रमाणात ढासळलेला आहे.

नगरकोटाच्या तटबंदीतुन बाहेर पडण्यासाठी येथे असलेला दरवाजा पुर्णपणे उध्वस्त झालेला आहे. हे पाहुन आल्या वाटेने पुन्हा किल्ल्यात शिरावे व राजदरबाराच्या दिशेने निघावे.

वाफगाव किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे हा राजदरबार आहे. राजदरबारचे बांधकाम दुमजली असून त्यात दगडविटांचा वापर करून वर चुन्याचा गिलावा दिलेला आहे. राजदरबाराबाहेरील तटबंदीवर विटांनी सुंदर चर्या बांधलेल्या आहेत. राजदरबाराची भिंत आतील बाजूने पोकळ असुन त्यात असंख्य दालने आहेत. या दालनातून ये-जा करण्यासाठी काही ठिकाणी जिने ठेवलेले आहेत. राजदरबारावरच होळकरांचे निशाण फडकवण्याची जागा असुन राजदरबाराचा काही भाग आतुन कोसळलेला आहे. राजसदरेच्या मागील बाजुस भलीमोठी खिडकी असुन येथे खासे लोक बसण्यासाठी असलेले बांधकाम मात्र पुर्णपणे कोसळलेले आहे.

मुख्य दरवाजातून आत शिरल्यावर मानाप्रमाणे दरबारात येण्यासाठी वेगवेगळे प्रवेशमार्ग आहेत. दरबाराचे प्रवेशद्वार घडीव दगडांनी बांधलेले असुन त्याच्या वरील बाजूस ललकारी देण्यासाठी नगारखाना आहे. दरवाजाचा हा भाग तीन मजली असुन बाहेरील व आतील बाजुने सुशोभित करण्यात आला आहे. बाहेरील बाजुस दगडात खांब कोरलेले असुन आतील बाजूस चुन्यामध्ये कोरीवकाम केलेले आहे व त्यातुन कारंजे सोडलेले आहे. राजदरबारातून बाहेर पडल्यावर समोरच्या भागात म्हणजेच राजमहाल व राजदरबार यांच्यामधील मोकळ्या जागेत जमिनीखाली एक भलेमोठे १००x१०० फुट आकारचे भलेमोठे कोठार आहे. शाळेतील मुले या कोठारात शिरत असल्याने ते काही प्रमाणात बुजविले असुन त्याचा प्रवेशमार्ग अरुंद करण्यात आला आहे तरीदेखील आपल्याला हे कोठार पहाता येते पण आतील अंधाराने व कोंदट वातावरणामुळे जास्त वेळ आत थांबता येत नाही. हे कोठार पाहुन झाले कि आपली गडफेरी पूर्ण होते.

राजदरबारा शेजारील मोकळ्या जागेत शाळेची नवीन इमारत बांधण्यासाठी पाया खोदण्यात आला आहे पण स्थानिकांच्या विरोधामुळे हे काम थांबलेले आहे. बॉंबे गॅझिटीयरमध्ये वाफगाव गढीचा उल्लेख इंग्रजानी किल्ला असाच केलेला आहे. वाफगाव कोट मराठाकालीन वास्तूकलेचा अजोड नमूना असुन राजगुरूनगरला गेल्यावर वाफगावच्या या भुईकोट किल्ल्याला भेट द्यायलाच हवी.

सुरेश निंबाळकर

Leave a comment