महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,29,563

तुपाची विहिर, पावनगड

By Discover Maharashtra Views: 2043 2 Min Read

तुपाची विहिर, पावनगड –

A Well to Store ‘Ghee’ (Pavangad)

आपण आजतागायत पाहत आलो आहोत त्या पाण्याच्या विहिरी. परंतु आपण कल्पनासुद्धा केली नसेल अशी विहिर म्हणजे पावनगड येथील ‘तुपाची विहिर’.

पूर्वीच्याकाळी अन्नधान्य, संपत्ती व तूप या स्वरूपात कर वसुल केला जात असे. यातून गोळा झालेले तूप एका बंदिस्त छोट्याशा विहिरीत साठवून ठेवले जाई. या तुपाचा वापर लढाईत तलवारीच्या घावाने जखमी होणाऱ्या सैनिकांची जखम भरून येण्यासाठी औषध म्हणून केला जाई. जास्त काळ साठविलेल्या या औषधी तुपाच्या गुणधर्मांचा वापर करून ते तूप जखमेवर लावले जाई. तूप जितके जुने, तितके ते अधिक औषधी. त्यामुळे जखम लवकर भरून येऊन सैनिक पुन्हा नव्या जोमाने लढण्यास सज्ज होई. त्यावेळी दूध-दुभते भरपूर प्रमाणात असल्याने तूपही मोठ्या प्रमाणात गोळा होणे शक्य होते. तूप अधिक औषधी व टिकाऊ बनण्यासाठी त्यावर प्रक्रिया करून वापर केला जात असे.

या गडावर पूर्वी धान्यकोठी, राजवाडा, नगारखाना होता. सध्या येथे नरसोबाचे मंदिर, जिजामातेचे, वाघजाईचे आदी मंदिरे आहेत. गडावर ठिकठिकाणी बुरूज आहेत. गडावरून चहू दिशांवर लक्ष ठेवता येऊन विहंगम दृश्याची मेजवानी घेता येते. गडावर जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता नाही. तसेच पक्क्या रस्त्याचीही कमतरता असल्यामुळे या भागाकडे पर्यटकवर्ग कमी प्रमाणात आकर्षला जातो. येथे झाडाझुडपांचे प्रमाण अधिक असल्यामुळे बिबट्या वाघ, विषारी सर्प, ससे, मोर, रानडुकरे यांचे नेहमीच वास्तव्य असते. येथून पन्हाळगडाचा विस्तार लक्षात येतो. पन्हाळगडास वेढा घालण्यासाठी किती सैन्य लागले असणार याचे गणित करत येथे आपला वेळ निवांतपणे जाऊ शकतो.

© प्रथमेश फाळके

Leave a comment