महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

राम कृष्णाच्या जूळ्या मूर्ती

By Discover Maharashtra Views: 1207 2 Min Read

राम कृष्णाच्या जूळ्या मूर्ती –

विष्णुच्या अवतार रूपातील नृसिंह मंदिरं प्राचीन काळातली आढळून येतात. पण या शिवाय राम आणि कृष्णाची प्राचीन मंदिरं फारशी नाहीत. केशव रूपातील  (पद्म, शंख, चक्र, गदा) आणि बालाजी रूपातील मूर्ती प्रामुख्याने आढळून येतात. रामकृष्ण मंदिर मु पो. मान (ता. मूर्तीजापुर, जि. अकोला) येथील मंदिरात या दोन अप्रतिम शिल्पकलेचा नमुना असलेल्या मूर्ती स्थापित आहेत. गावातीलच एका गढीत या मुर्ती सापडल्याचे गावकरी सांगतात. यातील श्रीकृष्णाची मूर्ती सहजच ओळखता येते कारण हातातली मूरली. खाली डाव्या बाजूला  मान वर केलेले वासरू आढळून येते. बाकी चामरधारी सेवक आहेत.(राम कृष्णाच्या जूळ्या मूर्ती)

पण रामाच्या मूर्तीवर केवळ राम म्हणून ओळखता यावेत असे लक्षण नाहीत. सहसा धनुष्य ही प्रमुख खुण असते. दोन्ही देवतांचे एक प्रमुख लक्षण म्हणजे दोन हात दाखवलेल्या याच दोन देवता आहेत.

रामाला करंडमुकूट आणि मागे प्रभावळ दाखवलेली आहे. एका हातात बीजपुरक आहे. रामाचे गुडघ्यापर्यंत पोचणारे हात हे एक वैशिष्ट्य सांगितलं जातं दूसरं म्हणजे चेहर्‍यावरील “संपूर्ण पुरूष” दर्शवणारे तृप्त शांत भाव. या शिल्पकाराने हे आवाहन पेलले आहे. समभंग अशा मुद्रेत राम उभा आहे.

दूसरीकडे कृष्णाच्या पायाची कलात्मक अढी, उजव्या पायाचा अंगठाच फक्त जमिनीला टेकतो आहे. ओठावर  असे काही गुणगुणण्याचा भाव आहे. चेहरा बोलका प्रसन्न जरासा मिश्कील आहे.

एकाच ठिकाणी सापडलेल्या एकाच आकाराच्या सारख्याच कलाकुसरीने नटलेल्या या मूर्ती असल्याने मी त्यांना जूळ्या मूर्ती असे संबोधले. अभ्यासकांनी यावर अजून प्रकाश टाकावा. Milind Dhaktod  या मित्राने आवर्जून हे फोटो पाठवले. त्याचे मन:पूर्वक धन्यवाद. अचलपुर, परतवाडा, अकोला, वाशिम, बुलढाणा हा प्राचीन वारश्याने समृद्ध असा परिसर आहे. येथील मूर्तींचे फोटो जरूर पाठवा. त्यावर खुप लिहिण्यासारखं आहे.

-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद

Leave a comment